थंडीच्या दिवसांत बाजारात मटार, गाजर, फ्लॉवर यांसारख्या भाज्या अगदी फ्रेश आणि भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात. थंडीत तब्येत कमावण्यासाठी भरपूर आणि पौष्टीक खाणं गरजेचं असतं. वर्षभरासाठी तब्येत कमवून घ्यायची तर या काळात ऊर्जा देणारे आणि शरीराला पोषण देणारे पदार्थ खायला हवेत. एरवी आपण आंब्याचे, लिंबाचे, आवळ्याचे अगदी मिरचीचेही लोणचे करतो. पण थंडीच्या दिवसांत भाज्या भरपूर प्रमाणात उपलब्ध असल्याने कच्च्या भाज्यांचे लोणचे खूप भाव खाऊन जाते. कमी दिवस टिकणारे पण अतिशय चविष्ट आणि पौष्टीक असलेले हे लोणचे आपण खिचडी, पोळी, उपमा अशा कशासोबतही खाऊ शकतो. यामुळे जेवणाची लज्जत तर वाढतेच पण नकळत सगळ्या भाज्याही पोटात जायला मदत होते. पाहूयात हे चमचमीत लोणचं झटपट कसं करायचं (Mix Veg Pickle Recipe)...
साहित्य -
१. फ्लॉवर - २ वाट्या
२. मटार - २ वाट्या
३. गाजराचे काप - १ वाटी
४. फरसबी (श्रावण घेवडा) - १ वाटी
५. मोहरी - १ चमचा
६. तेल - २ चमचे
७. तिखट - १ चमचा
८. मीठ - अर्धा चमचा
९. साखर - १ चमचा
१०. हळद - अर्धा चमचा
११. हिंग - पाव चमचा
१२. आमचूर पावडर - अर्धा चमचा
कृती -
१. सगळ्या भाज्या स्वच्छ धुवून कोरड्या करुन बारीक चिरुन घ्यायच्या.
२. सगळ्या भाज्या एकत्र करुन यामध्ये मीठ, साखर, तिखट, आमचूर पावडर घालून हे मिश्रण चांगले एकत्र करायचे.
३. गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेल घालायचे.
४. तेल चांगले तापले की त्यामध्ये मोहरी आणि हिंग-हळद घालायचे.
५. ही गरम फोडणी लोणच्यावर घालून लोणचे परत एकजीव करायचे.
६. रात्रभर हे लोणचे झाकण ठेवून मुरत ठेवायचे.
७. नंतर हवाबंद बरणीत भरुन हे लोणचे फ्रिजमध्ये ठेवून द्यायचे.
८. फ्रिजमध्ये हे लोणचे महिनाभर चांगले राहते. आंबट-गोड आणि थोडे तिखट चवीचे हे लोणचे कशासोबतही अतिशय छान लागते.