सुग्रास पुरणाची पोळी बनवता आली, की सगळा स्वयंपाक आला म्हणून समजायचं, असं जुने लोकं म्हणायचे. ते तसं काय म्हणायचे हे पुरणाची पोळी करायला शिकलेल्या प्रत्येकीला आपसूकच कळून जातं. पुरणाच्या पोळीसारखाच एक प्रकार आहे नागपंचमीला आवर्जून केले जाणारे पुरणाचे दिंड. श्रावण शुद्ध पंचमी म्हणजे नागपंचमी. यादिवशी नागोबाला पुरणाच्या दिंडाचाच नैवेद्य असतो. हे दिंड बनविणं मोठं कौशल्याचं काम आहे. चवदार दिंड बनवायची असल्यास प्रत्येक पदार्थाच प्रमाण अगदी बिनचूक पडायला हवं. हेच पुरणाच्या दिंडांचं रहस्य सांगितलं आहे आहारतज्ज्ञ कांचन बापट यांनी.
photo credit google
नागपंचमीला पुरणाची दिंड कशी बनवायची याची एक मस्त रेसिपी आहारतज्ज्ञ कांचन बापट यांनी शेअर केली आहे. यामध्ये प्रत्येक गोष्ट अगदी बारकाईने सांगण्यात आली असल्याने तुम्ही अगदी पहिल्यांदाच पुरणाचे दिंड बनवत असाल, तरी घाबरण्याची काहीच गरज नाही. ही रेसिपी ट्राय करून यंदाच्या नागपंचमीला पुरणाची दिंड बनवून बघाच.
कसे बनवायचे पुरणाचे दिंड?
- सगळ्यात आधी एक वाटी हरबरा डाळ धुवून घ्या. ही डाळ कुकरमध्ये टाका आणि त्यामध्ये दोन ते अडीच वाट्या पाणी टाका.
- आता कुकर मोठ्या गॅसवर ठेवा. एक शिट्टी झाल्यावर गॅस बारीक करावा. तीन ते चार शिट्ट्या होऊ द्या आणि त्यानंतर गॅस बंद करा.
- कुकर थंड झाल्यानंतर उघडा. आता कुकरमधील डाळ छान मऊसर शिजलेली असेल. या डाळीतले पाणी व्यवस्थित निथळून घ्या आणि त्यानंतर ती पॅनमध्ये काढा.
- पॅनमध्ये डाळ टाकल्यानंतर त्यामध्ये एक वाटी गुळ घाला आणि शिजायला ठेवा. सुरूवातीला काही वेळ गॅस मोठा ठेवा. गुळ विरघळला की गॅस बारीक करा.
- पुरण मधूनमधून हलवत रहा. साधारण सात ते आठ मिनिटे पुरण परतले की ते डावाने रगडून बारीक करा. त्यात आता दोन टेबलस्पून खोवलेलं नारळ आणि चिमुटभर केशर घाला. खोबरं नाही घातलं तरी चालेल.
- आता पुरणात दोन ते तीन टीस्पून तुप घाला आणि पुन्हा थोड्यावेळ परतून घ्या. यानंतर गॅस बंद करा आणि पुरणात चिमुटभर जायफळ आणि वेलची पावडर घाला.
- पुरण तयार झाल्यानंतर कणिक भिजवून घ्या. दिड वाटी कणिक घ्या. त्यात थोडसं मीठ आणि चिमुटभर केशर टाका. कडकडीत गरम केलेलं तीन ते चार टेबलस्पून तूप घाला आणि सगळी कणिक व्यवस्थित हलवून घ्या.
- आता कणकेत थोडं थोडं पाणी घाला आणि पुरीच्या कणकेइतकी घट्ट कणिक भिजवून घ्या. मळलेली कणिक अर्धातास झाकून ठेवा.
- दिंड करण्यासाठी सगळ्यात आधी पुरीसाठी घेतो, तेवढ्या आकाराचा गोळा घ्या आणि साधारण पुरीएवढ्या आकाराचा लाटून घ्या. मधल्या भागापेक्षा काठ पातळ लाटावेत. जेवढी लाटी घेतली असेल, त्यापेक्षा जास्त पुरण घ्या. मोमो पात्रात पाणी घाला. वरच्य भागात कर्दळीची पाने टाका. त्यावर तुपाचा हात फिरवून घ्या. त्यावर आपण केलेले पुरणाचे दिंड ठेवा. मध्यम गॅसवर १५ ते १६ मिनिटे दिंड वाफवून घ्या. दिंड हाताला चकचकीत लागली आणि थोडी कडक झाली आहेत असे वाटले की आपली दिंड तयार झाली आहेत असे समजावे.
- नागोबाला नैवेद्य दाखविल्यानंतर दिंडांच्या वर तूप घालावे आणि सर्व्ह करावेत.