थंडीच्या दिवसांत आपली भूक थोडीशी वाढलेली असते. इतकेच नाही तर या काळात आपण जे खातो ते अगदी सहज पचते. त्यामुळे आपण नेहमीपेक्षा थोडे तेलकट, गोड पदार्थ या काळात आवर्जून खाऊ शकतो. हवेत गारठा असल्याने पचनक्रिया सुरळीत राहण्यास मदत होते. जेवणात काहीतरी गोड हवं असं आपल्याला अनेकदा वाटतं. अशावेळी विकत काही आणण्यापेक्षा घरच्या घरीच झटपट काहीतरी करता आलं तर? घरी गोड करायचं म्हणजे आपल्याकडे शेवयांची खीर आणि रव्याचा शिरा असे दोनच पर्याय असतात.
पण त्याशिवायही काही हेल्दी आणि अतिशय चविष्ट पर्याय आपण अगदी झटपट करु शकतो. मूगाच्या डाळीचा हलवा ही एक अतिशय सोपी आणि पौष्टीक अशी रेसिपी गोडाचा पदार्थ म्हणून आपल्याला करता येऊ शकते. मूगाच्या डाळीतून आपल्याला मोठ्या प्रमाणात प्रोटीन्स मिळत असल्याने लहान मुले आणि ज्येष्ठ मंडळींसाठीही ही रेसिपी पौष्टीक असते. मूग पचायला हलके असल्याने आणि आरोग्यासाठी फायदेशीर असल्याने हा हलवा जरुर ट्राय करा, तो नेमका कसा करायचा पाहूया (Moong Dal Halwa Sweet Recipe)...
साहित्य -
१. मूग डाळ - १ ते १.५ वाटी
२. तूप - अर्धी वाटी
३. साखर - पाऊण वाटी
४. बदाम, पिस्ता, काजू - प्रत्येकी ५ ते ७
५. वेलची पूड - पाव चमचा
६. केशर - ३ ते ४ काड्या
७. दूध - पाव वाटी
कृती -
१. पिवळ्या मूगाची डाळ कढईमध्ये चांगली लालसर रंगावर परतून घ्यायची.
२. ही डाळ थोडी गार झाली की मिक्सरमध्ये त्याचा ओबडधोबड भरडा काढून घ्यायचा.
३. कढईत भरपूर तूप घालून हा भरडा पुन्हा एकदा चांगला परतून घ्यायचा.
४. तूपावर लालसर भाजल्यानंतर यामध्ये साखर आणि थोडेसे दूध घालून हे सगळे चांगले एकजीव करायचे.
५. यामध्ये वेलची पूड, सुकामेव्याचे काप आणि केशर घालून एक वाफ काढून घ्यायची.
६. गॅस बंद करुन हा गरमागरम शिरा खायला घ्यायचा.