आपल्याकडे सामान्यपणे गहू, तांदूळ, ज्वारी यांचा आहारात जास्त प्रमाणात वापर होतो. धान्ये आणि डाळी आरोग्यासाठी जितके महत्त्वाचे असतात तितकीच तृणधान्येही आरोग्यासाठी फायदेशीर असतात. बाजरी, राजगिरा, बार्ली, नाचणी यांसारखी तृणधान्ये सहज उपलब्ध होत असल्याने त्यांचा आहारात आवर्जून समावेश करायला हवा. नाचणी आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असून त्याचे शरीराला नेमके काय फायदे असतात हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. नाचणीतील गुणधर्म लहान बाळांपासून ते वयस्कर लोकांपर्यंत सर्वांच्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असतात. असे असले तरी या नाचणीचे कोणते पदार्थ बनवायचे असा प्रश्न आपल्याला पडतोच. मातकट लागणारी नाचणी सगळ्यांनी आवडीने खावी यासाठी त्यापासून तयार होणाऱ्या काही सोप्या रेसिपी पाहूयात (Nagli Recipes for Breakfast Superfood)...
१. नाचणीची इडली
आपण नेहमी ज्याप्रमाणे डाळ-तांदूळ भिजवून इडली करतो. त्याचप्रमाणे भिजवताना या पिठात नाचणी घालायची. भिजल्यावर हे पीठ नेहमीप्रमाणे मिक्सर करुन मग आंबवून त्याच्या नेहमीप्रमाणे इडल्या करायच्या. चटणी, सांबार कशासोबतही या इडल्या अतिशय चांगल्या लागतात.
२. नाचणीची खीर
वयस्कर मंडळी, लहान बाळं, गर्भवती महिला यांच्या अंगातील ताकद भरुन येण्यासाठी ही खीर आवर्जून केली जाते. थेट नाचणीपासून किंवा नाचणीच्या पीठापासूनही ही खीर करता येते. गूळ, तूप, सुकामेवा, दूध यांमुळे ही खीर जास्त पौष्टीक होते. यात आवडीप्रमाणे वेलची पावडरही घालू शकतो.
३. नाचणीची भाकरी
रोजच्या जेवणात आपण पोळी, ज्वारीची भाकरी, तांदळाची भाकरी हे पदार्थ खातो. मात्र त्या ऐवजी नाचणीच्या भाकरीचा आहारात समावेश केल्यास ते नक्कीच फायदेशीर ठरु शकते. ही भाकरी चांगली होण्यासाठी यात थोडे तांदळाचे पीठ घातले तरीही चालते.
४. ढोकळा
नाचणीचे पीठ आणि ओटसचे पीठ यामध्ये दही घालून चांगले भिजवायचे. यात मीठ घालून आपण कुकरला ढोकळ्यासाठी ज्याप्रमाणे डब्यात ते पीठ लावतो त्याप्रमाणे ओतायचे. मग ढोकळ्यावर जीरं, मोहरी, मिरची, कडीपत्ता, हिंग यांची छान फोडणी द्यायची. वरुन हिरवीगार कोथिंबीर घालायची. हा गरम ढोकळा अतिशय छान लागतो.
नाचणीचे फायदे
१. शरीरासाठी आवश्यक असणारे प्रथिने, कार्बोदके, कॅल्शिअम आणि फॉस्फरस यांचे प्रमाणही भरपूर असते. ज्यामुळे आपली हाडे आणि दात एकदम मजबूत राहतात.
२. गर्भवती महिलांसाठीही नाचणी अतिशय पौष्टीक समजली जाते. त्यामुळे अर्भकाची वाढ चांगली होण्यास मदत होते.
३. तसेच लहान मुलांसाठीही नाचणी खाणे अत्यंत लाभदायक असते. वाढीचे वय असल्यामुळे त्यांचे पोषण चांगले होण्यास मदत होते. पोटात गॅस धरणे, पोटदुखी, अपचन या तक्रारींवर नाचणी गुणकारी असते.
४. विशेष म्हणजे नाचणीने प्रतिकारशक्ती वाढण्यासही मदत होते. त्यामुळे नाचणीच्या पिठाचे वेगवेगळे पदार्थ तुम्ही आहारात घेऊ शकता.
५. सध्या वजनवाढीची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावताना दिसते. त्यामुळे ज्यांना वजन कमी करायचे आहे, त्यांनी नाचणीचा आहारात समावेश करायला हवा. त्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.