नवरात्री म्हटलं की घरी पूजाअर्चा आणि बाकी गोष्टी तर ओघानेच आल्या.बऱ्याच घरी महिला ९ दिवसांचे उपवास करतात. घरी आपण उपवासाला चालतील असे वेगवेगळे पदार्थ करत असतो. हल्ली बाजारातही उपवासाचे अतिशय वेगवेगळे पदार्थ मिळतात. पण ललिता पंचमीच्या निमित्ताने किंवा अष्टमीच्या निमित्ताने आपण हळदी-कुंकवाला आपल्या मैत्रीणींना किंवा नातेवाईकांना घरी बोलावतो. इतकेच नाही तर घरात भजन, सप्तशतीचे पाठ, भोंडला असे काही ना काही असल्याने बऱ्याच महिला आपल्या घरी येतात. यावेळी आपण काही ना काही डीश ठेवतोच, पण यातील काही जणींचा ९ दिवसांचा उपवास असल्याने त्यांना नेहमीचे पदार्थ चालत नाहीत. अशावेळी या महिलांना उपवासाचे झटपट देता येतील असे कोणते पर्याय तयार ठेवता येतील किंवा ऐनवेळी करता येतील ते पाहूया (Navratri 2022 Special Fasting Food Items)...
१. दाण्याचा किंवा खजूराचा लाडू
दाण्याचा आणि खजूराचा लाडू करायला सोपा असतो आणि आरोग्यासाठीही चांगला असतो. आपल्याकडे वयाने जास्त असणाऱ्या महिला येणार असतील तर यामध्ये गूळ थोडा कमी घालून आपल्याला पाहिजे त्या आकाराचे दाण्याचे किंवा खजूराचे लाडू करता येऊ शकतात.
२. साबुदाण्याच्या पापड्या, बटाटा पापड किंवा वेफर्स
आपण उन्हाळ्याच्या दिवसांत वाळवण घरी करतो किंवा विकत आणतो. विकतचे वेफर्स किंवा चिवडा देण्यापेक्षा घरात केलेल्या पापड्या, वेफर्स तळून देणे केव्हाही चांगले. घरातले तेल वापरले असल्याने आणि त्यात कोणतेही प्रिझर्वेटीव्ह नसल्याने हा पर्याय केव्हाही चांगला.
३. रताळं किंवा बटाट्याचे काप
नवरात्रीच्या दिवसांत साधारणपणे आपल्या घरात रताळं किंवा बटाटा असतोच. याचे काप करुन त्यामध्ये पिठीसाखर, तिखट, मीठ घालून हे काप ऐनवेळी तव्यावर शॅलो फ्राय करुन दिल्यास छान लागतात. यामध्ये कोटींगसाठी आपण राजगिरा पीठ किंवा साबुदाणा पिठाचा वापर करु शकतो.
४. फ्रूट प्लेट
फळं हा तर एरवीही आणि उपवासाच्या दिवसांतही सर्वात उत्तम पर्याय असतो. आपल्य़ा घरात उपलब्ध असतील ती दोन किंवा तीन फळे कापून त्याच्या छान फोडी करुन फळांची प्लेट आपण आलेल्या महिलांना किंवा आपल्या मैत्रीणींना नक्की देऊ शकतो.