Join us  

National Mango Day: आंबा हेच प्रेमाचे प्रतीक! केरळची आंबा करी, आंब्याचा भात वाढवेल प्रेमाची लज्जत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 2:18 PM

आजचा राष्ट्रीय आंबा दिवस साजरा करण्यासाठी खास पिकलेल्या आंब्याची आणि कच्च्या कैरीची पाककृती. घरात उपलब्ध सामग्रीत केरळी पध्दतीची मॅंगो करी तर कैरी घातलेला आंबा भात सहज होवू शकतो. आता सिझन संपायलाच आलेला आहे. लगेच करुन पहा .

ठळक मुद्देपिकलेल्या आंब्याच गर काढून केलेली आंबट गोड चवीची मॅंगो करी केरळात भातासोबत खातात. मॅंगो राइस करताना भात आधी शिजवून गार होवू द्यावा. तरच तो छान मोकळा होतो.

आज 22 जुलै. आजचा दिवस सर्व आंबा प्रेमीसाठी खास. कारण आज आहे ‘ राष्ट्रीय आंबा दिवस’. तो आजच का साजरा केला जातो याबाबत निश्चित कारण नसलं तरी जगभरात आंब्याच्या 500 जाती उन्हाळ्यापासून आतापर्यंत रसिकांची रसना भागवत राहातात म्हणून हा दिवस साजरा करायचा. आंब्याचे विविध पदार्थ करुन आंबा खाण्याची हौस भागवून घेण्याचा हा दिवस. आंब्याचा रस करुन खाण्याचे हे दिवस नाही. तर बर्फी, शेक, लस्सी, आंब्याचा रसगुल्ला असे विविध पदार्थ करुन हा दिवस साजरा केला जातो.

भारतातील आंब्याचा इतिहास खूप जुना आहे. भारतातील प्रचलित लोककथेत आंब्याचा उल्लेख आहे. भारतीय लोककथानुसार असं मानलं जातं की आंब्याची बाग बुध्दांना भेट स्वरुपात मिळाली होती. आजही आंब्याला प्रेमाचं प्रतिक मानलं जातं. मैत्री वाढवण्यासाठी, मैत्री जपण्यासाठी आंब्याचा पेटारा देण्याला खूप महत्त्व आहे. भारतात पाच हजार वर्षांपूर्वी आंबा लागवड करणं सुरु झालं. दक्षिण आशियात पहिल्यांदा आंबा पिकला तो भारतातच असा इतिहास आहे. तिथून पुढे इ.स.पू 4-5 शतकात दक्षिण पूर्व आशियात आंब्याची लागवड केली गेली. आणि दहाव्या शतकात पूर्व आफ्रिकेत आंबा लागवडीला सुरुवात झाली. जगभरात आंबा अनेक देशात पिकवला जातो. पण आंब्याच पाकळी सारखा टोकाला वक्र होणारा भारतीय आकार हाच आंब्याचा नैसर्गिक आकार मानला जातो. भारत, पाकिस्तान आणि फिलिपाइन्स या देशांचा आंबा हे राष्ट्रीय फळ आहे. तर बांगलादेशानं 2019 मधे आंब्याच्या वृक्षाला राष्ट्रीय वृक्षाचा दर्जा दिला. 1987 पासून दिल्लीत आंतरराष्ट्रीय आंबा महोत्सव भरवला जातो. जगभरत आंब्याच्या 500 जाती आहे. रंग, चव , आकार याबाबतीत प्रत्येक जातीचा आंबा हा वेगळा आहे. पण सर्वात महागडा आंबा हा जपानचा जपानी मियाझाकी हा आहे. तो मागच्या वर्षी लिलावात अडीच लाख रुपये एक किलो अशा दराने विकला गेला.

छायाचित्र:  गुगल 

आंब्याच्या चवीसोबत आंब्याचा इतिहास , आंब्याच्या कथा, परंपरा, संस्कृती, आंब्याभोवतीचं वास्तव हे सगळंच खूप रोचक आहे. आजचा राष्ट्रीय आंबा दिवस साजरा करण्यासाठी खास पिकलेल्या आंब्याची आणि कच्च्या कैरीची पाककृती. घरात उपलब्ध सामग्रीत केरळी पध्दतीची मॅंगो करी तर कैरी घातलेला आंबा भात सहज होवू शकतो. आता सिझन संपायलाच आलेला आहे. लगेच करुन पहा .

मॅंगो करी

ही करी करण्यासाठी अर्धा किलो पिकलेल्या आंब्याचा गर, 3 मोठे चमचे बेसन पीठ, पाणी, 4 चमचे फेटलेलं दही, अर्धा चमचा सूंठ पावडर, एक चिमूट हिंग, 2 चमचे हिरव्या मिरच्या आणि आलं पेस्ट, एक चमचा जिरे, 10-12 कढीपत्त्याची पानं, 2 चमचे गूळ किंवा साखर आणि मीठ हे जिन्नस घ्यावं

छायाचित्र:  गुगल 

मॅंगो करी करताना

आधी आंब्याचा गर काढून तो फेटून घ्यावा. बेसनपिठात पाणी घालून ते गुठळी राहणार नाही असं कालवून घ्यावं. मग त्यात आंब्याचा गर, सूंठ पावडर, हिंग, आलं मिरची वाटण घालावं. हे मिश्रण गॅसवर पंधरा मिनिटं मंद आचेवर उकळू द्यावं. नंतर एका छोट्या कढईत तेल तापवावं. जिरे, कढीपत्त्याची फोडणी करुन तो तडका मिश्रणात घालावा. परत दहा मिनिटं झाकणं ठेवून मिश्रण उकळू द्यावं. शेवटी त्यात मीठ आणि गूळ घातला की मॅंगो करी तयार होते. ही चटकदार मॅगो करी केरळात भातासोबत खातात.

मॅंगो राइस

मॅंगो राइस करण्यासाठी एक कप शिजवलेला भात, अर्धा कप कैरीचा किस, अर्धा चमचा मोहरी, एक चमचा उडदाची डाळ, एक चमचा हरभर्‍याची डाळ , शेंगदाणे, 2 मिरच्या, कढीपत्ता, पाव चमचा हळद, 3 चमचे तिळाचं तेल आणि मीठ हे जिन्नस घ्यावं.

छायाचित्र:  गुगल 

मॅंगो राइस करताना

एका मोठ्या कढईत तिळाचं तेल घालून ते गरम करावं. गरम तेलात मोहरी घालून ती तडतडू द्यावी. नंतर त्यात उडदाची आणि चण्याची डाळ, शेंगदाणे घालून सर्व जिन्नस् नीट परतून घ्यावं. हिरवी मिरची, कढीपत्ता, हिंग, हळद आणि मीठ घालावं. हे चांगलं हलवून घेतल्यानंतर शिजवून पूर्ण गार केलेला भात फोडणीत घालावा. तो फोडणीत व्यवस्थित मिसळून घ्यावा . नंतर त्यावर किसलेली कैरी घालावी. ती भातात चांगली एकत्र केली की चटपटीत मॅंगो राइस तयार होतो.