Join us  

उडीद डाळ पचायला जड, करा मुगाचे कुरकुरीत पापड- पचायला हलके, तोंडी लावायला उत्तम रेसिपी..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2023 1:58 PM

Moog Dal Papad Recipe Valvan : उन्हाळ्याचा दिवस मोठा असल्याने वर्षभर लागतील असे साठवणीचे प्रकार करता येतात.

पापड हा आपल्या आहारातील एक महत्त्वाचा घटक. घरात खिचडी केली असेल किंवा भाजी कंटाळवाणी असेल तर आपण तोंडी लावायला पटकन पापड भाजतो. सणावाराला गोडाधोडाचा स्वयंपाक असेल तर आपल्याकडे आवर्जून पापड-कुरडई तळले जाते. हॉटेलमध्ये गेलो तरी पुढची ऑर्डर येईपर्यंत आपण आधी मसाला पापड मागवतो. असा हा पापड अनेक वर्षांपासून घरोघरी उन्हाळ्याच्या वाळवणांमध्ये आवर्जून केला जातो. साधारणपणे आपण उडदाच्या डाळीचे पीठ करुन ते भिजवून त्यापासून पापड करतो. मात्र उडीद डाळ पचायला जड असते. हा पापड खाल्ल्यानंतर पचायला कित्येक तास लागतात असे काही संशोधनांतूनही समोर आले आहे. त्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरीक किंवा ज्यांना पचनाशी निगडीत तक्रारी आहेत त्यांनी हा पापड खाल्ला तर त्यांना त्रास होण्याची शक्यता असते. अशावेळी मूग डाळ आणि उडीद डाळ असा पापड केला तर तो पचायला नक्कीच हलका होतो. पाहूयात या पापडाची सोपी रेसिपी (Moog Dal Papad Recipe Valvan)...

साहित्य - 

१. मूग डाळ -  ३ वाट्या 

२. उडीद डाळ - १ वाटी 

(Image : Google)

३. मीरपूड - १ चमचा 

४. मीठ - आवडीनुसार 

५. पापड खार - २ चमचे

६. सोडा - अर्धा चमचा 

७. तेल - १ वाटी 

८. हिंग - अर्धा चमचा 

कृती - 

१. मूगाची डाळ आणि उडदाची डाळ यांचे बारीक पीठ करुन घ्या.

२. यामध्ये मिरपूड आणि सोडा घालून हे पीठ बाजूला ठेवा.

३. एका पातेल्यात १ कप पाणी घेऊन त्यात हिंग, मीठ, पापड खार घालून ते चांगले उकळा.

४. एकत्र केलेल्या पीठात हे गरम केलेले पाणी आणि अंदाजे तेल घालून घट्टसर पीठ मळून घ्या.

५. पीठाचा गोळा मळून झाला की त्यावर पुन्हा तेल लावा आणि सुती कपडा थोडा ओलसर करुन हे पीठ ३ ते ४ तास झाकून ठेवा. 

६. त्यानंतर याच्या लहान आकाराच्या बोट्या तयार करुन पातळ पापड लाटा. 

७. मोठ्या प्लास्टीकच्या कागदावर किंवा सुती कपड्यावर हे पापड वाळण्यासाठी ठेवा. हलक्या उन्हात ठेवले की हे पापड चांगले वाळतात. 

८. नंतर डब्यात भरुन ठेवले तरी चालतात, हवे तेव्हा आपण हे पापड तळून किंवा भाजून खाऊ शकतो. 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.