गणपती झाले की येणारे नवरात्र म्हणजे नुसती धमाल. देवीची आरती करताना केले जाणारे उपवासाचे पदार्थ, गरबा किंवा दांडीयाचे कार्यक्रम, एकमेकांकडे हळदी-कुंकवाला जाणे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या काळात लहान मुलींचा आवर्जून केला जाणारा भोंडला. अनेक भागात या खेळाला हादगा असेही म्हटले जाते. मध्यभागी हत्ती ठेवून त्या बाजूने फेर धरुन गाणी म्हटली जातात. पूर्वीच्या काळी अशाप्रकारचे खेळ किंवा सणवार हे महिलांनी, मुलींनी एकत्र येण्याचे निमित्त होते. मात्र आजही ही परंपरा कायम जपत घरोघरी किंवा सार्वजनिक ठिकाणी आवर्जून भोंडल्याच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. ‘ऐलोमा, पेलोमा गणेश देवा, माझा खेळ मांडीला करीन तुझी सेवा’, ‘ एक लिंबू झेलू बाई दोन लिंबू झेलू….’, ‘कारल्याचा वेल...’, आणि सगळ्यात शेवटचं गाणं म्हणजे ‘आ़ड बाई आडोणी, आडाचं पाणी काढोनी...’ त्यानंतर खिरापत ओळखायण्याची जी काही मजा असते ती औरच. अजिबात ओळखता येणार नाही अशी खिरापत ठेवण्यातलीही मजा वेगळीच असते. बरेचदा भोंडल्याला येणाऱ्या मुलीही सोबत काही ना काही खिरापत घेऊन येतात. पाहूयात खिरापतीला करता येतील असे थोडे आगळेवेगळे पर्याय (Navratri Bhondla Hadga Khirapat food Options)...
१. वाटली डाळ
ही डाळ आपल्याकडे सणावाराला केली जात असली तरी एरवी फारशी केली जात नाही. थोडीशी ओलसर तरीही कोरडी अशी ही डाळ हरबऱ्याच्या डाळीपासून करतात. झटपट होणारी, सगळयांना आवडेल अशी ही रेसिपी आपण नक्की ट्राय करु शकतो. कोरडी नको असेल तर ओलसर लिंबू पिळूनही ही डाळ करता येते. ओळखायला थोडीशी अवघड असा हा पदार्थ सगळे आवडीने खातात.
२. खीर
खीर साधारणपणे आपण एखाद्या सणाला किंवा लहान मुलांना खाण्यासाठी करतो. पण भोंडल्याला साधारणपणे हा पदार्थ केला जात नाही. मात्र शेवया, साबुदाणा, रवा किंवा अगदी दलियाची थोडी घट्टसर खीर आपण भोंडल्याला करु शकतो. गोड पदार्थांपैकी विकतचे पदार्थ सगळे सांगू शकतात पण घरात केला जाणारा हा पारंपरिक पदार्थ उपस्थित मुलींना किंवा महिलांना ओळखता येईलच असे नाही.
३. पापड्या-कुरडया
आपल्या घरात वाळवणाचे काही ना काही प्रकार असतातच. कुरकुरीत गोष्टी लहान मुलांना विशेष प्रिय असतात. साधारणपणे भोंडला म्हटला की हल्ली बाहेरुन काहीतरी विकत आणण्याची पद्धत आहे. पण त्यापेक्षा आपल्या घरी असणारे वाळवणातील पापड, कुरडई, मिरगुंड, पापड्या असे प्रकार आपण तळले तर ते ओळखताही येणार नाही आणि हेल्दीही होईल.
४. दूध पोहे किंवा दडपे पोहे
पोहे हा आपण अगदी नेहमी करतो असा पदार्थ. करायला झटपट आणि पोटभरीचा हा पदार्थ नाश्त्याला किंवा कोणी पाहुणे आले की आपण आवर्जून करतो. पण दूध पोहे किंवा दडपे पोहे फारसे केले जात नाहीत. त्यामुळे थोडे वेगळ्या प्रकारचे हे पोहे आपण खिरापत म्हणून ठेवू शकतो.
५. फ्रेंच फ्राईज
करायला सोपे आणि लहान मुलांना अतिशय आवडीचा असा हा पदार्थ आपण भोंडल्याची खिरापत म्हणून ठेवला तर बच्चे कंपनी नक्कीच खूश होईल. घरच्या घरी अगदी झटपट हे फ्राईज करता येत असल्याने त्यात फारसा वेळही जात नाही आणि मुलांच्या आवडीचे असते. हा पदार्थ कदाचित ओळखता येण्यासारखा नसल्याने भोंडल्याला आपण ठेवू शकतो.