Join us  

हिरवे मूग -शेंगदाण्याचे चविष्ट डोसे, प्रोटीन रीच ब्रेकफास्टचा झटपट हेल्दी पर्याय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2023 1:40 PM

Moong Peanut Protein Rich Health Dosa Recipe : मुलांना सकाळच्या डब्याला, नाश्त्याला किंवा अगदी रात्रीच्या लाईट जेवणालाही हा पर्याय उत्तम ठरु शकतो.

आपण भाज्या, सॅलेड किंवा अगदी पालेभाज्याही खातो. पण कडधान्ये मात्र काहीशी मागे पडतात. आठवड्यातून किमान ३ वेळा तरी वेगवेगळ्या माध्यमातून कडधान्य पोटात जायला हवे. घरातल्या भाज्या अगदीच संपल्या तरच आपल्याला कडधान्यांची आठवण येते. त्यातही कडधान्य कमी आणि कांदा, टोमॅटो किंवा बटाटा घालून आपण त्याचे प्रमाण आणखी कमी करतो. मात्र असे करणे योग्य नाही. कडधान्यांमध्ये प्रोटीनचे प्रमाण चांगले असल्याने आपल्या आहारात नियमितपणे कडधान्य असायला हवे. नेहमी याची उसळ किंवा मिसळच करायला हवी असं काही नाही. तर हिरव्या मूगापासून आपण छान डोसेही करु शकतो. यामध्ये दाणे, दही हे घटक घातल्याने त्याची पौष्टीकता आणखी वाढण्यास मदत होते. मुलांना सकाळच्या डब्याला, नाश्त्याला किंवा अगदी रात्रीच्या लाईट जेवणालाही हा पर्याय उत्तम ठरु शकतो. पाहूयात हे डोसे कसे करायचे (Moong Peanut Protein Rich Health Dosa Recipe)...

साहित्य -

१. हिरवे मूग - १ वाटी 

२. दाणे - १ वाटी 

३. मिरच्या - २ ते ३

(Image : Google)

४. लसूण - ७ ते ८ पाकळ्या

५. आलं - १ इंच 

६. कोथिंबीर - अर्धी वाटी 

७. मीठ - चवीनुसार 

८. दही - अर्धी वाटी 

९. साखर - अर्धा चमचा 

१०. तेल - अर्धी वाटी

११. जीरे - अर्धा चमचा 

कृती -

१. मूग आणि दाणे वेगवेगळ्या बाऊलमध्ये रात्रभर पाण्यात भिजत घालावेत. 

२. सकाळी उठल्यावर मूग, दाणे, आलं, मिरची आणि लसूण, जीरे मिक्सरमधून बारीक करुन घ्यावे. 

३. या मिश्रणात दही, मीठ आणि साखर घालून अंदाजे पाणी घालून एकसारखे करुन घ्यावे. 

४. यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आवडत असतील तर गाजर, कांदा, कोबी यांसारख्या भाज्या किसून घालाव्यात. 

५. तव्यावर तेल घालून या मिश्रणाचे पातळ गोलाकार डोसे घालावेत. 

६. हे डोसे दोन्ही बाजुने खरपूस भाजून घेऊन गरमागरम खायला घ्यावेत. दही, सॉस, चटणी अशा कशासोबतही हे डोसे अतिशय छान लागतात. 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.