पाटवड्या हा विदर्भ, मराठवाडा, खान्देश अशा महाराष्ट्राच्या विविध भागात केला वेगवेगळ्या पद्धतीने केला जाणारा अतिशय खास पदार्थ. नागपंचमीच्या दिवशी तवा, सुरी या गोष्टी वापरायच्या नसतात अशी फार पूर्वीपासूनची समजूत आहे. त्यामुळे या दिवशी पुरणाचे दिंड, पातवड्या असा बेत केला जातो. नागोबालाही याचाच नैवेद्य दाखवण्याची पद्धत आहे. काही भागांत नागपंचमीला गव्हाची खीर, पातोळ्या असे वेगवेगळे प्रकार करण्याची पद्धत आहे. पण बहुंताश महाराष्ट्रात पुरणाचे दिंड केले जातात. कणकेच्या आवरणात असलेले पुरणाचे हे उकडलेले दिंड आणि त्यासोबत थोडाशा तिखट अशा बेसनाच्या पिठाच्या पाटवड्या हा बेत अतिशय प्रसिद्ध आहे (Nagpanchami Special Patwadi Authentic Recipe).
बेसनाच्या पीठाचे एरवी आपण ढोकळा, सुरळीच्या वड्या, पिठलं, धिरडी असे बरेच प्रकार करतो. पण या पाटवड्या मात्र वर्षभर तितक्या केल्या जात नाहीत. म्हणूनच नागपंचमीला तरी आपल्या पारंपरिक रेसिपी आवर्जून करायला हव्यात. बरेचदा पाटवड्या म्हटल्यावर अनेकांना पाटवडीचा रस्सा आठवतो. पण या महाराष्ट्रीयन किंवा नागपंचमीला केल्या जाणाऱ्या पाटवड्या रश्श्यासोबत न खाता नुसत्याच खाल्ल्या जातात. या खास पदार्थांची आजीच्या हातची चव आजही आपल्या जीभेवर रेंगाळत असते. हीच चव आपण आपल्या कुटुंबासोबत चाखावी यासाठी आज आपण ही रेसिपी कशी करायची ते पाहणार आहोत. झटपट होणाऱ्या आणि तितक्याच चविष्ट लागणाऱ्या या वड्या कशा करायच्या पाहूया...
१. १ वाटी हरभरा डाळीचे पीठ घेऊन ते चाळून घ्यायचे म्हणजे त्यातील गठुळ्या फुटायला मदत होते.
२. यामध्ये हिंग आणि हळद आणि मीठ आणि अगदी चवीपुरती पिठीसाखर घालावी.
३. एका वाटीत थोडं आंबट दही घेऊन त्यात पाणी घालून त्याचे ताक करायचे.
४. मिक्सरच्या भांड्यात मिरची आणि आलं बारीक करुन घ्यायचे.
५. हे बारीक केलेले मिश्रण आणि ताक डाळीच्या पीठात घालून चांगले ढवळून एकजीव करावे.
६. गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये ३ चमचे तेल घालून मोहरी घालावी आणि ती तडतडू द्यावी.
७. मग यात हिंग आणि हळद घालावी आणि मग डाळीच्या पीठाचे मिश्रण घालून ते सतत हलवत राहावे.
८. थोडे घट्टसर होत आले की या मिश्रणावर १-१ मिनीटासाठी झाकण ठेवून चांगली वाफ आणावी म्हणजे डाळीच्या पिठाचा कच्चेपणा कमी होतो.
९. एक थाळी घेऊन त्याला तेल लावायचे आणि त्यावर हे मिश्रण चांगले एकसारखे थापून घ्यायचे.
१०. त्यानंतर यावर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि सुक्या खोबऱ्याचा किस घालायचा.
११. नंतर वड्या एकसारख्या कापून घ्यायच्या आणि मग मस्त खायला घ्यायच्या