Join us  

सरसों दा साग आणि मक्के दी रोटी, करा लोहरी स्पेशल 6 पारंपरिक पंजाबी पदार्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2022 4:06 PM

नेहमीपेक्षा वेगळे काहीतरी ट्राय करुन पाहूया की

ठळक मुद्देपंजाबी पदार्थांची लज्जतच न्यारी...एकदा ट्राय तर करुन बघागुळाची पोळी तर नेहमीच करतो यावर्षी संक्रांतीला करुन पाहा पंजाबी स्पेशल पदार्थ

भारतात मकर संक्रांत हा सण मोठ्या उत्साहात पार पडतो. सूर्याचा उत्तरेकडे प्रवास सुरू होत असल्याने मकर संक्रांतीपासून दिवस मोठा आणि रात्र लहान होण्यास सुरुवात होते. संक्रमणाचा काळ म्हणून याला संक्रांत म्हणण्याची रीत आहे असे म्हटले जाते. महाराष्ट्र, गुजरात या भागात संक्रांत म्हणत असले तरी देशाच्या अन्य भागांतही वेगवेगळ्या नावांनी हा संक्रमाणाचा सण साजरा केला जातो. पंजाबमध्ये या सणाला लोहरी म्हटले जाते. सण म्हटला की रुढी-परंपरांप्रमाणेच खाद्यसंस्कृीतीही आलीच. भारतात काही कोसावर खाण्यापिण्याच्या पद्धतीत फरक असताना दुसऱ्या राज्यांमधील पदार्थ तर वेगळेच असतात. त्या ठिकाणी पिकणारे, तो विशिष्ट समाज पूर्वीपासून खात आलेले पदार्थ सणावाराला केले जातात. लोहरीच्या निमित्ताने पंजाबी घरांमध्ये तयार होणारे पदार्थ कोणते ते पाहूयात. 

१. गोड भात 

आपल्याकडे नारळीपौर्णिमेला ज्याप्रमाणे नारळ आणि साखर घालून गो़ड भात केला जातो त्याचप्रमाणे फक्त गूळाचा वापर करुन गोड भात करण्याची पद्धत पंजाबमध्ये आहे. यामध्ये तूप, सुकामेवा, वेलची पावडर घातल्याने या भाताला अतिशय उत्तम असा स्वाद येतो. थंडीच्या दिवसांत गूळ, तूप, सुकामेवा खाणे चांगले असल्याने या पदार्थांचा वापर या भातात केला जातो. 

(Image : Google)

२. भुनी खिचडी किंवा हरभरा डाळीची खिचडी

आपण ज्याप्रमाणे मूगाच्या डाळीची किंवा मसूर डाळीची खिचडी करतो त्याचप्रमाणे पंजाबमध्ये हरभरा डाळीची खिचडी केली जाते. हरभरा डाळ भिजवून आपण करतो त्याचप्रमाणे ही खिचडी केली जाते. 

(Image : Google)

३. मक्के की रोटी

मका हे पंजाबमध्ये सर्वाधिक प्रमाणात पिकणारे पीक आहे. पंजाबी लोकांचा अतिशय प्रसिद्ध आणि पारंपरिक पदार्थ म्हणजे मक्के की रोटी. मक्याच्या पीठापासून केलेली ही रोटी अतिशय वेगळी आणि चवीला मस्त लागते. मका पंजाबमध्ये पिकत असल्याने या भागात ही रोटी आवर्जून खाल्ली जाते. मक्याचे पीठ भिजवताना ते गरम पाण्यात भिजवल्यास ही रोटी लाटताना अजिबात तुटत नाही. मका थोडा चिकट असल्याने या रोटी लाटताना चिकटण्याची शक्यता असते मात्र हाताला थोडे तेल लावून घेतल्यास ही समस्या दूर होते. मक्यामध्ये आरोग्यासाठी उपयुक्त असे काही घटक असल्याने थंडीच्या दिवसांत ही रोटी खाणे फायदेशीर ठरते. 

(Image : Google)

४. सरसों का साग 

ही एकप्रकारची पालेभाजी असून ती थंडीच्या काळात सर्वाधिक मिळते. सरसों का सागमध्ये आरोग्यासाठी फायदेशीर असे अनेक घटक असतात. चवीला थोडी कडू असली तरी ही भाजी खाण्याचे शरीराला बरेच फायदे होतात. यामध्ये फायबर, प्रोटीन, व्हिटॅमिन के, कॅल्शियम, मॅंगनिज असे बरेच घटक असतात. वजन कमी करण्याबरोबरच महिलांना पाळीच्या दरम्यान होणारा त्रास कमी करण्यासाठी ही भाजी अतिशय उपयुक्त समजली जाते. फायबर आणि इतरही बरेच पोषक घटक असल्याने कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराला दूर ठेवण्यासाठी सरसों का साग उपयुक्त ठरतो.  

५. गव्हाच्या पीठाचे लाडू 

पंजाबमधील हा एक प्रसिद्ध पदार्थ आहे. याची रेसिपी सोपी असली तरी सणाच्या दिवशी हा पदार्थ आवर्जून खाल्ला जातो. आपण ज्याप्रमाणे गव्हाच्या पीठाचे लाडू करतो तसेच हे लाडू असतात. त्याला पिन्नी म्हणून ओळखले जाते. कढईत तूप घेऊन त्यामध्ये गव्हाचे पीठ लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे. खाली लागू नये म्हणून पीठ सतत हलवत राहा. तूप थोडे जास्त घेतल्यास पीठ खमंग भाजले जाते. एका ताटात हे भाजलेले पीठ काढून थोडे गार होऊद्या. त्यानंतर या पीठात पिठीसाखर, वेली पूड आणि सुकामेव्याचे काप घाला. हे सगळे एकत्र करुन त्याचे एकसारखे लाडू वळा. 

(Image : Google)

६. तिळाची रेवडी किंवा तिळाच्या वड्या 

आपण ज्याप्रमाणे तीळ आणि गूळ वापरुन तिळाच्या वड्या करतो त्याप्रमाणे पंजाबमध्ये लोहरीच्या निमित्ताने तिळाची रेवडी किंवा क़क वड्या किंवा पापडी केली जाते. थंडीच्या दरम्यान तीळ खाणे आरोग्यासाठी चांगले असल्याने शरीराला उष्णता मिळण्यासाठी तीळाचे पदार्थ या काळात आवर्जून खाल्ले जातात. पंजाब हा पहाडी भाग असल्याने येथील तापमान आपल्यापेक्षा खूपच कमी असते. अशा वातावरणात तीळामुळे शरीराला उष्णता मिळण्यासाठी हे पदार्थ उपयुक्त ठरतात.  

(Image : Google)
 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.