सणासुदीचे दिवस आले, की पेढ्यांमध्ये होणाऱ्या भेसळीचे प्रमाण वाढल्याच्या बातम्या नेहमीच कानावर येतात. त्यामुळे मग पेढे घ्यावे की नाही, असा विचार मनात येताे. मग खूप सारे पैसे देऊन असे भेसळीचे पेढे विकत आणण्यापेक्षा घरीच जर पेढे बनवले तर खाण्याची रंगत नक्कीच वाढेल. अगदी सणासुदीच्या दिवशीसुद्धा आपण असे पेढे झटपट घरी तयार करू शकतो आणि देवाला नैवेद्य दाखवू शकतो.
पेढे बनविण्यासाठी लागणारे साहित्यएक ग्लास भरून मिल्क पावडर, एक चतुर्थांश ग्लास तूप, अर्धा ग्लास किंवा त्यापेक्षा कमी साखर, पाऊण ग्लास दुध आणि विलायची पावडर,
पेढे बनविण्याची कृती- पेढे बनविण्यासाठी सगळ्यात आधी तर गॅसवर पॅन तापत ठेवा.- पॅन तापल्यानंतर त्यामध्ये तूप घाला.- पेढे बनविताना आपल्याला गॅस मंदच ठेवायचा आहे. त्यामुळे घाईघाईत ही रेसिपी अजिबात करायला जाऊ नका. अन्यथा मिल्क पावडर करपून जाईल.
- तूप तापल्यानंतर त्यात मिल्क पावडर घाला आणि तिचा रंग बदलेपर्यंत परतून घ्या. - तूप आणि मिल्कपावडर सारखे सारखे हलवत रहा. यामुळे मिल्कपावडर पॅनच्या बुडाशी चिकटणार नाही आणि करपणारही नाही.- मिल्कपावडरला छान तपकिरी रंग आला, की त्यामध्ये दूध घाला.- दुध टाकल्यानंतर पुन्हा हे मिश्रण वारंवार ढवळत रहा.
- मिश्रण बऱ्यापैकी आळून आल्यावर त्यात साखर आणि विलायची पावडर टाका.- ज्यांना साखर कमी आवडते, त्यांनी दिलेल्या प्रमाणापेक्षा कमी घातली तरी चालते.- मिश्रण घट्ट होत आले की गॅस बंद करा.- हे मिश्रण जेव्हा थंड होईल, तेव्हा तळहाताला थोडेथोडे तूप लावा आणि तुम्हाला आवडतील तसे गोलाकार चपटे किंवा लाडूसारखे फुगीर पेढे बनवा.