Join us  

दूध करपलं? करपट दूध फेकून देण्यापेक्षा करा ३ सोपे उपाय, दूध वाया नाही जाणार..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2022 3:06 PM

Kitchen Hacks दूध करपलं असेल, त्याला करपट वास घरभर पसरतो आणि जाता जात नाही.

दूध तापवत ठेऊन सतत त्याच्याकडे लक्ष देणे हा खूप मोठा टास्क म्हणावं लागेल. थोडं देखील दुर्लक्ष झालं की दूध उतू जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. किंवा जास्त वेळ दुर्लक्ष झालं की दूध करपलचं म्हणून समजा. करपलेल्या दुधाला एक विशिष्ट करपट वास येतो. त्यामुळे हे दूध इतर कोणत्या पदार्थात घालणे कठीण होऊन जाते. याशिवाय करपलेल्या वासामुळे ते पिणं शक्य नसतं. मात्र हे दूध टाकून द्यायचंही गृहिणींच्या जीवावर येत असतं. मात्र, अशावेळी काही साध्या सोप्या गोष्टी करुन या दुधाचा करपट वास घालवता येईल. कोणत्या आहेत त्या घरगुती उपाय पाहुयात.

दालचिनीचा वापर

करपलेल्या दुधासाठी दालचिनीचा वापर योग्य ठरेल. यासाठी करपलेल्या भांड्यातील दूध दुसऱ्या स्वच्छ भांड्यात ओता. त्यानंतर दुसऱ्या एका भांड्यात एक चमचा तूप घाला आणि गरम करा. गरम झाल्यावर त्यात दालचिनीचे काही तुकडे घाला. ते जरा परतल्यानंतर त्यात दूध घाला आणि ढवळत राहा. हळूहळू करपट वास कमी होईल. मग हे दूध तुम्ही वापरू शकाल.

तमालपत्र, वेलची उपयुक्त

दुधाचा करपट वास दूर करण्यासाठी तमालपत्र आणि वेलचीचाही वापर करता येईल. यासाठी प्रथम एका भांड्यात दोन चमचे तूप गरम करून त्यात वेलची आणि तमालपत्र घाला. यातच दालचिनीदेखील घालू शकता. आता त्यात दूध घाला आणि काही मिनिटे उकळवा. त्यात तुम्ही केशरदेखील घालू शकता. हळूहळू दुधाचा उग्र,जळका वास कमी होईल. 

विड्याच्या पानांचा वापर

विड्याच्या पानांचा वापर करून आपण दुधाचा जळका वास घालवू शकतो. यासाठी करपलेले दूध दुसऱ्या एका भांड्यात काढून घ्या आणि त्यात थोडी विड्याची पाने घाला. अर्ध्या तासासाठी ही पाने दुधात घालून ठेवा. हळूहळू दुधाचा करपट वास कमी होईल.

इतर उपयोग

आपल्याला हे दूध चहा किंवा खीर यामध्ये वापरण्याची इच्छा होत नसेल, तर पुरी किंवा पराठ्याचे पीठ मळण्यासाठी याचा उपयोग करता येऊ शकतो. किंवा दूध आटवून आपण बासुंदी, रबडी बनवू शकता.

टॅग्स :दूधकिचन टिप्सकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.