नवरात्रीचे नऊ दिवस उपवास हे परंपरेप्रमाणे, कोणी आवडीने , कोणी र्शध्देने करतात. पण नऊ दिवस उपवास ही सोपी गोष्ट नाही. या उपवासांनी आत्मिक बळ वाढतं हे खरं असलं तरी या नऊ दिवसात आपण स्वत: उपवासाच्या नावाखाली खाण्यापिण्याची आबाळ करुन घेतली तर अशक्तपणा आणि थकवा येतो. त्यासाठी उपवासाचा आहार पोषक आणि संतुलित ठेवायला हवा. पण नेहेमीचेच उपवासाचे पदार्थ खाऊन कंटाळा येतो.त्यामुळे अनेकजणी खाण्याचा कंटाळा करुन तब्येत बिघडवून घेतात. असं होवू नये म्हणून उपवासाला निरनिराळ्या पदार्थांचे पर्याय शोधायला हवेत. हा शोध सोपा जावा यासाठी काही खास पाककृती नवरात्री निमित्त..
नवरात्रीच्या उपवासासाठी बाजारात रताळी मोठ्या प्रमाणात दिसतात. या रताळ्यांचा उपयोग करुन पौष्टिक ते चवदार असे अनेक पदार्थ करता येतात.
Image: Google
उपवासाला रताळी का खावीत?
रताळ्याद्वारे आपल्याला आरोग्य आणि स्वाद दोन्हीही मिळतं. हिवाळ्यात आणि पावसाळ्यातल्या ओल्या वातावरणात रताळी खाणं आरोग्यास लाभदायक मानलं जातं. रक्तदाबाचा त्रास, मधुमेह यात रताळी खाणं फायदेशीर ठरतं तर अशक्तपणा घालवण्यासाठीही रताळी खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. रताळ्यात अ आणि ए जीवनसत्त्वं, खनिज, बीटा केरोटिन आणि पोटॅशियम मोठ्या प्रमाणात असतात. रताळ्यावर झालेले अभ्यास सांगतात की, रताळ्यामधे अँण्टि एजिंग गुणधर्मही असतात. रताळ्यांमधे मोठ्या प्रमाणावर फायबर असतं , त्याचा उपयोग पचन सुधारण्याकामी होतो. त्यामुळे उपवासाला रताळी आणि रताळ्याचे पदार्थ खाण्याला विशेष महत्त्व आहे.
Image: Google
रताळ्याची खीर
रताळ्याची खीर करण्यासाठी 3-4 मध्यम आकाराची रताळी , अर्धा लिटर दूध, अर्धा कप साखर, 1 छोटा चमचा तूप, 1 मोठा चमचा बारीक चिरलेले बदाम आणि पाव चमचा वेलची पावडर घ्यावी.
आधी रताळी स्वच्छ धुवून पुसून घ्यावीत. रताळी छिलून साल काढून मग किसून घ्यावीत. एका कढईत एक चमचा तूप घालून ते गरम करावं. त्यात रताळ्याचा किस घालून तो दोन तीन मिनिटं परतून घ्यावा. मग त्यात दूध घालून रताळ्याचा किस शिजू द्यावा. यात घातलेलं दूध अर्धं होवू द्यावं. मग त्यात साखर, बदामाचे काप, वेलची पावडर घालावी. खीर ढवळून घ्यावी. गॅस बंद करुन खीर थंड होवू द्यावी.
Image: Google
रताळ्याचे कबाब
कबाब करण्यासाठी दोन मध्यम आकाराची उकडलेली रताळी, दोन मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे, एक इंच आलं किसलेलं, बारीक चिरलेली कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, पाव चमचा मिरे पूड, अर्धा चमचा जिरे पूड, अर्धा चमचा सैंघव मीठ घ्यावं.
कबाब करण्यासाठी सर्वात आधी उकडलेली रताळी आणि बटाटे सोलून मग ते कुस्करुन घ्यावेत. कढईत दोन चमचे तेल घालावं. ते गरम झालं की त्यात कुस्करलेली रताळी आणि बटाटे घालून मिश्रण चांगलं परतून घ्यावं. नंतर त्यात सैंधव, जिरे पूड, मिर पूड, किसलेलं आलं ,चिरलेल्य मिरच्या आणि कोथिंबीर घालावी. हे सर्व जिन्नस छान एकजीव करुन घ्यावं. या मिश्रणाचे छोटे चोटे गोळे करावेत. एक नॉनस्टिक पॅन गरम करुन त्यावर थोडं तेल सोडावं. रताळ्याचे कबाब शेकण्यासाठी त्यावर ठेवावे. हे कबाब दोन्ही बाजुंनी छान सोनेरी शेकून घ्यावेत. हे कबात शॅलो फ्राय करण्याऐवजी तेलात तळून घेतले तरी चालतात. पण आरोग्याचा विचार करता रताळ्याचे कबाब उत्तम आहेत.
Image: Google
रताळ्याचा पराठा
उपवासाला शरीराला ऊर्जा देणारा पराठी म्हणून रताळ्याचा पराठा केला जातो. रताळ्याचा पराठा करण्यासाठी अर्धा किलो रताळी, 200 ग्रॅम शिंगाड्याचं पीठ, 200 ग्रॅम राजगिर्याचं पीठ , साजूक तूप आणि वेलची पावडर घ्यावी.
पराठे करताना आधी रताळी उकडून घ्यावीत. मग ती सोलून कुस्करुन घ्यावीत. कढईत थोडं तूप घालून मंद आचेवर कुस्करलेरी रताळी परतावीत. परताना खमंग वास सुटला की त्यात वेलची पावडर घालून हे मिश्रण थंड होवू द्यावं.
तोपर्यंत पराठ्यांसाठी लागणारं पीठ मळून घ्यावं. यासाठी शिंगाड्याचं आणि राजगिर्याचं पीठ एकत्र करुन पाण्यानं मळून घ्यावं. थोडा वेळ पीठ सेट होवू द्यावं. त्यानंतर बटाट्याचा पराठा करतो तसा हा पराठा करावा. त्यासाठी थोडं सारण घ्यावं. आणि ते एका छोट्या लाटीच्या छोट्या पोळीत भरावं. बटाट्याच्या पराठ्याप्रमाणे रताळ्याचा हा पराठा शेकून घ्यावा. शेकताना पराठ्यावर तेल किंवा तूप सोडावं. पण हे पराठे तुपावर शेकल्याने ते आरोग्यदायी होतात आणि खमंगही लागतात.
Image: Google
रताळ्याचं चाट
रताळ्याचं चाट तयार करण्यासाठी 4 रताळी, मीठ , चिमूटभर सैंधव मीठ , अर्धा चमचा काळी मिरी पूड, अर्धा चमचा लाल तिखट, एक चमचा चाट मसाला, चिरलेली कोथिंबीर आणि अध्र्या लिंबाचा रस घ्यावा.
सर्वात आधी रताळी उकडून थंड होवू द्यावीत. मग रताळी सोलून ती गोल गोल आकारात कापावीत. त्यावर चवीनुसार साधं मीठ, सैंधव मीठ , मिरे पूड, लाल तिखट आणि चाट मसाला घालावा. हलक्या हाताने रताळ्याच्या फोडी हलवून सर्व मसाले छान एकत्र करुन घ्यावेत. एका ताटात रताळ्याचं चाट काढून त्यावर लिंबाचा रस घालावा. पुन्हा रताळ्याच्या फोडी हलवून घ्याव्यात. शेवटी त्यावर कोथिंबीर पेरावी.
Image: Google
रताळ्याचा हलवा
रताळ्याचा हलवा हा उत्तर भारतात करतात. रताळ्याचा हलवा करण्यासाठी पाव किलो रताळी, अर्धा चमचा वेलची पूड, 100 ग्रॅम साजूक तूप , आवडीनुसार पत्री खडीसाखर किंवा ब्राऊन शुगर आणि सुकामेवा घ्यावा.
रताळ्यचा हलवा करताना रताळी आधी उकडून गार करुन सोलून घ्यावीत. मग ती कुस्करुन घ्यावीत. कढईत मंद आचेवर तूप गरम करावं. कुस्करलेली रताळी तुपात घालून छान भाजून घ्यावीत. रताळ्याचा रंग बदलेपर्यंत ते परतत राहावं. रंग बदलला, खमंग वास सुटला की त्यात वेलची पावडर , खडीसाखर घालावी. साखर विरघळेपर्यंत हलवा हलवत राहावा.