आंबा हा फळांचा राजा मानला जातो. वर्षातून एकदा येणाऱ्या या फळाला बाजारपेठेत आणि लोकांच्या मनात तितकेच मानाचे स्थान असते. उन्हाळ्याच्या सिजनमध्ये येणाऱ्या या गोड आंब्याची चव चाखण्यासाठी आपण सगळेच आतुर असतो. आपल्यापैकी काहीजणांना तर या सिजनची पहिली आंब्याची पेटी घरी कधी येते ? आणि त्यातील आंबे आपण कधी खातो असेच होते. असं पहायला गेलं तर आंबा हे फळ तसे महागच असते. परंतु आंबा कितीही महाग असला तरीही जी असेल ती किंमत मोजून आपण आंबा खरेदी करतो आणि खातो. या आंब्याच्या एक - दोन नाही तर असंख्य प्रकारच्या जाती आहेत, यातील प्रत्येक जातीच्या आंब्याच्या चवीत स्वतःची अशी एक वेगळी विशेषत: आहे.
सध्या सोशल मीडियावर अशाच एका आंब्याच्या विशेष जातीची चर्चा होताना दिसत आहे. नुकताच चर्चेत असलेला हा आंबा सर्वात महागडा आंबा म्हणून ओळखला जात आहे, कारण इंटरनेटवर या फळाबद्दलच्या पोस्ट्सचा पूर आला आहे. सिलीगुडीतील एका आंबा महोत्सवात टिपलेल्या या आंब्याचे फोटोज आणि त्याची किंमत नेटकऱ्यांमध्ये खूपच व्हायरल होताना दिसत आहे. नेमकी या आंब्याची खरी किंमत किती आहे ? हा आंबा नेटकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय का झाला आहे? हे पाहूयात(Miyazaki: World's most expensive mango kilo showcased in Siliguri Mango festival).
काय आहे या आंब्याची नेमकी भानगड...
एएनआयच्या (ANI) अधिकृत ट्विटर हँडलवर या महागड्या आंब्याची छायाचित्रे पोस्ट करण्यात आली आहेत. पश्चिम बंगाल येथील सिलिगुडी येथे आंबा महोत्सवाच्या तीन दिवस चालणाऱ्या ७ व्या आवृत्तीत आंतरराष्ट्रीय बाजारात ₹ २.७५ लाख प्रति किलो किंमतीचा जगातील सर्वात महागडा आंबा 'मियाझाकी' (Miyazaki) प्रदर्शित झाला. असोसिएशन फॉर कॉन्झर्व्हेशन अँड टुरिझम (ACT) सह मॉडेला केअरटेकर सेंटर अँड स्कूल (MCCS) द्वारे आयोजित सिलीगुडी येथील मॉलमध्ये ९ जून रोजी या आंबा महोत्सवाला सुरुवात झाली. महोत्सवात २६२ हून अधिक जातींचे आंबे प्रदर्शित केलेले आहेत. या महागड्या आंब्यासंदर्भातील पोस्ट काही तासांपूर्वी शेअर करण्यात आली होती. ट्विट केल्यापासून, शेअरला जवळपास १.६ लाख व्ह्यूज मिळाले आहेत. याव्यतिरिक्त, शेअरला जवळपास १,४०० हुन अधिक लाईक्स जमा झाले आहेत. मियाझाकीच्या छायाचित्रांवर प्रतिक्रिया देताना लोकांनी विविध टिप्पण्या पोस्ट केल्या.
आंबा खाल्ल्यावर लगेच खाऊ नयेत असे ५ पदार्थ, बिघडेल पोट-सांभाळा....
जाणून घ्या जगातील सर्वात महाग आंब्याबद्दल ...
मियाझाकी हा एक प्रकारचा “इरविन” आंबा आहे जो दक्षिणपूर्व आशियात मोठ्या प्रमाणात पिकवण्यात येणाऱ्या पिवळ्या पेलिकन आंब्यापेक्षा वेगळा आहे, असे जपानी व्यापार संवर्धन केंद्राचे म्हणणे आहे. मियाझाकीचे आंब्यांची संपूर्ण जपानमध्ये विक्री केली जाते. हे आंबे अँटिऑक्सिडंटमध्ये समृद्ध असतात आणि त्यात बीटा-कॅरोटीन आणि फॉलिक अॅसिड असते, जे डोळ्यांसाठी उत्तम आहे, असे रेड प्रमोशन सेंटरने सांगितले. ते दृष्टी कमी होण्यापासूनही रोखण्यात देखील ते मदत करतात. मियाझाकी आंब्याच्या निर्यातीपूर्वी कठोर तपासणी आणि चाचणी घेतली जाते. त्यातील उत्तम आंब्यांना “एग ऑफ द सन” म्हणतात. हे आंबे बर्याचदा लाल रंगाचे असतात आणि त्यांचा आकार डायनासोरच्या अंड्यांसारखा दिसतो.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया...
या आंब्याचे फोटोज आणि चर्चा ऐकल्यानंतर नेटकऱ्यांनी या पोस्टवर कमेंट्स करायला सुरुवात केली आहे. एका नेटकाऱ्याने कमेंटमध्ये लिहिले आहे की, मी आता सोन्यापेक्षा आंबा खरेदीमध्येच जास्त गुंतवणूक करणार आहे. तर दुसऱ्या वापरकर्त्याने म्हंटले आहे की, आमचा वर्षाचा पगार देखील इतका नाही जितकी या आंब्याची किंमत आहे. एका युजरने, हा आंबा नक्की खायचा आहे की शोभेची वस्तू म्हणून बघण्यासाठी ठेवायचा आहे? असा प्रश्न केला आहे. हा आंबा फक्त बघूनच खुश व्हायचं आहे, अशी कमेंट एका नेटकाऱ्याने केली आहे.