Join us  

गरमागरम चहासोबत 'मेथीचे वडे' खायला चमचमीत, तब्येतीला हेल्दी, खुसखुशीत... सोपी रेसिपी... 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2023 12:20 PM

Methi Vada : Recipe : मेथी पासून तयार केलेले चटपटीत 'मेथी वडे' सगळेच आवडीने फस्त करतील.

संध्याकाळच्या छोट्याश्या भुकेसाठी आपल्याला चहासोबत काहीतरी गरमागरम खाण्याचा मूड होतोच. अशावेळी आपण चहासोबत भजी, वडे असे काहीतरी चटपटीत खातोच. पण रोज रोज आपण हे बाहेरचे ठेल्यावरील तळलेले पदार्थ खाणे शरीरासाठी अपायकारक ठरू शकते. अशावेळी चटकदार, चटपटीत काय बनवावे असा प्रश्न कित्येक गृहिणींना पडतो. संध्याकाळच्या नाश्त्यात गरमागरम चहासोबत बटाटा वडा, भाजी खाऊन कंटाळा आला असेल तयार आपण मेथीचे वडे नक्की एकदा ट्राय करू शकता. मेथीची भाजी खायची म्हटलं तर घरातील थोरांपासून लहानमुलांपर्यंत सगळेच नाक मुरडतात. अशावेळी मेथी पासून तयार केलेले चटपटीत वडे सगळेच आवडीने फस्त करतील. यामुळे घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यात होणारी ही झटपट रेसिपी एकदा घरी नक्की करून पाहाच(Methi Vada : Recipe).

साहित्य :- 

१. मेथीची पाने - २ कप (बारीक चिरून घेतलेली) २. बेसन - १/२ कप ३. पोहे - १ कप (भिजवून घेतलेले) ४. लाल मिरची पावडर - १ टेबलस्पून ५. हळद - १/४ टेबलस्पून ६. हिंग - १/२ टेबलस्पून ७. कोथिंबीर - १/४ टेबलस्पून (बारीक चिरून घेतलेली)  ८. पांढरे तीळ - २ टेबलस्पून ९. पाणी - गरजेनुसार १०. कांदा - २ टेबलस्पून (उभा चिरून घेतलेला)

लसूण पेस्ट तयार करण्यासाठीचे साहित्य :- 

१. हिरव्या मिरच्या - ४२. लसूण - ७ ते ८ ३. आलं - १ इंचाचा तुकडा ४. धणे - १ टेबलस्पून ५. जिरे - १ टेबलस्पून 

mintsrecipes या इंस्टग्राम पेजवरून मेथीचे वडे कसे तयार करायचे याचे साहित्य व कृती याबद्दल एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 

कृती :- 

१. सर्वप्रथम लसूण पेस्ट तयार करण्यासाठी आलं, हिरवी मिरची, लसूण, धणे, जिरे मिक्सरमध्ये थोडे जाडसर वाटून घ्यावे. २. एका भांड्यात भिजवून घेतलेले पोहे घेऊन त्यावर किंचित पाणी शिंपडून ते हातांच्या मदतीने कुस्करून घ्या. ३. आता त्यात तयार करून घेतलेली लसूण पेस्ट, लाल मिरची पावडर, हळद, हिंग, उभा चिरून घेतलेला कांदा, बारीक चिरलेली मेथी, बेसन, चवीनुसार मीठ गरजेनुसार किंचित पाणी घालून हे मिश्रण एकजीव करून घ्यावे. 

४. या तयार झालेल्या मिश्रणापासून गोल चपट्या आकाराचे वडे तयार करून घ्यावेत. ५. एका डिशमध्ये थोडेसे पांढरे तीळ घ्यावेत. आता हे मेथीचे वडे या पांढऱ्या तिळात घोळवून घ्यावेत. ८. एका कढईत तेल चांगले गरम करून घ्यावे. ९. आता या गरम तेलात हे वडे सोडून खरपूस गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घ्यावेत. 

गरमागरम मेथी वडे खाण्यासाठी तयार आहेत. हे मेथी वडे हिरवी चटणी किंवा सॉस सोबत खाण्यासाठी सर्व्ह करावेत.

टॅग्स :अन्नपाककृती