राजगिरा सगळ्यांना माहित असतो. पण राजगिरा लाडू, चिक्की उपवासाला खावी यापलिकडील त्यातले बारकावे मात्र जाणून घेण्याचा प्रयत्न होत नाही. त्यामुळेच राजगिरा आपल्या रोजच्या आहाराचा भाग होत नाही. कधीतरी राजगिरा खाल्ला जात असल्यानं त्यातले फायदे शरीराला मिळत नाही. राजगिरा आपल्या आरोग्यासाठी किती आणि का महत्त्वाचा असतो याकडे माजी मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर हिच्या पोषण तज्ज्ञ नमामी अग्रवाल यांनी लक्ष वेधलं आहे. आपल्या रोजच्या आहारात राजगिरा आपण वेगवेगळ्या प्रकारे समाविष्ट करुन खाऊ शकतो. हे प्रकार चविष्ट तर असतातच शिवाय पौष्टिकही असतात.
राजगिरा असतो पौष्टिक
राजगिर्यात मॅग्नीज, मॅग्नेशियम, फॉस्फरस, लोह भरपूर प्रमाणात असतं. राजगिरा म्हणजे फायबर आणि प्रथिनांचा मोठा भांडार आहे . राजगिर्याचा उपयोग वजन कमी करण्यासाठी होतो. कारण राजगिर्याचे पदार्थ खाल्ले की पोट भरपूर वेळ भरल्यासारखं राहातं. नमामी अग्रवाल यांच्या मते रोजच्या आहारात राजगिर्याचा एक जरी पदार्थ असला तरी तो आपल्या शरीरात एका जादू सारखं काम करतो. राजगिरा आपल्या आहारात समाविष्ट करण्याचे विविध पर्याय आहेत. ते कोणते हे देखील अग्रवाल यांनी सांगितले आहेत.
छायाचित्र- गुगल
राजगिरा कटलेट
हा एक अतिशय चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ आहे. स्नॅक्स किंवा नाश्ता स्वरुपातही तो खाता येतो. वजन कमी करण्यासाठी म्हणून हा पदार्थ खायचा असेल तर मग तो तळण्यापेक्षा सोनेरी रंगावर भाजून घ्यावेत.राजगिरा कटलेट करण्यासाठी 6 उकडलेले बटाटे, 150 ग्रॅम राजगिरा पीठ, दोन हिरव्या मिरच्या, 2 चमचे किसलेलं आलं, पाव कप कोथिंबीर, मीठ, जिरे, लाल तिखट, धने पावडर, गरम मसाला आणि तेल हे जिन्नस घ्यावं.एका भांड्यात राजगिरा पीठ, उकडलेले बटाटे आणि तेल सोडून इतर सर्व साहित्य एकत्र करुन घ्यावेत. कणीक मळतो तसं हे मिश्रण मळून घ्यावं. मिश्रणाचा एक मोठा गोळा घ्यावा. तो हातावर गोल फिरवून तळ हाताच्या मधे ठेवून दाबावा. तवा गरम करुन त्यावर तेल घालावं. तेल गरम झालं की कटलेट दोन्ही बाजूंनी सोनेरी रंगावर भाजून घ्यावेत. भाजताना वर थोडं तेल घालावं त्यामुळे हे कटलेट कुरकुरीत होतात. कटलेट भाजून झालेत की ते पेपर टॉवेलवर काढून थोडा वेळ ठेवावेत. त्यामुळे पेपरमधे तेल शोषलं जातं.
छायाचित्र- गुगल
राजगिरा दलिया
सकाळच्या नाश्त्यासाठी हा उत्तम पदार्थ आहे. पोटही भरतं आणि हा दलिया पौष्टिक आणि चविष्टही लागतो. राजगिरा दलियाचं पोषणमूल्यं वाढवण्यासाठी त्यात विविध भाज्या घालाव्यात.राजगिरा दलिया करण्यासाठी 1 वाटी राजगिरा, 2 उकडलेले बटाटे, 2 चमचे दाण्याचा कूट, 2 हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, 1 चमचा जिरे, 1 चमचा मिरे पावडर, 1 चमचा मीठ आणि 1 चमचा तूप घ्यावं. राजगिरा एक तास पाण्यात भिजत घालावा. जितका राजगिरा घेतला तितकंच त्यात पाणी घालून तो कुकरमधे दोन तीन शिट्या घेऊन शिजवून घ्यावा. बटाटे कुस्करुन घ्यावेत. कढईत तूप गरम करावं. त्यात जिरे, मिरची, कढीपत्ता घालावा. त्यात शिजवलेला राजगिरा, बटाटा घालावा. ते परतून घेतल्यावर त्यात मीठ, मिरे पूड घालावी. शेवटी लिंबू रस आणि कोथिंबीर घालावी. यात आपल्याला आवडेल त्या भाज्या आपण घालू शकतो.
छायाचित्र- गुगल
राजगिरा पॅनकेक
यासाठी 2 कप राजगिरा पीठ, 2पिकलेली केळं, गरम केलेलं दूध एवढंच जिन्नस घ्यावं. एका भांड्यात राजगिरा पीठ घ्यावं. त्यात पिकलेली केळं कुस्करुन घ्यावीत आणि दाटसर मिश्रण तयार होईल एवढं दूध घालावं. ब्लेण्डरनं हे मिश्रण फिरुन घ्यावं. तव्यावर थोडं तेल घालून ते पसरुन घ्यावं. गोल चमच्यानं मिश्रण तव्यावर घालून चमच्याच्या बुडानं गोल पसरवून घ्यावं. पॅनकेकला बुडबुडे आले की पॅनकेक उलटून दुसर्या बाजूने सोनेरी रंगावर भाजून घ्यावा.
छायाचित्र- गुगल
राजगिरा सलाड
हा अतिशय पौष्टिक पदार्थ आहे. यासाठी 1 वाटी राजगिरा लाह्या, 1 कप दूध, 2 चमचे साय, 1 चमचा मध, मोसंबी, केळी, चिकू, अक्रोड, बदाम आणि पिस्ते घ्यावेत. आधी दूध गरम करुन ते कोमट होवू द्यावं. फळं सोलून त्याचे बारीक काप करुन घ्यावेत. फळांमध्ये राजगिरा लाह्या घालून त्या एकत्र कराव्यात. मग त्यात अक्रोड, पिस्ते, बदाम बारीक तुकडे करुन घालावेत. नंतर दूध , साय आणि मध एकत्र करुन ते फळ आणि राजगिरा लाह्यांच्या मिश्रणावर ओतावं. ते पुन्हा चांगलं हलवून घ्यावं. थोडा वेळ फ्रीजमधे ठेवून थंड होवू द्यावं.
छायाचित्र- गुगल
राजगिरा पराठा
राजगिरा पराठा करण्यासाठी 1 कप राजगिरा , दोन उकडलेले बटाटे, 3-4 चमचे तूप, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि मीठ घ्यावं.सर्वात आधी राजगिरा निवडून धुवून घ्यावा. तो मिक्सरमधून बारीक करुन घ्यावा. राजगिर्याचं पीठ एका ताटात काढून घ्यावं. त्यात उकडलेले बटाटे किसून घालावेत. त्यात एक चमचा तूप, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि मीठ घालून पीठ मळावं. हे पीठ मळताना पाणी एकदम घालू नये. लागेल तसा पाण्याचा हात लावावा. दोन चमचे पाणीही पुरेसं होतं. हा पराठा करताना गोळा हातावर घेऊन थोडा थापावा आणि मग पोळपाटावर आरारुटमधे घोळून हलक्या हातानं लाटावा. तव्यावर तूप घालून मराठा दोन्ही बाजुंनी लालसर भाजावा.