नवरात्र सुरू झाल्यावर घरोघरी उपवासाचे पदार्थ, देवीचा नैवेद्य असे काही ना काही घरोघरी सुरू असते. पण अष्टमीला बऱ्याच जणांकडे पारंपरिक नैवेद्य दाखवला जातो. घटाला कडकण्या, साटोऱ्या किंवा सांजोऱ्यांचा नैवेद्य दाखवण्याची पद्धत आहे. या सांजोऱ्या एका दोरीत माळून माळेप्रमाणे त्या घटांवर सोडल्या जातात. चवीला सांज्याच्या पोळीप्रमाणे लागणाऱ्या पण कडक अशा या साटोऱ्या केल्या जातात (Navratri special how to make traditional satori sanjori on ashtami).
महाराष्ट्रातील सर्व शहरांमध्ये या साटोऱ्या करण्याची पद्धत वेगवेगळी असते. पण साधारणपणे मैदा, रवा, तूप, साखर यांचा वापर करुन केल्या जाणाऱ्या या साटोऱ्या देवी अष्टमीला खाते आणि उपवास सोडते असे म्हणतात. मग नवमीला किंवा दशमी म्हणजेच दसऱ्याला देवीला गोडाधोडाचा नैवेद्य दाखवला जातो. वर्षभर सहसा आपण हा पदार्थ करत नाही पण या निमित्ताने मात्र साटोऱ्या आवर्जून केल्या जातात. पाहूया या पारंपरिक साटोऱ्या किंवा सांजोऱ्या करण्याची पद्धत..
१. साटोऱ्यांचे आवरण ही अतिशय महत्त्वाची गोष्ट असते. त्यासाठी साधारण १ वाटी रव्यामध्ये मीठ आणि तूप घालून अंदाजे पाणी घालून मध्यमसर पीठ मळून घ्यायचे आणि साधारण अर्धा तास हे पीठ मुरवण्यासाठी ठेवायचे.
२. साटोरीतील सारण करण्यासाठी पॅनमध्ये तूप घालून त्यावर १ वाटी रवा खरपूस भाजून घ्यायचा. रवा थोडा भाजत आला की वरुन गरम दुधाचा हबका द्यायचा म्हणजे रव्याचा कच्चेपणा निघून जाण्यास मदत होते.
३. भाजल्याने आणि दूध-तुपामुळे रवा चांगला फुलतो. मग आवडीप्रमाणे त्यामध्ये खवा घालायचा आणि २ ते ३ मिनीटे चांगले एकजीव परतून घ्यायचे. खवा नाही घातला तरी चालतो पण खव्याने सारण मिळून येण्यास मदत होते.
४. सारण चांगले एकजीव होण्यासाठी परतून झाल्यावर झाकण ठेवून १० मिनीटे बाजूला ठेवायचे.
५. १० मिनीटांनी यामध्ये पिठीसाखर आणि वेलची पूड घालून हे मिश्रण पु्न्हा चांगले एकजीव करुन घ्यायचे.
६. आता साटोऱ्या करण्यासाठी भिजवलेल्या रव्याचा पिठाचे लहान गोळे करुन ते मध्यम आकाराचे लाटून घ्यायचे.
७. या लाटलेल्या पुरीमध्ये मध्यभागी सारण भरुन पोळी बंद करुन पुन्हा लाटायची, खूप पातळ न करता ही साटोरी तव्यावर तूप सोडून चांगली खरपूस भाजून घ्यायची.