नवरात्रीत देवीची आराधना करताना बहुतांश भक्त ९ दिवसांचे उपवास करतात. पूर्ण ९ दिवस उपवासाचे पदार्थ खाऊन, एकाच वेळी खाऊन किंवा काही पदार्थ वर्ज्य करुन हे उपवास केले जातात. उपवासाचे पदार्थ सुरुवातीचे २ दिवस वेगळे म्हणून आवडीने खाल्ले जातात. मात्र नंतर साबुदाणा, बटाटा, तळलेले पदार्थ, गोडाचे पदार्थ यांचा अतिशय कंटाळा येतो. उपवास असताना तर हे पदार्थ अजिबात नको वाटतात. पहिला ३-४ दिवस झाले की उपवासामुळे नकळत एकप्रकारचा थकवा यायला लागतो. मात्र नवरात्रीची देवीची आरती, भोंडला, हळदी-कुंकू, गरबा असे कार्यक्रम असल्याने आपल्या अंगात ताकद असणेही तितकेच महत्त्वाचे असते (Navratri Special homemade Kesar badam mix Recipe).
सगळ्या पातळ्यांवर लढताना महिलांची पुरती दमछाक होते आणि शरीराचे पुरेसे पोषण होत नाही. यासाठी या कालावधीत उपवास असताना शरीराला झटपट ताकद मिळेल अशा गोष्टींचा आहारात समावेश कऱणे आवश्यक असते. यामध्ये सुकामेवा, फळं, खजूर, राजगिरा, दूध यांचा समावेश होतो. नवरात्रीच्या आधीच नवरात्रीसाठी थोडी तयारी करुन ठेवली तर ९ दिवस आपली जास्त धांदल होत नाही. मग ऐनवेळी विकतचे काहीतरी आणण्यापेक्षा घरात काही तयार असेल तर पटकन घेता येते. पाहूयात अंगातली ताकद टिकून राहावी आणि दिवसभर आपण फ्रेश राहावे यासाठी करुन ठेवायला हवे असे केशर बदाम मिक्स रेसिपी...
साहित्य -
१. बदाम - १ वाटी
२. काजू - १ चमचा
३. पिस्ते - १ चमचा
४. वेलदोडे - ३ ते ४
५. केशर - अर्धा चमचा
६. हळद - पाव चमचा
७. खडीसाखर- आवडीनुसार
कृती -
१. एका पातेल्यात पाणी घेऊन त्यामध्ये ३ ते ४ मिनीटे बदाम चांगले शिजवून घ्या.
२. त्यानंतर पाणी गाळून बदाम थंड होऊद्या आणि मग त्याची साले काढून टाका
३. थोडे कोरडे झाले की हे बदाम एका पॅनमध्ये भाजून घ्या.
४. यामध्ये काजू, पिस्ते आणि वेलदोडे घालून त्याचा छान स्वाद येईपर्यंत हे सगळे परतून घ्या.
५. सगळ्यात शेवटी यामध्ये केशर घाला आणि हे सगळे एका ताटलीत काढून गार होण्यासाठी ठेवून द्या.
६. मिक्सरच्या भांड्यात हळद आणि खडीसाखर बारीक करुन घ्या.
७. त्यातच भाजलेला सुकामेवा आणि केशर घालून पुन्हा मिक्सरवर बारीक पूड होईपर्यंत फिरवा.
८. हे सगळे चांगले गार झाले की एका हवाबंद बरणीत भरुन ठेवा महिनाभर नक्की टिकते, त्याहून जास्त टिकवायचे असल्यास फ्रिजमध्ये ठेवा.
९. हवे तेव्हा गरम किंवा गार दुधात चमचाभर मिश्रण घालून दूध प्या.
१०. याशिवाय आईस्क्रीम, स्मूदी, खीर यांसारख्या गोष्टींमध्येही आपण हे मिश्रण वापरु शकतो.