Join us  

उपवासाची भजी खाऊन तर पाहा! 5 प्रकारची उपवास भजी, उपवास नसलेलेही खाऊच शकतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2021 5:23 PM

उपवासाचे मिळमिळीत पदार्थ खाऊन कंटाळा येणारच. हा कंटाळा घालवण्यासाठी आहेत उपवासाची खमंग भजी.

ठळक मुद्देकाकडीची भजी करताना शिंगाड्याचं किंवा कुट्टुचं पीठ वापरावं.पनीरची भजी करताना पाव कप शिंगाड्याच्या पिठात त्याच्या दुप्पट भगर घालावी. शिंगाड्याचं पीठ ग्लूटेन फ्री असतं. त्यात चिकटावा नसतो. त्यामुळे या पिठाची भजी करताना त्यात उकडलेला बटाटा किंवा उकडलेली अरबी वापरावी लागते.

उपवासाला साबुदाण्याचे वडे हे माहिती आहेत पण उपवासाची भजी कधी ऐकली किंवा केली आहेत का? उपवासाला वेगवेगळ्या प्रकारची भजी तयार करता येतात. भजी म्हटल्याबरोबर तोंडाला पाणी सुटतं. पण केवळ उपवास आहे म्हणून भजी खाता येत नाही असं आजपर्यंत नक्कीच वाटत असेल. पण काकडीची, शिंगाड्याच्या, कुट्टुच्या पिठाची, उपवासाची बटाट्याची भजी कशी करायची हे समजून घेतलं तर उपवासाच्या पदार्थांना खमंग चवही देता येईल.

Image: Google

काकडीची भजी

काकडीची भजी करताना शिंगाड्याचं किंवा कुट्टुचं पीठ वापरावं. काकडी किसून न घेता काकडीच्या पातळ चकत्या कराव्यात.

काकडीची भजी करण्यासाठी 1 कप शिंगाड्याचं पीठ, चवीनुसार सैंधव मीठ, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धने पावडर, 1 मोठा चमचा हिरवी मिरची, दोन काकड्या पातळ चकत्या केलेल्या आणि तळणासाठी तेल घ्यावं.काकडीची भजी करताना काकडी आणि तेल सोडून बाकी सर्व जिन्नस एकत्र करावं मिश्रण भज्याच्या पिठासारखं करण्यासाठी त्यात थोडं पाणी घालावं. पीठ भिजवलं की मग तेल गरम करायला ठेवावं. काकडीच्या पातळ चकत्या भज्यांच्या पिठात मिसळाव्या. चकत्यांना व्यवस्थित पीठ लागलं पाहिजे. या चकत्या तेलात घालून तळून घ्याव्यात. भजी मध्यम आचेवर तळावीत, म्हणजे नीट तळली जातात. नारळाच्या, खजुराच्या आंबट गोड चटणीसोबत ही भजी छान लागतात.

Image: Google

पनीरची भजी

उपवासाच्या आहारात पनीर वेगवेगळ्या प्रकारे खाता येतं. पनीरचा खमंग आणि रुचकर प्रकार म्हणजे पनीरची भजी. पनीरची भजी करण्यासाठी अर्धा कप भगर, पाव कप शिंगाड्याचं पीठ, 2 बारीक चिरलेल्या हिरव्य मिरच्या, कोथिंबीर, चवीप्रमाणे सैधव मीठ, 2 छोटे चमचे काळी मिरीपूड, पाणी, 300 ग्रॅम पनीर आणि तळण्यासाठी साजूक तूप किंवा तेल एवढी सामग्री लागते.

पनीरची भजी करताना एका खोलगट भांड्यात भगर्, शिंगाड्याचं पीठ, मिरचीचे तुकडे, बारीक चिरलेली कोथिंबीर, मीठ, मिरे पूड हे जिन्नस घ्यावं. त्यात थोडं पाणी घालून पातळ मिश्रण करावं. हे मिश्रण बाजूला ठेवून द्यावं. मग पनीरचे तुकडे करावेत. एका भांड्यात एक चमचा काळी मिरीपूड, सैंधव मीठ घ्यावं. हा मसाला पनीरच्या तुकड्यांमधे घालण्यासाठी पनीरचा तुकड्याला मध्यभागी चिर द्यावी. यात एक ते दोन चिमूट हा मसाला घालावा. हे पनीरचे तुकडे भज्यांच्या पिठात मिसळावेत. तेल तापवून ते खरपूस तळून घ्यावेत. तळून झाल्यावर ते पेपर टॉवेलवर ठेवावेत. पुदिना आणि कोथिंबीरच्या चटणीसोबत पनीरची भजी छान लागतात.

Image: Google

शिंगाड्याच्या पिठाची भजी

शिंगाड्याचं पीठ ग्लूटेन फ्री असतं. त्यामुळे त्यात चिकटावा नसतो. त्यामुळे त्यात उकडलेला बटाटा किंवा उकडलेली अरबी वापरावी लागते. यामुळे या पिठाच्या भजींना छान चव येते. ही भजी करण्यासाठी 2 उकडलेले बटाटे तुकडे करुन, चवीनुसार सैंधव मीठ, 2 छोटे चमचे बारीक चिरलेली हिरवी मिरची, अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 कप शिंगाड्याचं पीठ, पाव कप पाणी आणि तळण्यासाठी तेल घ्यावं.

एका भांड्यात उकडलेले बटाटे कापून घ्यावेत. त्यात सैंधव मीठ, कोथिंबीर, मिरची घालून सर्व जिन्नस चांगलं मिसळून घ्यावं. त्यात शिंगाड्याचं पीठ घालावं. यात हळुह्ळु पाणी मिसळावं आणि भज्यांसठी दाटसर मिश्रण तयार करुन घ्यावं. कढईत तेल गरम करावं. चमच्याच्या सहाय्यानं एक एक करुन भजी तेलात सोडावीत. भजी मंद आचेवर खमंग तळून घ्यावीत. भजी लालसर झाली की ती काढून घ्यावीत.

Image: Google

कुट्टु पिठाची भजी

कुट्टुच्या पिठापासून उपवासाचे अनेक पदार्थ करता येतात. या पिठाची भजीही छान लागतात. ही भजी करण्यासाठी 2 कप कुट्टुचं पीठ, 2 उकडलेले बटाटे किंवा उकडलेल्या अरबी, 2 हिरव्या मिरच्या, 1 छोटा चमचा मिरीपूड, चवीनुसार सैंधव मीठ आणि तळण्यासाठी तेल घ्यावं.

सर्वात आधी एका भांड्यात कुट्टुचं पीठ, मीठ आणि मिरीपूड हे जिन्नस एकत्र करुन घ्यावं. यात थोडं पाणी घालून दाटसर मिश्रण तयार करावं. मध्यम आचेवर तेल गरम करायला ठेवावं. उकडलेले बटाटे गोल गोल चकत्यात कापून घ्यावेत. एक एक चकती मिश्रणात घोळवून तेलात सोडावी. सोनेरी रंगावर भजी तळून घ्यावीत. ही भजी दह्यासोबत छान लागतात. बटाटे चकत्या करुन किंवा कुस्करुन पिठात मिसळून बोंड्याप्रमाणे तळले तरी छान लागतात.

Image: Google

रताळ्याची भजी

ही भजी करण्यासाठी 1 कप उकडून कापून घेतलेले रताळे, 1 कप कच्चा बटाटा छिलून किसून घेतलेला, 1 चमचा आरारुट, 2 चमचे दाण्याचा कूट, 2 चमचे बारीक कापलेली कोथिंबीर, 1 चमचा बारीक कापलेली मिरची, चवीनुसार सैंधव मीठ आणि तळण्यासाठी तेल घ्यावं.

एका भांड्यात सर्व सामग्री व्यवस्थित एकत्र करुन घ्यावी. गरजेनुसार पाणी घालून मिश्रण दाटसर ठेवावं. कढईत तेल गरम करावं. मिश्रण चमच्यानं घ्यावं आणि तेलात सोडावं. भजी तळताना पार हलवू नये. ती खरपूस तळली गेली की तेलातून काढून पेपर टॉवेलवर ठेवावी.