भजी म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं. त्यात आता पावसाळा सुरू झालाय सगळ्यांच्याच घरात भजीचे वेगवेगळे प्रकार तयार केले जातात. नाष्त्यासाठी बटाटा भजी, कांदा भजी तर जेवताना तोंडी लावण्यासाठी मिरचीच्या भजी हमखास बनवल्या जातात. विशेष म्हणजे जर रात्री भजी बनवल्या असतील तर तुम्ही सकाळीसुद्धा खाऊ शकता. तुम्ही अनेकदा पाहिलं असेल मिरचीच्या भजी वडापाव किंवा भजी विक्रेत्याकडून आपण घेतल्या तर त्या फार फुगलेल्या मस्त खमंग लागतात. एक, दोन खाल्यानंतरसुद्धा मन भरतं.
पण घरात जेव्हा भजी तयार करण्याची वेळ येते तेव्हा त्या तश्या बनतच नाहीत. फुगणं तर सोडाच पण कुरकुरीतपणाही कमी येतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला घरच्याघरी भजी तयार करण्याची रेसेपी सांगणार आहोत. अशा प्रकारे तयार केलेल्या भजी तुम्हाला आणि घरच्या मंडळींना खूप आवडतील. मग जाणून घेऊया काय आहे साहित्य आणि कृती.
साहित्य
८ ते १० जाड मिरच्या
३/४ कप चण्याच्या डाळीचं पीठ
१ टेस्पून तांदळाचं पीठ
१/४ टीस्पून हळद
चिमूटभर खायचा सोडा
चवीपुरते मीठ
तळण्यासाठी तेल
कृती:
१) मिरच्या धुवून घ्या. एका बाजूने चीरून आतील बिया काढाव्यात.
२) बेसन, तांदूळ पीठ, हळद, मीठ एकत्र करून घ्यावे. त्यात साधारण पाउण कपापेक्षा थोडे कमी पाणी घालून पीठ भिजवावे. सोडा घालून मिक्स करावे. पिठाची कन्सिस्टन्सी थोडी दाटसर असावी. वाटल्यास ओवा सुद्धा घालू शकता.
३) तळणीसाठी तेल तापत ठेवावे. मिरच्या पिठात बुडवून नीट कोट करून घ्याव्यात. मध्यम आचेवर टाळाव्यात.
गरमागरम सर्व्ह कराव्यात.
भजी कुरकुरीत येण्यासाठी टिप्स
1) कोणत्या प्रकारच्या मिरच्या वापरत आहात त्यावर आतील बिया काढायच्या कि नाही ते ठरवा. जर मिरच्या खूप तिखट असतील तर बिया काढाव्यात. जास्त बारीक मिरच्या असतील तर बिया काढू नका. जाड मिरचीतील बिया स्टफिंग दरम्यान काढू शकता.
२) खूप जाड सालीच्या मिरच्या वापरू नये. त्या तळल्यावर पटकन शिजत नाहीत आणि भजी कचकचीत लागतात.
३) पीठात जास्त पाणी घालू नये. नाहीतर मिरचीला व्यवस्थित पीठ लागत नाही.