Join us  

कितीही लक्ष द्या दूध उतू जातंच? हे 4 उपाय. दूध उतू जाणार नाही..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 6:56 PM

थोडंसं लक्ष इकडे तिकडे गेलं की दूध उतू गेलंच म्हणून समजा. दूध उतू न जाण्यासाठी सोप्या चार युक्त्या आहेत. करुन पहा.

ठळक मुद्देदूध उतू जाऊ नये म्हणून दुधाच्या भांड्याच्या कडेला थोडं बटर किंवा तेल लावावं.बाजारात दूध उतू जाण्यास रोखणारे स्पिल स्टॉपर्स मिळतात. याचाही उपयोग करु शकता.आपल्याकडे डोसे उलटवण्याचा लाकडी चमचा असतोच. या लाकडी चमच्याचा उपयोग करुनही दूध उतू जाण्यापासून वाचवता येतं.

दूध उतू गेलं म्हणायला किती सोपं आहे. पण प्रत्यक्ष दूध उतू गेल्यानंतरची आवरआवरी करणं खूप कठीण. दुधाचं भांडं गॅसवर ठेवलं की ते तापेपर्यंत ओट्याजवळच उभं राहाणं शक्य नसतं. थोडंसं लक्ष इकडे तिकडे गेलं की दूध उतू गेलंच म्हणून समजा. ‘सतत कसं दूध उतू घालवतेस’ असा टोमणा अनेकींना ऐकावा लागतो. टोमण्यापेक्षाही दूध उतू न जाणं महत्त्वाचं. त्यासाठी सोप्या युक्त्या आहेत.

छायाचित्र- गुगल

दूध उतू जात असेल तर

1 . दूध उतू जाऊ नये म्हणून दुधाच्या भांड्याच्या कडेला थोडं बटर किंवा तेल लावावं. थोडं बटर किंवा तेल भांड्याच्या कडेला आणि थोडं आत लावावं. बटर लावणार असेल तर ते जास्त लावू नये. ते लावलं की मग भांड्यात दूध घालून ते मंद आचेवर तापण्यास ठेवावं. या उपायानं दूध जास्त उकळत नाही किंवा जळतही नाही.

2. बाजारात दूध उतू जाण्यास रोखणारे स्पिल स्टॉपर्स मिळतात. याचाही उपयोग करु शकता. स्पिल स्टॉपर्स सिलिकॉन पासून तयार झालेली एक रबर तबकडी असते. ही तबकडी दुधाच्या भांड्यावर नीट ठेवली की दूध उतू जात नाही. ही तबकडी सिलिकॉनपासून तयार झालेली असल्यानं ती विरघळत नाही आणि दूध फाटण्याची वगैरेही चिंता नसते. 

छायाचित्र- गुगल

3. मंद आचेवर दूध तापायला ठेवलं तरी दूध उतू जातंच. यासाठी आणखी एक सोपा उपाय म्हणजे दुधाच्या फेसावर थोडं पाणी शिंपडावं. त्यामुळे वर आलेलं दूध लगेच खाली जातं. विशेषत: हा उपाय बासूंदी करताना जस्त उपयोगाचा ठरतो. दूध सारखं वर येतं आणि सारखं उतू जाण्याचा धोका असतो.

4. आपल्याकडे डोसे उलटवण्याचा लाकडी चमचा असतोच. या लाकडी चमच्याचा उपयोग करुनही दूध उतू जाण्यापासून वाचवता येतं. यासाठी दूध गरम करायला ठेवलं आणि ते गरम होताना दिसलं की भांड्यांवर मधोमध हा लाकडी चमचा आडवा करुन ठेवावा. लाकडी चमच्यामुळेही दूध उतू जात नाही.