Join us  

चिंच म्हणताच तोंडाला पाणी सुटले; स्वयंपाकातही चिंचेचा योग्य वापर तब्येतीसाठी उत्तम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2022 2:45 PM

आंबटगोड चिंच जेवणाला चव आणतेच पण आरोग्यासाठीही फायदेशीर असते, पाहूयात चिंच खाण्याचे एकाहून एक फायदे

ठळक मुद्देचिंचेचे सार, चिंचेची चटणी वाढवेल जेवणाची लज्जत, ठेवेल आरोग्य उत्तम चिंच खाण्याचे आयुर्वेदात सांगितलेले फायदे समजून घेऊया

चिंच (Tamarind) असे नुसत म्हटले तरी अनेकदा आपल्या तोंडाला पाणी सुटते. म्हणजे काय तर आपल्या पचनासाठी आवश्यक असा स्रावच साक्षात तयार होतो आणि त्यामुळेच चिंचेची आंबट–गोड चव कोणत्याही पदार्थाला अधिक रूचकर बनवते. आपण सगळे आवडीने चाटचे पदार्थ खातो यामध्ये चिंचेच्या पाण्याचा वापर केलेला असल्याने ते पदार्थ खाल्ल्यावर आपल्या तोंडाला चव येते. घरातही वेगवेगळ्या पदार्थांना चव आणण्यासाठी आपल्याकडे जेवणात चिंच वापरण्याची प्रद्धत आहे. आपला आहार हा सहा रसानी युक्त असावा असे आयुर्वेद सांगतो त्यातील आंबट रसाचा वाटा पूर्ण करण्यास चिंच उपयोगी ठरते. कधी आमटीला चिंच-गूळ वापरुन तर कधी थेट चिंचेची चटणी करुन आपण जेवणाची लज्जत वाढवतो. अनेकदा चिंच मीठ लावून नुसतीही खाल्ली जाते, तर कधी सरबत केले जाते. चिंचेचे सारही थंडीच्या दिवसांत घशाला आराम देणारे ठरते. आंबट-गोड चवीची चिंच वापरल्याने पदार्थ चविष्ट होतो त्याचबरोबर या चिंचेचे औषधी गुणधर्मही असतात. चिंच अनेक आजारांपासून आपलं रक्षण करण्यासाठी उपयोगी ठरते, कशी ते सांगताहेत डॉ. संजुक्ता देशमुख-चव्हाण

(Image : Google)

चिंचेचे शरीरासाठी असणारे फायदे 

१. चिंच हे एक अतिशय उत्कृष्ट आयुर्वेदिक औषध आहे, ज्याचा वापर वेगवेगळ्या आजारांमध्ये जसे पोटदुखी किंवा पोटाचे विकार, अपचन, आम्लपित्त, बद्धकोष्ठ, पोटामध्ये जंत होणे, यामध्ये करता येतो.

२. तसेच कावीळ आणि हृदयारोगावरही चिंच अतिशय फायदेशीर असते. चिंचेतील औषधीय गुणधर्म हे यात आढळणाऱ्या फायटोकेमिकल्समुळे असतात. 

३. चिंचेच्या झाडामध्ये अँटिबॅक्टेरियल, अँटिऑक्सिडंट, अँटिमलेरियल आणि अँटिअस्थेमॅटिक असे प्रभावी गुण आहेत.

४. इतकंच नाही तर चिंचेमध्ये यकृताला चांगल ठेवण्याचेही गुणधर्म असतात. असे असले तरी प्रमाणाबाहेर चिचं खाणे योग्य नाही. 

५. चिंचेमध्ये पाणी, लिपीड (फॅट), कार्बोहायड्रेट, शुगर, प्रोटीन ,लोह,  कॅल्शियम, फॉस्फोरस, सोडियम ,पोटॅशियम, जिंक, विटामिन बी,  विटामिन सी, थियामिन, नियासिन अशा शरीराला गरजेच्या विविध पोषक घटकांचा समावेश असतो. 

६. पचनक्रियेसाठी चिंच खाण्याचा फायदा होतो, चिंचेमध्ये असे काही पोषक तत्व असतात जे पचनशक्ती सुधारण्यासाठी उपयुक्त ठरतात. अन्नपचन होणारा रस तयार करण्याचे काम चिंचेद्वारे केले जाते. त्यामुळे पचनक्रिया उत्तम होते आणि खाल्लेल्या अन्नाचे व्यवस्थित पचन होऊन शरीराला आवश्यक उत्तम धातू निर्मिती होण्यास मदत होते. 

७. चिंचेची चटणी अथवा काही पदार्थांमध्ये चिंचेचा सर्रास वापर करण्यात येतो. जेणेकरून कोणताही गॅस निर्माण करणारा पदार्थ असेल तर तो चिंचेने व्यवस्थित पचतो.  

८. चिंच सारक आहे. त्यामुळे जुन्या चिंचेचे सरबत किंवा पन्हे करून घेतल्याने पोट साफ होण्यास मदत होते.

९. हृदयासाठी चिंच खाण्याचा नक्कीच फायदा होतो, आयुर्वेदामध्ये चिंच हृदयाला हितकारक असल्याचे सांगितले आहे. आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या रासायनिक प्रक्रिया घडून उत्पन्न होणारे फ्री रॅडिकल्स हे कोरोनरी हार्ट डीसिज किंवा हृदयविकारासाठी जबाबदार ठरवले जातात,  तर चिंचेमध्ये असणारे अँटिऑक्सिडंट गुण हे फ्री रॅडिकल्सच्या हानिकारक प्रभावापासून हृदयाचे रक्षण करतात.  अशा पद्धतीने चिंच हृदयासाठी उपयुक्त ठरू शकते.

१०. चिंचेमध्ये असणारे औषधीय गुण हे हृदयाच्या ठोक्यावर नियंत्रण आणण्यासाठी उपयुक्त ठरतात. चिंचेमध्ये कॅल्शियमचे प्रमाण आढळते. कॅल्शियम हृदयाच्या ठोक्याची कार्यप्रणाली सुधारण्यासाठी उपयुक्त असते, त्यामुळे चिंचेचा उपयोग करून बिघडलेले हृदयाच्या ठोक्याची प्रक्रिया सुधारण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू शकतो. पण याबाबत अद्याप पुरेसे संशोधन झालेले नाही. 

(Image : Google)

११. यकृताच्या कार्यप्रणालीची सुरक्षा करणारे हिपाटो प्रोटेक्टीव गुण चिंचेमध्ये आढळतात. त्यामुळे चिंचेचा यकृत चांगले राहण्यासाठी उपयोग होतो. परंतु डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. 

१२. चिंचेत भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए,बी,सी असते. ज्यामुळे तुमच्या त्वचेवर याचा चांगला परिणाम होतो. 

१३. चिंचेची फुले घेऊन त्याचे समान खडीसाखर घेऊन चिंचेचा गुलकंद करता येतो. एक थर फुलांचा व एक थर साखरेचा असे एका काचेच्या बरणीत भरून ती आठ दिवस उन्हात ठेवावी. उत्तम गुलकंदासारखा गुलकंद होतो. पित्तशमनासाठी हा गुलकंद खाणे फायद्याचे ठरते. 

१४. चिंच व आमसूल जितकी तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे तितकाच त्यांचा अती वापर शरीरासाठी धोकादायक ठरू शकतो म्हणून आपल्या प्रकृतीनुसार आजारामध्ये वैद्यांच्या सल्ल्याने याचा वापर करावा. 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.आरोग्य