ढोकळा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर डाळीच्या पीठाचा किंवा पांढरा रव्याचा ढोकळा येतो. बहुतांश वेळा हरभरा डाळीचाच ढोकळा केला जातो. हरभरा पचायला थोडा जड असल्याने अनेकांना हा ढोकळा बाधण्याची शक्यता असते. पण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच हा ढोकळा इतका जास्त आवडतो की तो समोर आला की आपला स्वत:वर ताबाच राहत नाही आणि ढोकळ्यावर ताव मारला जातो. बाहेरुन विकत आणलेल्या ढोकळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात सोडा घातलेला असल्याने तो भरपूर फुगलेला आणि जाळीदार असतो. असा फुगलेला ढोकळा खाऊन पोटाला त्रास व्हायची शक्यता असते. त्यापेक्षा घरच्या घरीच झटपट ढोकळा केला तर? घरी ढोकळा करायचा म्हणजे त्यामध्ये आपण थोडे बदल नक्कीच करु शकतो. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना सहज पचेल आणि खायला हलका अशा मूगाच्या डाळीचा ढोकळा केला तर? हा ढोकळाही नेहमीच्या ढोकळ्याइतकाच चविष्ट होत असल्याने आपण तो नक्कीच ट्राय करु शकतो. आता हा ढोकळा करण्यासाठी नेमकं काय करायचं पाहूया (Moong dal Dhokla Recipe)...
साहित्य -
१. मूग डाळ – १ वाटी
२. उडीद डाळ – अर्धी वाटी
३. दही - २ चमचे
४. मीठ – चवीनुसार
५. कडीपत्ता - ५ ते ६
६. आलं - १ इंच
७. हिरवी मिरची - २
८. रवा - अर्धी वाटी
९. तेल – २ चमचे
१० इनो - अर्धे पाकीट
११. लिंबाचा रस – २ चमचे
१२. मोहरी - १ चमचा
१३. तीळ – १ चमचा
१४. हिंग – चिमूटभर
१५. साखर – १ चमचा
कृती -
१. मूग डाळ आणि उडीद डाळ ३ ते ४ तास भिजत घालायची.
२. मग या डाळी, दही, मिरची, आलं, कडीपत्ता, मीठ सगळं मिक्सरच्या भांड्यात घालून त्याचं बारीक पीठ करुन घ्यायचं.
३. मग हे पीठ एका भांड्यात काढून घ्यायचं आणि काही वेळ झाकून ठेवायचं.
४. त्यानंतर यामध्ये रवा आणि तेल घालून ते एकजीव करुन घ्यायचे.
५. मग या पीठात इनो आणि थोडं पाणी घालून ते पुन्हा सारखं करुन घ्यायचं.
६. मग एका भांड्यात किंवा थाळीत हे पीठ घालून ते कढईत किंवा कुकरमध्ये १५ ते २० मिनीटे लावायचे.
७. गॅस बंद केल्यावर थाळी किंवा भांडे बाहेर काढून थोडे गार होऊ द्यायचे.
८. कढईमध्ये तेल घेऊन त्यात मोहरी, तीळ, मिरच्या, कडीपत्ता, हिंग घालून चांगली फोडणी करायची.
९. फोडणी तडतडली की गॅस बंद करुन त्यात थोडं पाणी आणि साखर घालायची.
१०. ही गरमागरम फोडणी ढोकळ्यावर घालायची आणि ढोकळ्याचे एकसारखे काप करुन तो खायला घ्यायचा.
११. हिरवी चटणी, चिंचेची चटणी यांसोबत हा ढोकळा अतिशय छान लागतो.
१२. आवडीनुसार वरुन ओलं खोबरं आणि कोथिंबीर घालायची.