भक्ती सोमण-गोखले
नवरात्र- दुसरी माळ आणि आजचा रंग लाल. देवीची नऊ रूप. त्याप्रमाणे नऊ रंगही महत्वाचे. त्या त्या रंगांचे कपडे घालणे तसे सोपे, आनंदाचेही. पण नवरात्रीत आपल्या रोजच्या आहारातही आपण हे नवरंग अगदी सहज दाखवू शकतो. अन्नपूर्णेच्या कृपेने आपल्याकडे अशा प्रत्येक रंगाच्या भाज्या, फळे अगदी सहज उपलब्ध आहेत. नवरात्री व्यतिरिक्त आपण रोज जेवणात विविध रंगाचे खाद्यपदार्थ करतोच. तेच पदार्थ नवरात्रीतही करायचे मात्र रंगाचे भान राखून. हेच बघा ना. कालचा रंग होता पांढरा. पांढऱ्या रंगाचं दूध असतं. त्या दूधापासून खीर, पायसम असे गोड पदार्थ केले जाऊ शकतात. अगदीच वेळ नसेल तर इडलीही करता येऊ शकते. अजून आठवून बघा पांढऱ्या रंगाचे पदार्थ कोणते आहेत ते? आठवले का? हीच तर गंमत आहे. आता आज नवरात्रीचा दुसरा दिवस. लाल रंग. नेहमीच्या आमटीपेक्षा मी लाल रंगाच्या टोमॅटोचं सार केलं. सॅलेड म्हणून टोमॅटोची कोशिंबीर आहेच. म्हणजे रोजच्या आहारातही तुम्ही रंग अशाप्रकारे फॉलो करू शकता.
लाल रंगापासून करता येणारे पदार्थ
टोमॅटोचे सार, टोमॅटो उत्तपा, टोमॅटोची भाजी, टोमॅटो राजमा सॅलेड, डाळिंबाचे ज्यूस, कलिंगड ज्यूस
टोमॅटो सार
माझ्या सासूबाई कर्नाटकी पद्धतीने टोमॅटो सार करतात. तुम्हीही करून बघा. फार वेळ लागत नाही. भाताचा कुकर होता होता सार होऊनही जाते.साहित्य- ४ टोमॅटो, उडदाची डाळ, कडीपत्ता
कृती- टोमॅटो कुकरमध्ये उकडून घ्यावेत. गार झाल्यावर मिक्सरमध्ये त्याची प्युरी करून घ्यावी. एका खोलगट भांड्यात तेल गरम करून त्यात नेहमीप्रमाणे फोडणी करावी. फोडणीतच एक चमचा उडदाची डाळ, कडीपत्ता, १-२ लाल मिरच्या, छोटा चमचा सुकं खोबरं, आवडत असल्यास लसूण, आणि टोमॅटोची प्युरी घालावी. मग त्यात आवडीप्रमाणे तिखट, सांबार मसाला, मीठ, साखर घालून चांगली उकळी आणावी. यात तुम्हाला सार जितके घट्ट, पातळ हवे तितके पाणी घालावे.
उद्याचा रंग आहे गडद निळा. या रंगापासून कोणता पदार्थ तयार करता येऊ शकतो हे नक्की शेअर करा. आणि वाचा उद्याचा निळा पदार्थंही इथेच..
(लेखिका मुक्त पत्रकार असून, फूड बिझनेस प्रमोशनसाठी Three Cheers हे YouTube चॅनल चालवितात.) (https://m.youtube.com/channel/UCpBE9TFFIs5m5HjAOpJI-tw)