- राजश्री शिन्दोरे
शहरी भागात नागपंचमी साजरी करणं हे आता केवळ प्रतिकात्मक उरलंय. फक्त नागपंचमीच नाही तर बर्याच प्रथा परंपरा वेळेअभावी, जागेअभावी या प्रतिकात्मक झाल्या आहेत. बाकी काही करायला मिळालं नाही तरी यानिमित्तानं नैवेद्य मात्र घराघरात दाखवला जातो. नैवेद्याच्या पदार्थांमधून परंपरा जपली जाते आणि लहानपणी चाखलेल्या त्या अनोख्या चवी आपल्या मुलाबाळांना अनुभवण्यास देण्याची संधी मिळते.
नागपंचमीला महाराष्ट्रातील घराघरात वेगवेगळे पदार्थ करुन नैवेद्य दाखवला जातो. त्यातील काही पदार्थांच्या पाककृती देत आहोत. नागपंचमीला नेहेमीपेक्षा वेगळा काही पदार्थ नैवेद्याला करायची इच्छ असल्यास त्यासाठी या पाककृतींची नक्कीच मदत होईल.
नागपंचमी विशेष पदार्थ
गव्हाची खीर आणि कानवले
छायाचित्र- गुगल
गव्हाच्या खिरीसाठी रात्री गहू भिजवून ठेवावे. सकाळी उपसून मिक्सरमधून जाडसर दळून घ्यावेत. किंवा गव्हाचा दलिया घ्यावा. दळलेले गहू किंवा दलिया थोड्या तुपावा परतून घ्यावा. त्यात पाणी घालून हे गहू कुकरमधे मऊ शिजवून घ्यावे. शिजवलेल्या गव्हात भाजलेलेली खसखस, गूळ, नारळाचे काप आणि नारळाचं दूध घालून हे मिश्रण मंद आचेवर शिजू द्यावं. गूळ व्यवस्थित विरघळला की त्यात वेलची, जायफळ पूड घालावी.
कानवले करण्यासाठी कणकेत थोडं डाळीचं पीठ, मीठ आणि तूप घालून गार पाण्यानं पोळ्यांच्या कणकेप्रमाणे कणिक भिजवावी. ती तासभर झाकून ठेवावी. तासाभराने कणीक तुपाचा हात लावून पुन्हा मळून घ्यावी. पोळीसाठी जेवढी कणकेची लाटी घेतो तशी घेऊन थोडी जाडसर पोळी लाटावी. लाटलेल्या पोळीवर तूप पसरवून ती दुमडावी. परत तूप लावून दुमडावी. अशा प्रकारे कानवले तयार करुन केळीच्या पानाला तेलाचा हात लावून त्यावर ठेवावे. एका भांड्यात पाणी उकळून त्यावर रोळी ठेवावी. रोळीला तेल लावून केळीच्या पानावरले कानवले पानासहित त्यात ठेवावे. रोळीवर झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटं कानवले वाफवून घ्यावेत.
गव्हाच्या खिरीवर चारोळी, काजू बदामाचे तुकडे घालवेत. आवडत असल्यास वरुन थोडं दूध घालावं. या खिरीसोबत गरमागरम कानवल्याचा नैवेद्य दाखवावा.
बाजरीचे दिवे
छायाचित्र- गुगल
बाजरीच्या पिठात गुळाचं दाटसर पाणी, तूप आणि वेलची पावडर घालून पीठ घट्ट भिजवावं. पिठाचे गोळे करुन अंगठ्याचा दाब देवून त्याला दिव्याचा आकार द्यावा. मोठे उंच दिवे बनवावे आणि रोळीला तेलाचा हात लावून त्यावर हे दिवे ठेवावे. झाकण ठेवून मोदकासारखे वाफवून घ्यावेत. हे दिवे 15 ते 20 मिनिटं वाफवावेत. वाफवलेल्या दिव्यात वात लावून नैवेद्य दाखवावा. आणि नंतर हे दिवे तुपाबरोबर खावेत.
हळदीच्या पानातल्या पातोळ्या
छायाचित्र- गुगल
काकडी किसून ती पिळून पाणी काढून घ्यावं. 1 वाटी काकडी किसात 2 वाटी तांदळाचं पीठ, 1 वाटी ओल्या नारळाचा किस, 1 वाटी किसलेला गूळ आणि चवीपुरती मीठ घालून हे मिश्रण गॅसवर ठेवून जरा शिजवून घ्यावं. हळदीच्या अर्ध्या पानावर लिंबाएवढा गोळा ठेवून अर्धं पान दुमडून झाकून ठेवावे. अशी सर्व पानं तयार करावी. मोदकपात्रात पाणी घालून चाळणीवर ही पानं ठेवून दहा मिनिटं वाफवावी. वाफवलेली पानं सोडवून या पातोळ्यांवर साजूक तूप घालून त्याचा नैवेद्य दाखवावा.
ज्वारीच्या लाह्या
छायाचित्र- गुगल
ज्वारी गरम पाण्यात दोन तास भिजवून ठेवावी. नंतर ज्वारी चाळणीत उपसून कापडावर पसरावी. दहा ते बारा तास ज्वारी कोरडी करावी. जाड बुडाच्या भांड्यात किंवा कुकर गरम करुन त्यात मूठभर ज्वारी टाकावी. ती सूती कापडानं दाबावी. लाह्या फुटायला लागल्या की झाकण ठेवावं. दोन मिनिटांनी झाकण काढून घ्यावं. अशा प्रकारे सर्व लाह्या तयार करुन घ्याव्यात. दह्यासोबत या लाह्यांचा नैविद्य दाखवतात.
खांटोळी
छायाचित्र- गुगल
2 वाटी तांदळाचा रवा भाजून घ्यावा. कढईत दोन वाटी पाणी घालून एक वाटी किसलेला गूळ घालावा. पाण्याला उकळी आल्यावर त्यात एक वाटी ओल्या नारळाचा किस वेलची पूड घाला. त्यात भाजलेल्या तांदळाचा रवा घालून तो चांगला मिसळून घ्यावा. नंतर कढईवर झाकण ठेवून मंद आचेवर 15 -20 मिनिटं शिजवून घ्यावा. गॅस बंद करुन तूप लावलेल्या केळीच्या किंवा हळदीच्या पानावर हे मिश्रण थापावं. वड्यांसारखे काप पाडून त्यावर नारळाचा किस पसरवावा. गार झाली की खांटोळी ताटलीत काढून त्याचा नैवेद्य दाखवावा.
ज्वारीचे वडे
छायाचित्र- गुगल
2 वाटी ज्वारीचं पीठ, 2 चमचे बेसन, 4 चमचे गव्हाचं पीठ, लसूण, आलं- हिरवी मिरची पेस्ट, मीठ, तेलाचं मोहन, जिरे पूड, कोथिंबीर, तीळ, ओवा घालून ते मिसळून घ्यावं. हे पीठ गरम पाण्यानं घट्ट भिजवावं. तळण्यासाठी तेल गरम करावं. पुरी प्रमाणे जाडसर लाटून, त्यावर थोडी तीळ पसरवून ती दाबावी. मध्यम आचेवर हे वडे लालसर तळुन घ्यावेत.
( लेखिका नाशिकस्थित असून त्या पाककला आणि हस्तकलेत निपूण असून त्यांना गृहसजावटीच्या वस्तू तयार करण्याची आवड आहे.)
rdshindore@yahoo.com