आज घटस्थापना असल्याने बहुतांश जणांकडे घट बसतात. कधी देवीला खिरीचा नैवेद्य दाखवला जातो तर कधी पुरणाचा. मात्र काही जणांकडे आवर्जून करंजीचा नैवेद्य दाखवला जातो. करंजी म्हटलं की अनेकींना टेन्शन येते. कारण कधी करंजीचे सारण फसते तर कधी करंज्या तळताना फुटतात, कधी खूपच कडक होतात. मात्र या करंज्या करताना योग्य ती काळजी घेतली तर त्या मस्त खुसखुशीत होतात. यासाठी काही किमान गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. करंजीच्या आवरणाचे पीठ भिजवताना, सारण करताना, लाटताना, भरताना आणि तळताना नेमकं काय केलं तर करंजी फुटणार नाही किंवा कडक होणार नाही ते पाहूया (Navratri special karanji naivedya easy recipe)....
साहित्य -
१. मैदा - २ वाटी
२. रवा - २ चमचे
३. तूप – २ चमचे
४. खोबऱ्याचा किस – १ वाटी
५. सुकामेवा काप – २ चमचे
६. खसखस – १ चमचा
७. मनुके - १ चमचा
८. तेल – २ ते ३ वाट्या तळण्यासाठी
९. पिठीसाखर – अर्धी वाटी
१०. मीठ – चवीपुरते
कृती -
१. सगळ्यात आधी मैदा आणि रवा एकत्र करुन त्यामध्ये तूप कोमट करुन घाला.
२. चमच्याने हे सगळे चांगले एकत्र करुन घ्या आणि थोडं थोडं कोमट पाणी घालून घट्टसर पीठ मळून घ्या.
३. पीठ ८ ते १० मिनीटे मळावे, जितके जास्त मळू तितकी करंजी खुसखुशीत होईल.
४. पीठ मळून झाल्यानंतर ओल्या फडक्याने अर्धा तास झाकून ठेवा, त्यामुळे ते चांगले मुरण्यास मदत होईल.
५. सारणासाठी कढईत तूप घालून सुकामेवा त्यामध्ये चांगला परतून घ्या.
६. नंतर खोबऱ्याचा किस आणि मग शेवटी खसखस लालसर होईपर्यंत परतून घ्यावी.
७. मिश्रण थंड झाल्यावर त्यामध्ये पिठीसाखर घालून ते एकजीव करायचे.
८. कणकेचा छोटा गोळा घेऊन थोडी जाडसर पुरी लाटा, त्याच्या मध्यभागी सारण घालून कडांना पाणी लावून त्या मिटून घ्या.
९. कडक तापलेल्या तेलात मध्यम आचेवर करंज्या लालसर तळून घ्या.