गणपती संपले आणि म्हणता म्हणता नवरात्री आलीही. नऊ दिवसांचे हे व्रत, देवीचा जागर करत असताना घरातील महिला वर्गाची तारांबळ उडून जाते. स्त्री शक्तीचा हा उत्सव म्हणजे एकीकडे उपवास, व्रतवैकल्या, घरातील काम तर असतेच. त्यात गरबा किंवा दांडीया खेळायची लगबग आणि नटून थटून देवीच्या दर्शनाला जाण्याची तयारी. अशा सगळ्या गोंधळात देवीच्या आरतीसाठी रोज काय करायचं असा प्रश्न साहजिकच आपल्यापुढे असतो. एकतर हा नैवेद्य उपवासाला चालणारा, झटपट होणारा आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना चालेल असा हेल्दी असावा असं आपल्याला वाटतं. अशावेळी कोणते पर्याय करता येतील ते पाहूया (Navratri 2022 Devi Aarti Naivedya Options)...
१. दाण्याचे लाडू
आपल्या घरात साधारणपणे दाणे आणि गूळ अगदी सहज उपलब्ध असणारी गोष्ट आहे. यामध्ये थोडे तूप घालून त्याचे झटपट लाडू वळता येतात. हे लाडू अतिशय पौष्टीक असून ते सगळ्यांना आवडणारे असतात.
२. बटाटा किंवा रताळ्याचे काप
बटाटा साधारणपणे आपल्या घरात असतोच. तसंच रताळीही बाजारात अगदी सहज मिळतात. याचे काप करुन त्याला तिखट, मीठ, साखर लावून ते तेलावर किंवा तूपावर शॅलो फ्राय केल्यास ते सगळ्यांनाच आवडतात.
३. दूध
दूध आरोग्यासाठी सर्वात उत्तम आणि पूर्णान्न म्हणून ओळखली जाणारी गोष्ट आहे. आरतीला दूधाचा नैवेद्य ठेवला तर सध्याच्या गारठ्यात हे दूध घशासाठी उपयुक्त आणि शरीराला पोषण देणारे ठरु शकते. यामध्ये आपण आवडीनुसार हळद, दूधाचा मसाला असे काहीही घालू शकतो.
४. फळं
हा तर केव्हाही अगदी सहज उपलब्ध असणारा पर्याय आहे. अनेकदा रोजच्या धकाधकीत आपण फळं खात नाही मात्र या निमित्ताने मुद्दान फळांचा नैवेद्य ठेवला तर तो खाल्ला जातो. त्यातून पोषणही मिळते.
५. तळण
बटाट्याचे वेफर्स, साबुदाण्याच्या पापड्या, बटाटा किस असे उपवासाचे तळणाचे पदार्थ आपण वाळवण म्हणून घरी करतो किंवा बाजारातून विकत आणू शकतो. घरी आणून या गोष्टी तळल्यास त्या चांगल्या तेलात तळलेल्या असल्यामुळे बाधण्याची शक्यता कमी असते. हे कुरकुरीत पदार्थ खायला तर छान लागतातच पण ते घरचे असल्याने त्रास होण्याची शक्यता कमी असते.