Lokmat Sakhi >Food > हळदीच्या पानातल्या पातोळ्या, नागपंचमीला कोकणात केला जाणारा पारंपरिक सुगंधी पदार्थ. त्याची ही रेसीपी

हळदीच्या पानातल्या पातोळ्या, नागपंचमीला कोकणात केला जाणारा पारंपरिक सुगंधी पदार्थ. त्याची ही रेसीपी

नागपंचमीला माहेराची आठवण येते आणि या पातोळ्यांचीपण.. तो गंध-चव आठवू लागतेच.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 11:08 AM2021-08-13T11:08:22+5:302021-08-13T11:16:33+5:30

नागपंचमीला माहेराची आठवण येते आणि या पातोळ्यांचीपण.. तो गंध-चव आठवू लागतेच.

Nag Panchami traditional dish Konkan special- made in turmeric leaves Patolya | हळदीच्या पानातल्या पातोळ्या, नागपंचमीला कोकणात केला जाणारा पारंपरिक सुगंधी पदार्थ. त्याची ही रेसीपी

हळदीच्या पानातल्या पातोळ्या, नागपंचमीला कोकणात केला जाणारा पारंपरिक सुगंधी पदार्थ. त्याची ही रेसीपी

Highlightsखातांना हळदीचे पान काढून टाकायचे आणि साजूक तुपाबरोबर पातोळ्या फस्त करायच्या. (छायाचित्र-गुगल)

प्रतिभा भोजने-जामदार

"फांद्यांवरी बांधिले ग मुलींनी हिंदोळे, पंचमीचा सण आला डोळे माझे ओले."
- प्रत्येक मुलीला माहेरची आठवण करून देणारा हा नागपंचमीचा सण. कोकणातील विशेष पारंपरिक खाद्य संस्कृतीची पण आठवण करून देतो. कोकणात नागपंचमीला हमखास बनणारा पदार्थ म्हणजे पातोळ्या.

(छायाचित्र-गुगल)

श्रावण महिन्यात स्वतःच्याच परसातील डोलणारी, खुणावणारी हळदीची पाने, माडाच्या झाडावरून काढलेले रसरशीत ओले नारळ, सुगरणींचा उत्साह आणि खवय्यांना निमित्त. पातोळ्यांचा पहिला घाणा वाफवायला ठेवला की घरभर दरवळणारा हळदीच्या पानांचा सुगंध खवय्यांचा जठराग्नी जो चाळवतो तो गरमागरम पातोळ्यांवर साजूक तुपाची धार टाकून ७-८ पातोळ्या फस्त केल्यावरच शांत होतो.
अश्या या पदार्थाची ही रेसिपी.

साहित्य- २ वाट्या तांदूळ पिठी, २ वाट्या ओले खोबरे, अर्धी वाटी किसलेला गूळ, वेलदोडा पावडर, साजूक तूप आणि तेल.
कृती- सारण- २  चमचे तू घालून मंद गॅसवर गूळ विरघळवून घ्यावा. त्यात ओला नारळ आणि वेलची पावडर टाकून परतून घ्यावे. मिश्रण थोडे कोरडे झाले की परत २ चमचे तूप घालून मिक्स करून थंड करायला ठेवावे.
उकड- २ वाटी पाणी त्यात २ चमचे तूप आणि चवीपुरते मीठ घालून उकळी आणावी. त्यात २ वाट्या तांदूळ पिठी घालून ढवळून घ्यावे. उकड थोडी कोरडी असली पाहिजे.
उकड हाताला सोसेल इतकी थंड झाली की गरजेनुसार पाणी घालून मळून घ्यावी.
हळदीची पाने स्वछ धुवून कापून सारख्या मापाचे तुकडे करून घ्यावेत.
हाताला तेल उकडीचे लावून छोटे गोळे करून घ्यावेत. तेलाचे बोट लावून हाताने किंवा पुरी मेकर मध्ये त्याची पुरीसारखी लाटी करून घ्यावी.
हळदीच्या पानावर ही लाटी ठेवून, एका बाजूला सारण भरून पानासाहित ही लाटी करंजीसारखी दुमडून घ्यावी. गुंडाळलेल्या सर्व पातोळ्या १० ते १५ मिनिटांसाठी चाळणीवर वाफवून घ्याव्यात.
खातांना हळदीचे पान काढून टाकायचे आणि साजूक तुपाबरोबर पातोळ्या फस्त करायच्या.

अशाच सुंदर रेसीपी प्रतिभा जामदार यांच्या "संध्याई किचन" या यूट्यूब चॅनलवरही पाहता येतील.

https://www.youtube.com/channel/UCpq1pdCGy6xk7SkjAzQbxIQ

Web Title: Nag Panchami traditional dish Konkan special- made in turmeric leaves Patolya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :foodअन्न