हिवाळा म्हणजे आरोग्य कमावण्याचा सिझन. या काळात बाजारात भाज्या, फळे मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याने आहारात या सगळ्या गोष्टींचा समावेश करायला हवा. शरीराला ऊर्जा मिळण्यासाठी या काळात आहारात काही पदार्थांचा आवर्जून समावेश केला जातो. इतकेच नाही तर वर्षभरासाठी प्रतिकारशक्ती चांगली राहावी यादृष्टीने या काळात व्यायाम करणे, आहारात जास्तीत जास्त पौष्टीक पदार्थांचा समावेश करणे या गोष्टी आवर्जून केल्या जातात. थंडीच्या काळात बाजारात सहज मिळणारा आणखी एक पदार्थ म्हणजे आवळा. आवळा आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असून यापासून मोरावळा केल्यास आरोग्याच्या बऱ्याच तक्रारी दूर होण्यास मदत होते. आता हा मोरावळा कसा तयार करायचा आणि तो खाण्याचे फायदे काय हे जाणून घेऊया (Moravla Recipe Amla Muramba Gooseberry)...
साहित्य -
१. आवळा - अर्धा किलो
२. गूळ - अर्धा किलो
३. दालचिनी - २ तुकडे
४. लवंग - ३ ते ४
५. तूप - २ चमचे
कृती -
१. आवळे स्वच्छ धुवून, कोरडे करुन त्याचे एकसारखे काप करुन घ्यावेत.
२. हे तुकडे एका भांड्यात घेऊन ते कुकरमध्ये एका भांड्यात २ शिट्ट्या घेऊन शिजवून घ्या.
३. कढईत तूप घालून त्यामध्ये दालचिनी, लवंग घालून त्यामध्ये शिजलेले आवळे घालावेत.
४. थोडे परतल्यानंतर त्यामध्ये गूळ आणि थोडे पाणी घालून सगळे चांगले एकजीव शिजवून घ्या.
५. आवळा शिजलेला असल्याने त्यामध्ये गूळाचा पाक पटकन मुरण्यास मदत होते.
६. गार झाल्यानंतर हा पाक काहीसा घट्ट होतो. त्यानंतर हा मोरावळा एका हवाबंद बरणीमध्ये भरुन ठेवा आणि थंडीच्या दिवसांत नियमितपणे खा.
फायदे -
१. पचनाशी निगडीत तक्रारींवर मोरावळा अतिशय फायदेशीर ठरतो. गॅसेस, बद्धकोष्ठता, अॅसिडीटी, कोठा जड होणे यांसारख्या तक्रारींसाठी मोरावळा खाणे उपयुक्त ठरते.
२. मोरावळ्यात तांबे आणि झिंक यासोबतच क्रोमियम हा घटकही असतो. या तिन्ही घटकांचा एकत्रित परिणाम म्हणजे मोरावळ्यानं शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित राहाते आणि हदयाशी संबंधित आजारांचा धोका टळतो.
३. महिला आणि लहान मुलांमध्ये साधारणपणे हिमोग्लोबिनची कमतरता असते. अशावेळी मोरावळा खाल्ल्यास हिमोग्लोबिन वाढण्यास आणि पर्यायाने अॅनिमियासारखी समस्या दूर होण्यास मदत होते.
४. मोरावळ्यात क आणि ई ही दोन्ही जीवनसत्त्वं मोठ्या प्रमाणात असतात. या दोन्ही जीवनसत्त्वांचा फायदा म्हणजे त्वचेचा रंग उजळतो, चेहऱ्यावर चमक येते.
५. मोरावळ्यात अँण्टिऑक्सिडण्टसचं प्रमाण भरपूर असतं. याचा फायदा प्रतिकारशक्ती वाढण्यापासून ते पचन चांगले होणे आणि त्वचा व केस सुंदर होण्यापर्यंत अनेक प्रकारे मोरावळा उपयुक्त ठरतो.