दूधाला आपण पूर्णान्न म्हणतो, जन्म झाल्यापासून आपण दूध पीत असतो. सुरुवातीचे तर कित्येक महिने आपण फक्त दूधावरच असतो. दूधात सर्वात जास्त पोषक तत्त्व असतात. दूधात कॅल्शियम, प्रथिने, खनिजे असे असंख्य आवश्यक घटक असतात. त्यामुळे दूध हे आहारातील अतिशय महत्त्वाचा पदार्थ असले तरी ते कधी, कसे प्यावे याचे काही नियम आहेत. हे नियम पाळल्यास दूधातून जास्तीत जास्त पोषण मिळणे शक्य होते. ज्यांना पचनाच्या तक्रारी, अस्थमा, हाडांशी निगडीत तक्रारी उद्भवतात अशांनी दूध जरुर प्यावे पण योग्य ती काळजी घेऊन. अनेकदा दूध प्यायल्याने कफ होतो, कफ असताना दूध प्यायल्यास तो वाढण्याची शक्यता असते, दूध पिण्याची योग्य वेळ कोणती, दूध गार प्यावे की गरम, कोणी किती प्यायला हवे असे एक ना अनेक प्रश्न आपल्याला पडत असतात. अशाच काही प्रश्नांची उत्तरे देताहेत आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. संदीप काळे...
१. दूध गार घ्यावे की गरम
शक्यतो दूध गार न घेता कोमट घ्यावे. त्यामुळे त्यातील सर्व पोषक तत्त्वे शरीराला योग्य पद्धतीने मिळण्यास मदत होते. तसेच गार दूधामुळे काहीवेळा कफ होण्याची शक्यता असते. त्यामुळे ज्यांना खूप जास्त उष्णतेचा त्रास आहे अशांनीच अगदी थोड्या प्रमामात गार दूध घेतलेले चालते. मात्र इतरांनी कोमट दूध प्यायलेले केव्हाही चांगले. कोमट दूध हे गार दूधापेक्षा पचनासही हलके असते.
२. दूध कोणत्या पदार्थांसोबत घेणे अयोग्य?
दूध हे कोणत्याही इतर पदार्थांबरोबर घेणे आरोग्यासाठी घातक असते. अनेकदा आपण मिल्कशेक किंवा काही भाज्यांमध्ये दूधाचा वापर करतो. पण दूध आणि इतर पदार्थ यांची एकमेकांमध्ये रासायनिक प्रक्रिया होते आणि त्यापासून शरीराला त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे दूधासोबत फळे एकत्र करणे आरोग्यासाठी घातक ठरु शकते.
३. दूधासोबत कोणते पदार्थ चालतात?
दूधापासून केलेल्या खिरी आरोग्यासाठी अतिशय चांगल्या असतात. यामध्ये रवा, तांदूळ, गव्हाची खीर चालू शकते. तसेच दूधामध्ये खजूर इतर सुकामेवा एकत्र केला तरी चालतो. दूधात तूप किंवा मध घातल्याने त्याचे पोषणत्त्व आणखी वाढते.
४. दूध कोणत्या वेळेला घेतलेले चांगले?
लहान मूल, वयस्कर व्यक्ती आणि बौद्धिक किंवा शारीरिक कष्टाची कामे करणाऱ्यांनी सकाळी लवकर अनुशा पोटी दूध घेतलेले चालते. मात्र त्यानंतर किमान २ तास काहीही खायला नको. मधल्या वेळेतही दूध घेणार असाल तर त्याच्या आधी आणि नंतर दोन तास काहीही खाणे योग्य नाही. रात्रीच्या जेवणानंतर झोपताना दूध घेणार असाल तरीही त्यामध्ये दोन ते तीन तासाचे अंतर असणे आवश्यक आहे.
५. कफ असल्यास दूध घ्यावे का?
कफ असताना दूध घेणार असाल तर ते उकळून घ्यावे. त्यामध्ये सुंठ पावडर घातल्यास कफ होत नाही. तसेच काढ्याप्रमाणे त्यात तुळस, पुदीना, आलं घालून उकळल्यास या दूधामुळे कफ होत नाही आणि ते पचायलाही हलके होते. त्यामुळे कफ असताना तुम्ही कमी प्रमाणात आणि या गोष्टी घालून दूध नक्की पिऊ शकता.