औषधी आणि बहुगुणी वनस्पती म्हणून पुदिना ओळखला जातो. पुदिना आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असूनही अनेक स्वयंपाक घरात पुदिना फक्त पाणीपुरी बनविण्यापुरताच आणला जातो. वर्षभर अगदी मुबलक प्रमाणात उपलब्ध असणाऱ्या पुदिन्याचे सेवन भरपूर प्रमाणात केले पाहिजे, असे आहारतज्ज्ञ आवर्जून सांगतात. म्हणूनच आज पुदिन्याचा ठेचा या चटपटीत रेसिपीपासून सुरूवात करूया आणि आठवड्यातून दोन- तीन दिवस का होईना, पण भरपूर प्रमाणात पुदिना खाऊया.
हेल्दी पुदिन्याचा चटपटीत ठेचासाहित्यपुदिना, कोथिंबीर, लसून, हिरव्या मिरच्या, लिंबू, मीठ, तेल, मोहरी, जीरे, गुळ, हिंग
कृती१. सगळ्यात आधी कोथिंबीर आणि पुदिन्याची पाने स्वच्छ धुवून जरा कोरडी करून घ्या.२. जेवढा पुदिना घेतला तेवढीच कोथिंबीर घ्यावी.३. ठेचा असल्याने तो जरा झणझणीतच हवा. म्हणून साधारणपणे ८ ते १० हिरव्या मिरच्या तव्यावर तेल टाकून पाच मिनिटे परतू द्या. तुमच्या तिखट खाण्याच्या प्रमाणानुसार तुम्ही मिरच्यांची संख्या कमी जास्त करू शकता.४. पुदिना, कोथिंबीर, परतलेल्या मिरच्या, जीरे, लसूणाच्या ५ ते ६ पाकळ्या आणि एक टेबल स्पून गुळ हे मिश्रण चवीनुसार मीठ टाकून मिक्सरमधून बारीक करून घ्या.५. हे वाटण एका वाटीत काढा, त्यामधे अर्धे लिंबू पिळा आणि वरून मोहरी व हिंग टाकून खमंग फोडणी द्या.६. पुदिन्याचा चमचमीत ठेचा झाला तयार.
आरोग्यदायी पुदिना खाण्याचे फायदे१. पोटदुखीवर सर्वोत्तम इलाज म्हणजे पुदिना.२. पुदिना नियमित खाल्ला तर सर्दी, खाेकला, वातदोष, पित्त, दातदुखी यासारखे जुनाट आजार दुर होतात.३. पुदिन्यात भरपूर प्रमाणात असलेले फायबर कोलेस्टरॉल कमी करण्यास मदत करते.४. पुदिन्यातील मॅग्नेशियम हाडांना बळकटी देते.५. पुदिना खाल्ल्यामुळे मासिक पाळीत होणाऱ्या त्रासापासूनही आराम मिळतो.६. हिरड्या मजबूत करणे, तोंडाची दुर्गंधी घालविणे यासाठीही पुदिना उपयुक्त ठरतो.