Join us  

नागपंचमी स्पेशल : करा पुरणाचे दिंड! पारंपरिक-पातळ आवरणाच्या-नाजूक सुंदर दिंडाची रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2022 3:20 PM

Nagpanchami Special Puran Dind Recipe : दिंड परफेक्ट व्हावेत यासाठी सोपी परफेक्ट रेसिपी

ठळक मुद्देगरमागरम दिंड तूप घालून पाटवड्या किंवा बटाट्याच्या भाजीसोबत खायला खूप मस्त लागतातपुरणपोळीप्रमाणे कटाची आमटी किंवा दूध यांच्यासोबतही हे दिंड आपण खाऊ शकतो.

श्रावण सुरू झाला की सणावारांना सुरूवात होते. श्रावणातील सगळ्यात पहिला सण म्हणजे नागपंचमी (Nagpanchami Special). शेतातील पिकाची इतर प्राण्यांपासून राखण करणारा नाग म्हणून या काळात नागाची पूजा करण्याची पद्धत आपल्या संस्कृतीत अनेक वर्षांपासून आहे. नागपंचमीला नागाला लाह्या-बत्तासे, दूध आणि पुरणाचा नैवेद्य दाखवण्याची पद्धत आहे. आता पुरण म्हणजे पुरणपोळी असा आपला सामान्य समज असतो. पण नागपंचमीला पुरणाचे दिंड, पाटवड्या असा बेत करण्याची पद्धत आहे. अनेक ठिकाणी या दिवशी तवा, सुरी वापरत नसल्याने हा स्वयंपाक केला जातो. पाहूयात पुरणाचे दिंड परफेक्ट व्हावेत यासाठी नेमके काय, कसे करायचे (Puran Dind Recipe). 

(Image : Google)

पुरणाची परफेक्ट रेसिपी

साहित्य - 

१. हरभरा डाळ - १ वाटी 

२. पाणी - २ ते ३ वाट्या

३. हळद - चिमूटभर 

४. गूळ -  १ ते १.५ वाटी 

५. वेलची पावडर - २ चिमूट 

६. जायफळ पूड - २ चिमूट

कृती - 

१. हरभरा डाळ स्वच्छ धुवून ६ तास किंवा रात्रभर पाण्यात भिजवून ठेवायची. 

२. सकाळी यामध्ये असलेले पाणी आणि वरुन थोडे पाणी घालून ही डाळ कुकरला शिजवायला लावायची. 

३. शिजवतानाच यामध्ये चिमूटभर हळद घालायची, ३ ते ४ शिट्ट्यांमध्ये डाळ छान शिजते. 

४. कुकरचे झाकण पडले की डाळ गाळून घ्यायची. त्याचे पाणी म्हणजेच कट आपण आमटीसाठी वापरतो. 

५. ही घट्टसर डाळ स्मॅशर किंवा रवीने एकजीव करुन ती कढईत घालावी. त्यामध्ये गूळ घालावा.

६. हे सगळे छान एकजीव झाले की गुळाला पाणी सुटते. चांगले परतून घट्टसर होईपर्यंत हलवत राहावे. 

७. यामध्ये आवडीप्रमाणे जायफळ पावडर आणि वेलची पूड घालावी.

(Image : Google)

आवरणाचे साहित्य 

१. गव्हाचे पीठ - दोन वाट्या 

२. मीठ - चवीपुरते

३. तेल - अर्धी वाटी

४. पाणी - आवश्यकतेनुसार

कृती 

१. गव्हाच्या पीठामध्ये चवीपुरते मीठ आणि तेलाचे गरम मोहन घालावे. 

२. नंतर अंदाजे हळूहळू पाणी घालून घट्टसर कणीक मळून घ्यायची. 

३. अर्धा तास ही कणीक थोडं तेल लावून बाजूला ठेवून द्यायची.  

दिंड कृती 

१. कणकेचे पुरीएवढे गोळे करुन त्याच्या एकसारख्या मध्यम जाडीच्या पुऱ्या लाटायच्या.

२. यामध्ये पुरण भरुन या पुऱ्या चारही बाजुने बंद करायच्या.

३. एकीकडे पातेल्यात किंवा स्टीमरमध्ये पाणी गरम करायला ठेवायचे.

४. वरती चाळणीमध्ये केल्याचे पान किंवा सुती कापड घेऊन त्यावर हे तयार दिंड ठेवायचे.

५. ही चाळणी स्टीमर किंवा पातेल्यावर ठेवायची आणि १० ते १५ मिनीटे चांगली वाफ काढून घ्यायची.  

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.नागपंचमी