Join us  

गावाकडे केला जाणारा हिरव्या मिरचीचा चविष्ट ठेचा, तोंडाला चव आणणारा झक्कास पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2023 11:07 AM

Mirchi Thecha Recipe : परफेक्ट होण्यासाठी त्यातील सगळे जिन्नस योग्य प्रमाणात घ्यावे लागतात.

पावसाळ्याच्या दिवसांत आपण वर्षा सहलीला जातो. बाहेर पडणारा धुवाधार पाऊस आणि गारवा यांमुळे अनेकदा आपल्याला सडकून भूक लागते. आजुबाजूला हॉटेल नसेल तर आपण एखाद्या ढाब्यावर किंवा घरगुती खानावळीत जेवायला जातो. अशावेळी पिठलं भाकरी किंवा अगदी साध्या वरण भातासोबत आवर्जून दिला जाणारा पदार्थ म्हणजे हिरव्या मिरचीचा ठेचा. भर पावसात ताटात गरमागरम वरण भात, त्यावर तूपाची धार आणि लिंबू असेल की पुरे होते. अशावेळी या वरण भातासोबत किंवा सकाळच्या घाईत गरम पोळीसोबत खायला हिरव्या मिरचीचा झणझणीत ठेचा असेल तर तोंडाला चांगलीच चव येते. आपण हा ठेचा घरी कित्येकदा ट्राय करतो पण तो आपल्याला हवा तसा होतोच असे नाही. कारण ठेचा करायला सोपा वाटत असला तरी तो परफेक्ट होण्यासाठी त्यातील सगळे जिन्नस योग्य प्रमाणात घ्यावे लागतात.   पाहूयात हा ठेचा एकदम चविष्ट होण्यासाठी नेमकं काय करायचं (Mirchi Thecha Recipe). 

साहित्य -

१. मिरच्या - १२ ते १५

२. लसूण पाकळ्या - अर्धी वाटी 

(Image : Google)

३. मीठ - चवीनुसार 

४. जीरे - अर्धा चमचा 

५. कोथिंबीर - अर्धी वाटी 

६. तेल - पाव वाटी

७. दाणे - पाऊण वाटी 

कृती -

१. एका पॅनमध्ये तेल घालून त्यात मिरच्या आणि लसूण चांगले भाजून घ्यायचे. 

२. त्याचा रंग बदलायला लागला की त्यामध्ये मीठ, जीरे आणि कोथिंबीर घालायची. 

३. थोडा वेळ हे सगळे चांगले परतून घ्यायचे आणि मग शेवटी भाजलेले, सालं काढलेले शेंगदाणे यामध्ये घालायचे आण हे सगळे पुन्हा चांगले परतून घ्यायचे. 

४. थोडे गार झाल्यावर घरात असणाऱ्या लहान खलबत्त्यामध्ये हे चांगले कुटून घ्यायचे. 

५. हे मिश्रण मिक्सर केले तरी चालते पण मिक्सरपेक्षा खल-बत्त्यामध्ये कुटले तर ते जास्त छान लागते. 

६. थोडा ओबडधोबड असलेला हा ठेचा अतिशय छान लागतो. तुम्हाला जास्त तिखट नको असेल तर मिरची कमी तिखटाची किंवा अर्धी तिखटाची आणि अर्धी कमी तिखटाची घेतली तरी चालते.

७. तिखटपणा कमी होण्यासाठी यावर वरुन थोडा लिंबाचा रस पिळायचा आणि पुन्हा थोडे तेल गरम करुन घालायचे. 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.