Join us  

गव्हाची पोळी रोज रोज नको? करा 5 प्रकारच्या पिठांच्या पोळ्या-भाकऱ्या, तब्येत तंदुरुस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2022 3:13 PM

Healthy food: अनेक घरांमध्ये सकाळ- संध्याकाळ केवळ गव्हाच्या (wheat aata) पोळ्याच केल्या जातात. पण तब्येत, आरोग्य सांभाळायचं असेल तर गव्हाच्या पीठासोबतच या ५ पिठांचा वापरही केला पाहिजे.

ठळक मुद्देआठवड्यातून दोन ते तीन दिवस कणकेव्यतिरिक्त इतर पीठाच्या भाकऱ्या, पोळ्या, पराठे करण्यास प्राधान्य द्यावे. 

बाजरीचं, ज्वारीचं, मक्याचं पीठ घरात नसेल तर एकवेळ चालतं. अशी पीठं अगदी ८- १० दिवस काय पण महिनाभर नसतील तरी काही अडत नाही. पण कणिक म्हणजेच गव्हाचं पीठ एक दिवस जरी घरात नसेल, तर खूप अडचण होते. खरंतर अशाच पद्धतीने आपण प्रत्येक पीठाबाबत आग्रही असायला हवं. कारण तब्येत सांभाळायची असेल तर दररोज फक्त कणकेच्या पोळ्या खाऊन उपयोग नाही. त्यासोबत इतर पीठाच्या भाकऱ्या, पराठे आपल्या आहारात असायलाच हवेत. 

 

निरोगी शरीरासाठी अनेक मायक्रो न्युट्रियंट्स, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स, फायबर, व्हिटॅमिन्स यांची गरज असते. ही सगळी गरज गव्हाच्या पीठाच्या पोळ्या खाण्याने भागत नाही. म्हणूनच आठवड्यातून दोन ते तीन दिवस कणकेव्यतिरिक्त इतर पीठाच्या भाकऱ्या, पोळ्या, पराठे करण्यास प्राधान्य द्यावे. 

 

१. मक्याचे पराठे (makke ki roti)सरसोका साग आणि मक्के की रोटी हे पंजाबमधले प्रसिद्ध जेवण. थंडीच्या दिवसांत आपणही मक्याच्या पीठाची पोळी किंवा भाकरी आवर्जून खाल्ली पाहिजे. मक्याच्या पीठात भरपूर प्रमाणात फायबर असल्याने तो पचायला हलका असतो. याशिवाय मक्याच्या भाकरीतून शरीराला व्हिटॅमिन्स, मिनरल्स, ॲण्टी ऑक्सिडंट्स, कार्बोहायड्रेट्स भरपूर प्रमाणात मिळतात. मक्याची भाकरी ही लो ग्लायसेमिक फूड म्हणून ओळखले जाते. त्यामुळे आठवड्यातून एकदा रात्रीच्या किंवा दुपारच्या जेवणात मक्याची भाकरी घेत चला. 

 

२. हरबरा डाळीच्या पीठाचे धिरडे.. (besan dhirade)हरबऱ्याच्या डाळीचे पीठ भजे, पकोडे यापुरतेच आपण खातो. शिवाय कधी कधी पालेभाज्या, कढी या पदार्थांना लावण्यासाठी डाळीच्या पिठाचा वापर केला जातो. परंतु हरबरा डाळ ही प्रोटीन्सचा खूप चांगला स्त्रोत आहे. त्यामुळे आठवड्यातून एकदा नाश्त्याला किंवा रात्रीच्या जेवणात हरबरा डाळीचे धिरडे खायला हवेत. अनेक जणांना हरबरा डाळीच्या पीठामुळे पोटाचा त्रास होतो. अशा लोकांनी हरबरा डाळीच्या पिठात थोडे तांदळाचे पीठ, थोडे उडीद डाळीचे पीठ टाकावे. या पिठात कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या यासोबतच तुमच्या आवडीच्या अनेक भाज्या टाकून स्वादिष्ट धिरडे बनवता येतात. 

 

३. बाजरीची भाकरी (bajra bhakari)सर्दीच्या दिवसात तर गरमागरम बाजरीची भाकरी आणि त्याच्यासोबत लोण्याचा किंवा तूपाचा गोळा.... असा आहार अतिशय उत्तम मानला जातो. थंडीच्या दिवसांत शरीर उबदार ठेवण्यासाठी बाजरीचा उपयोग होतो. शिवाय हे एक लो कॅलरी डाएट असल्याने वेटलॉससाठी प्रयत्न करणाऱ्यांनीही बाजरीची भाकरी खाण्यास हरकत नाही. शरीरात उर्जा टिकवून ठेवणे, पचन क्रिया सुधारणे, हाडांना मजबूती देणे असे बाजरीचे अनेक फायदे आहेत. 

 

४. मिक्स पीठाचे थालिपीठ (mix grain flour)थालिपीठ आणि त्यासोबत लोणी, तूप, चटणी किंवा मग टोमॅटो सॉस हा अनेक जणांचा ऑल टाईम फेव्हरेट पदार्थ. यासाठी कणिक, ज्वारीचे पीठ, हरबरा डाळीचे पीठ, मक्याचे पीठ, तांदळाचे पीठ, नाचणीचे पीठ हे सगळे सम प्रमाणात एकत्र करून घ्यावेत. हे पीठ भिजवून त्यात आपल्या आवडीप्रमाणे भाज्या किसून किंवा चिरुन टाकाव्यात आणि त्याचे तव्यावर तेल लावून मस्त थालिपीठ लावावेत. रात्रीच्या जेवणात किंवा सकाळी नाश्त्याला थालिपीठ हा एक उत्तम आहार आहे.

 

५. ज्वारीचे पीठ (jawar flour)ज्वारीची भाकरी पचायला अतिशय हलकी असते. त्यामुळे अनेकदा रात्रीच्या जेवणात पोळ्यांऐवजी ज्वारीची भाकरी खावी, असा सल्ला डाॅक्टर देतात. ज्वारीच्या भाकरीतून आपल्याला भरपूर उर्जा मिळते. फॅट खूप कमी असल्याने भाकरी खाऊन वजन वाढण्याचेही टेन्शन नाही. शिवाय ज्वारीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असल्याने पचनाची समस्या असणाऱ्यांनी नियमितपणे भाकरी खावी. 

image credit: https://www.instagram.com/p/CDTfyx8lSBf/

टॅग्स :अन्नआरोग्यहेल्थ टिप्सकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.वेट लॉस टिप्स