पाऊस सुरु झाला की सारा आसमंत तर बदलतोच पण आसमंतासोबतच आपले विचार,आपली आवड निवडही बदलते. सर्व गोष्टीत पावसामुळे प्रसन्नता डोकावत असते. नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं करण्याचा, वेगळं खाण्याचा मूड असतो. पावसाळी वातावरणाचा नूर बघून मुद्दाम काही गोष्टी केल्या जातात. सभोवार हिरवळ पसरते आणि आसमंतही खास पावसाळ्यातल्या विशिष्ट वासानं, सुगंधानं भारलेला असतो. यात काही विशिष्ट पदार्थांच्या सुगंधाचाही दरवळ असतो. पाऊस पडतोय म्हणून आपल्याकडे कांदा भजी, बटाटा भजी केले जातात. या भजींचा खमंग दरवळ कोणाच्याही तोंडात पाणी आणतो. पाऊस आणि भजी असं एक समीकरण झालं आहे; पण ते फक्त आपल्यापुरतं. आपल्याच देशात पावसाचं स्वागत केवळ भजींनीच करतात असं नाही. पाऊस सुरु झाला म्हणून त्या त्या भागात परंपरेनुसार खास चवीचे विशिष्ट पदार्थ केले जातात. सगळीकडे पडणाऱ्या पावसाचा स्वभाव जसा वेगळा तसंच या पदार्थांचंही. राजस्थान, दक्षिणेकडील राज्य, छत्तीसगड, दिल्ली, ईशान्येकडील राज्य या भागात पावसाचं स्वागत 5 वेगवेगळ्या पदार्थांनी (monsoon special food) केलं जातं. हे पदार्थ म्हणजे त्या त्या राज्यांची पावसळ्यातली खास ओळख आहे.
Image: Google
परिप्पू वडा
दक्षिणेकडील राज्यात पावसाळ्यात परिप्पू वडा करण्याची पध्दत आहे. हरभरा डाळ आणि तूर डाळीपासून हे परिप्पू वडा तयार केला जातो. काही तास या डाळी भिजवून, नंतर त्या ओबडधोबड वाटल्या जातात. त्यात कांदा, आलं, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता टाकून त्याचे छोटे छोटे गोळे करुन वडे तयार केले जातात आणि तेलात तळून घेतले जातात. या खुसखुशीत परिप्पू वड्यांचा भरपावसात आनंद घेतला जातो.
Image: Google
आमट
छत्तीसगडच्या बस्तर भागात आमट नावाचं सांभार केला जातो. यात अनेक भाज्या घातल्या जातात. कोवळे बांबूंमुळे या आमटला विशिष्ट चव येते. आमट करताना छोले, तांदूळ, लाल मिरच्या , टमाटा, चिंच, कांदा, लसूण आलं हिरव्या मिरच्या यांचा वापर केला जातो. पावसाळ्यात छत्तीसगडमधील घराघरात हे विशिष्ट चवीचं आमट केलं जातं. घरी पाहूणे आल्यानंतर खास पाहुणचार म्हणूनची हे आमट केलं जातं.
Image: Google
घेवर
राजस्थानमध्ये पावसाळ्यात केला जाणारा हा गोड पदार्थ. गोल आणि जाळीदार घेवर वेगवेगळ्या पध्दतीनं केलं जातं. साजूक तूप, मैदा, दूध साखरेचा पाक वापरुन घेवर केले जातात. हे घेवर रबडीसोबतही खाल्ले जातात. घेवर हा केवळ राजस्थानपुरताच मर्यादित पदार्थ नसून हरयाणा, दिल्ली, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशातही केले जातात. राजस्थानात घेवर पावसाळ्यातील सणांसाठी केला जातो.
Image: Google
शिंगाड्याची भाजी
पावसानं जसं आल्हाददायक वातावरण निर्माण होतं तसंच पावसाळ्यातल्या ओल्या दमट वातावरणामुळे सर्दी कफ आणि इतर संसर्गजन्य आजारही होतात. शरीराला या काळात पोषणाची गरज असते. त्यासाठी दिल्लीत पावसाळा सुरु झाला की ओल्या शिंगाड्याची भाजी करण्याची पध्दत आहे. ओले शिंगाडे, बेसन पीठ, कांदा, टमाटा, आलं लसूण पेस्ट, हिरव्या मिरच्या, कढीपत्त्याची पानं, गरम मसाला, साखर, मोहरी आणि हिंग हे मसाले वापरुन शिंगाड्याची रस्सेदार भाजी केली जाते. पावसाळ्यातली पौष्टिक भाजी म्हणून ती ओळखली जाते.
Image: Google
याजे
ईशान्य भारतात पावसाळा सुरु झाला की याजे हे पेयं पिण्याची पध्दत आहे. येथील आदिवासी लोकांचा या पेयामुळे शरीर-मनाला मिळणाऱ्या विशिष्ट ताकदीवर विश्वास आहे. आयाहुआस्का नावाच्या वनस्पतीचा याजे हे पेयं बनवताना वापर केला जातो. या वनस्पतीची पानं, झाडाची सालं, देठ या सगळ्यांसोबतच इतरही काही औषधी वनस्पती टाकून याजे हे पेयं तयार केलं जातं.