Join us  

उन्हाळ्यात शरीराला थंडावा मिळण्यासाठी प्या नाचणीचे गारेगार आंबील, उष्णतेचे त्रास होतील दूर, ५ फायदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2023 11:02 AM

Nagli Nachni Ambil Summer Special Recipe : अगदी झटपट होणारे आणि हेल्दी असणारे हे आंबील कसे करायचे?

उन्हाळ्याच्या दिवसांत हवामानातील तापमान वाढलेले असल्याने शरीराला या तापमानाशी जुळवून घेताना थोड्या अडचणी येतात. अशावेळी ज्यांचे शरीर जास्त उष्ण असते त्यांना तर जास्त प्रमाणात त्रास होण्याची शक्यता असते. यामध्ये गळू येणे, उष्णतेने डोळे येणे, मूत्रविकार, तोंड येणे अशा समस्या निर्माण होतात. या समस्या त्रासदायक असल्याने आपल्या दैनंदिन व्यवहारात अडचणी निर्माण होतात. अशावेळी उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणून आपण उन्हाळ्यात शरीराला थंडावा देतील अशा पदार्थांचा आहारात समावेश करायला हवा (Nagli Nachni Ambil Summer Special Recipe). 

उन्हाळ्यात आपण आहारात ताक, गुलकंद, सब्जा, दूध, दही हे पदार्थ आवर्जून घेतो. याबरोबरच आवर्जून घ्यायला हवा असा एक पदार्थ म्हणजे नाचणी. नाचणीची खीर, धिरडे, लाडू यांबरोबरच उन्हाळ्याच्या दिवसांत नाचणीचा आणखी एक पदार्थ करता येतो तो म्हणजे नाचणीचे आंबील. हे आंबील प्यायल्याने पोट तर भरतेच पण उन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला थंडावा देण्यासाठी हा अतिशय उत्तम पर्याय आहे. पाहूयात अगदी झटपट होणारे आणि हेल्दी असणारे हे आंबील कसे करायचे?

(Image : Google)

१. एका बाऊलमध्ये ४ चमचे नाचणीचे पीठ ३ कप पाणी घालून रात्रभर भिजवून ठेवावे.

२. सकाळी उठल्यावर पाणी घातलेले हे नाचणीचे मिश्रण गॅसवर ३ ते ४ मिनीटे गरम करायचे, जेणेकरुन ते चांगले शिजते. 

३. त्यानंतर यामध्ये मीठ आणि ७ ते ८ लसणाच्या पाकळ्या ठेचून घालायच्या. 

४. शिजल्यानंतर हे पीठ घट्टसर होते, त्यानंतर गॅस बंद करायचा.

५. एका ग्लासमध्ये हे घट्टसर पीठ घ्यायचे आणि त्यामध्ये वरुन ताक घालायचे. 

६. आवडीनुसार यामध्ये आपण कोथिंबीर, जीर पूड किंवा जिऱ्याची फोडणी असे घालू शकतो. 

नाचणीचे फायदे 

 १. शरीरासाठी आवश्यक असणारे प्रथिने, कार्बोदके, कॅल्शिअम आणि फॉस्फरस यांचे प्रमाणही भरपूर असते. ज्यामुळे आपली हाडे आणि दात एकदम मजबूत राहतात.

२. गर्भवती महिलांसाठीही नाचणी अतिशय पौष्टीक समजली जाते. त्यामुळे अर्भकाची वाढ चांगली होण्यास मदत होते. 

३. तसेच लहान मुलांसाठीही नाचणी खाणे अत्यंत लाभदायक असते. वाढीचे वय असल्यामुळे त्यांचे पोषण चांगले होण्यास मदत होते. पोटात गॅस धरणे, पोटदुखी, अपचन या तक्रारींवर नाचणी गुणकारी असते. 

 

४. विशेष म्हणजे नाचणीने प्रतिकारशक्ती वाढण्यासही मदत होते. त्यामुळे नाचणीच्या पिठाचे वेगवेगळे पदार्थ तुम्ही आहारात घेऊ शकता. 

५. सध्या वजनवाढीची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावताना दिसते. त्यामुळे ज्यांना वजन कमी करायचे आहे, त्यांनी नाचणीचा आहारात समावेश करायला हवा. त्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.  

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.समर स्पेशल