ऋचा मोडक
उपवास म्हणजे काहीतरी छान पौष्टिक, लाइट खावं असं मनात असतं. पण करायचं काय हा प्रश्न पडतो कारण नेहमीचे पदार्थच सुचतात. त्यानं पित्ताचा त्रास होतो. तेच ते खाऊन कंटाळाही येतो. आणि दोन्हीवेळा नवरात्रात उपवास करायचे तर रात्री काय खायचं असाही प्रश्न छळतो. पुन्हा चविष्टही हवं नाहीतर पोट भरल्यासारखं वाटत नाही.
या साऱ्यावर उत्तम उपाय म्हणजे उपवासाचेही सूप करतात येतात. करायला सोपे आणि रुचकर.
ज्या भाज्या उपवासाला चालतात, त्यांचं सूप करता येऊच शकतं.
लाल भोपळ्याचं सूप
लाल भोपळा आणि १ बटाटा उकडून छान मिक्सरला फिरवून घ्यायचं. त्यात चवी नुसार सैंधव किंवा साधं मीठ घालून उकळवून घ्यायचं त्यात वरून मलई फेटून किंवा क्रीम घालायचं. की सूप रेडी.
काकडीचे थंड सूप
काकडी , दही ,मीठ ,साखर, चवीला जिरं, मिरची असा मिक्सर ला फिरवून छान गारेगार सूप प्यायला मस्त लागतं.
(Image : Google)
सुरणाचे सूप
पांढऱ्या सुरणाचे काप( लालसर सुरण खाजरा असतो) मीठ आणि चिंच घालून शिजवून घायचा कुकर ला. मस्त रवीने घोटून भाजलेलं जिरे पूड, आणि नारळाचे दूध घालून एक उकळी काढून गरमागरम सूप सर्व्ह करा
असेच कच्च्या केळ्याचे सूप करता येईल
राजगिरा सूप-
राजगिरा लाही पीठ पातळ ताकात शिजवून मीठ, मिरची, जिरे पावडर घालून पौष्टिक सूप.
असेच वरी पीठ, साबुदाणा भाजून त्याचे पीठ, केळ्याचे पीठ, शिंगड्याचे पीठ वापरून विविध सूप करता येतात.
या सूपमध्ये ताका ऐवजी नारळाचे दूध, काजूचे दूध, बदामाचे दूध किंवा शेंगदाण्याचे दूध वापरता येईल. ( वेगन असणाऱ्यांसाठी पर्याय).
सूपासोबत काय खाल?
(Image : google)
कुरकुरीत भेंडी
भेंडीचे उभे 4/6 काप करून मीठ लावून ठेवावे. उपासाला चालणारे वरील पैकी कुठलेही पीठ किंवा उपवास भाजणी कोरडे घेऊन त्यात मीठ लावलेली भेंडी घोळवून ती तेल/तुपात मंद आचेवर तळून कुरकुरीत करून घ्यावी.
कुरकुरीत भेंडी चाट
वरून लिंबू लाल तिखट जिरे आवडत असेल आणि उपवासाला चालत असेल तर चाट मसाला हवे ते भुरभुरून नुसता खायला छान लागते.
त्यावर दही आणि गोड खजूर चिंच चटणी घेऊन खाता येते.
कुरकुरीत भेंडी किंवा पनीरचे छोटे तुकडे कुठल्याही वरील सूप मध्ये तळलेल्या नूडल्स ऐवजी वापरता येतात.