Join us  

Navratri 2022 : ९ दिवस उपवासाला सारखं वेगवेगळं काय खाणार...झटपट करा २ टेस्टी रेसिपी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2022 2:51 PM

Navratri Special Upwas Recipe : उपवासाला खाता येतील असे चटपटीत आणि झटपट होणारे चविष्ट पर्याय

ठळक मुद्देउपवासाला सारखं वेगळं काय करायचं असा प्रश्न पडला असेल तर घ्या हटके पर्यायसाबुदाणा खिचडी आणि वरईचा भात खाऊन कंटाळला असाल तर करा चमचमीत पदार्थ

९ दिवसांचे नवरात्रीचे उपवास म्हणजे सतत काय करायचं आणि खायचं असा प्रश्नच महिलावर्गापुढे असतो. उपवासाचा त्रास होऊ नये म्हणून साबुदाणा, दाणे यांच्यावर नियंत्रण आणताना पोटही भरायला हवे आणि हेल्दीही हवे असे कोणते पदार्थ करता येतील हा प्रश्न असतोच. सतत तेच ते करुन आणि खाऊनही कंटाळा आल्याने उपवास असलेल्यांसाठी आणि नसणाऱ्यांसाठीही वेगळं काय करता येईल याचे झटपट पर्याय मिळाले तर. पाहूयात असेच काही चटपटीत आणि झटपट होणारे सोपे पर्याय (Navratri Special Upwas Recipe). 

(Image : Google)

१. बटाटा पुरी

बटाटा हा सगळ्यांच्या आवडीचा आणि सहज उपलब्ध असणारा पदार्थ आहे. वातूळ म्हटला जात असला तरी बटाट्यामध्ये शरीरासाठी पोषक असे अनेक गुणधर्म असतात. उपवासाच्या पदार्थांमध्ये तर बटाटा आवर्जून वापरला जातो. बटाट्याची नेहमी भाजी किंवा चिप्स करण्यापेक्षा त्याच्या छानशा पुऱ्या केल्या तर. यासाठी बटाटा उकडून, किसून घ्यावा. त्यामध्ये जीरं, हिरवी मिरची, मीठ घालावं. आवडीप्रमाणे यामध्ये राजगीरा, साबुदाणा पीठ किंवा वरई पीठ असं कोणतंही पीठ घालू शकतो. याच्या हातावर पुऱ्या थापून त्या तळून काढाव्यात. छान कुरकुरीत आणि चविष्ट पुऱ्या हिरवी चटणी, चिंचेची चटणी किंवा अगदी दह्यासोबतही मस्त लागतात. 

(Image : Google)

२. दही साबुदाणा 

आपण साबुदाणा म्हटलं की नेहमी खिचडी किंवा वडे करतो. पण दही साबुदाणा हा आगळावेगळा पदार्थ आपण क्वचितच ट्राय केला असेल. अगदी सोपा आणि झटपट होणारा हा पदार्थ खायला तर खूप छान लागतोच आणि घरातील सगळ्यांनाही तो आवडतो. साबुदाणा चांगला भिजवून घ्यायचा, त्यामध्ये दही, साखर, मीठ आणि दाण्याचा कूट घालायचा. यावर तेलात जीरं, मिरची घालून मस्त फोडणी द्यायची. दही आणि साखरेमुळे आंबट गोड चव आणि दाणे, मिरची जीरं यांचा स्वाद यामुळे हा पदार्थ मस्त लागतो. करायला सोपा असल्याने तो पटकन होतोही. 

 

टॅग्स :अन्नपाककृतीनवरात्री