Join us  

नवरात्राचा एकटीचा उपवास पण बाकीच्यांना जेवण हवे? ४ टिप्स, न दमता झटपट करा स्वयंपाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2023 3:43 PM

Navratri Fasting Cooking Tips : काही गोष्टींचे नियोजन केल्यास स्वयंपाकाचे काम ९ दिवसांत प्रमाणाबाहेर न वाढता आटोक्यात राहू शकते.

नवरात्र म्हणजे ९ दिवसांचे उपवास, हे उपवास घरातले सगळे करत नाहीत. एखादवेळी उपवासाचा पदार्थ आवडीने खाल्ला जातो. पण उपवास नसलेल्यांनाही सतत उपवासाचे पदार्थ दिले तर त्यांना ते चालत नाही. अनेकदा उपवासाच्या पदार्थांमध्ये पोट भरत नाही, ते तेलकट किंवा पचायला जड असल्याने घरातील पुरुष मंडळी, वयस्कर व्यक्ती यांना हे पदार्थ नको असतात. अशावेळी महिलांवर उपवासाचे पदार्थ आणि नेहमीचा स्वयंपाक असे दोन्ही करावे लागते. यात देवीची पूजा, आरती, नैवेद्य, हळदी-कुंकू यांची गडबड असते ती वेगळी. अशावेळी एकीकडे उपवास आणि दुसरीकडे दुप्पट काम यामुळे पुरते थकून जायला होते. २ वेगळे स्वयंपाक करताना काही गोष्टींचे नियोजन केल्यास स्वयंपाकाचे काम ९ दिवसांत प्रमाणाबाहेर न वाढता आटोक्यात राहू शकते. तसेच घरातील लहान मुलांपासून ज्येष्ठ व्यक्तींपर्यंत सगळ्यांना खूश ठेवता येते. पाहूयात यासाठी नेमके काय करायचे (Navratri Fasting Cooking Tips)...

१. पोळ्या भाकरींना पर्याय नसल्याने त्या कराव्याच लागतात. पण भाजी करताना आपण उपवासाच्या पदार्थांसाठी बटाटा उकडणार असलो तर त्यातच ४ बटाटे जास्तीचे उकडून भाजी करावी. उपवासाला काकडीची कोशिंबीर लागते, तिच इतरांनाही चालू शकते. एरवी आपण घरात वेगवेगळ्या चटण्या करतो पण उपवासाला दाण्याची, खोबऱ्याची चटणी आणि लिंबाचे लोणचे चालते इतरांनाही हे सगळे चालू शकते. 

२. आपण उपवासासाठी जेवायला साबुदाण्याची खिचडी, थालिपीठ, भगर, रताळ्याचा कीस असे काही करायचे असेल तर हेच पदार्थ आपण बाकीच्यांना नाश्ता म्हणून देऊ शकतो. इतरवेळी हे पदार्थ आपण नाश्त्याला खातोच. त्यामुळे त्याच पदार्थांत इतरांचा नाश्ता करुन घ्यावा. 

३. काही घरांमध्ये दुपारी किंवा रात्रीही पातळ काहीतरी लागते. अशावेळी उपवासाला चालेल आणि बाकीच्यांनाही चालेल अशी दाण्याची आमटी, आमसूलाचे सार, ताक, सोलकढी असे पदार्थ नक्कीच उपयुक्त ठरतात. त्यामुळे दोघांनाही चालतील अशा पदार्थांचा आधीपासूनच अवश्य विचार करुन ठेवावा. यामुळे स्वयंपाकाचे काम नक्कीच नियंत्रणात येण्यास मदत होते. 

४. आपण काही भाज्यांना वेगवेगळ्या प्रकारची वाटणं करतो. पण उपवासासाठी ओलं किंवा सुकं खोबरं, दाण्याचा कूट, जीरे, मिरची या गोष्टी चालत असल्याने एकच वाटण दोन्ही पदार्थांसाठी केले तरी चालू शकते. त्यामुळे वाटण करायचा वेळ नक्कीच वाचण्यास मदत होते.  

टॅग्स :शारदीय नवरात्रोत्सव 2023नवरात्री उपवास आणि पदार्थ २०२३अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.नवरात्री