Join us  

देवीच्या नैवेद्यासाठी करा शुगर फ्री खजूर-खोबऱ्याचे सोपे पेढे! इतके चविष्ट पेढे बाजारातही मिळणार नाहीत..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2023 9:50 AM

Navratri Special Khajoor Coconut Peda Easy Recipe : पौष्टीक घटक असल्याने लहान मुलं, वयस्कर व्यक्ती, उपवास असणारे अशा सगळ्यांसाठीच हा प्रसाद चांगला पर्याय असतो.

गणपतीच्या दिवसांत आपण बाप्पाच्या नैवेद्यासाठी ज्याप्रमाणे विविध प्रकारचे मोदक आणि गोडाचे पदार्थ करतो. त्याचप्रमाणे नवरात्रीच्या दिवसांत देवीच्या नैवेद्यासाठीही काही ना काही करावे लागते. मात्र या दिवसांत अनेकांचा उपवास असल्याने हे पदार्थ उपवासाचे असावे लागतात. देवीच्या नैवेद्याला खव्याचे पेढे, बर्फी, उपवासाला चालतील असे लाडू, फळं, खजूर असे काही ना काही दिले जाते. पण यातील बहुतांश पदार्थ आपण बाजारातून विकत आणतो. या पदार्थांची किंमत तर खूप जास्त असतेच पण त्यामध्ये वापरलेले जिन्नस काय दर्जाचे असतात हे आपण सांगू शकत नाही. अशावेळी कमीत कमी पदार्थांमध्ये घरच्या घरीच आपण चविष्ट असा पेढा केला तर? शुगर फ्री असल्याने डायबिटीस किंवा लठ्ठपणाची समस्या असलेले लोकही अतिशय आनंदाने हा प्रसाद खाऊ शकतील. इतकेच नाही तर यातील घटक पौष्टीक असल्याने लहान मुलं, वयस्कर व्यक्ती, उपवास असणारे अशा सगळ्यांसाठीच हा शुगर फ्री पेढा अतिशय चांगला पर्याय ठरु शकतो. पाहूयात हे पेढे करण्यासाठी नेमके कोणते जिन्नस लागतात आणि ते कसे करायचे (Navratri Special Khajoor Coconut Peda Easy Recipe) . 

१. साधारण १० ते १२ खजून घ्यायचे आणि ते कोमट दुधात भिजवून ठेवायचे. 

२. खजूर चांगले भिजले की त्याच्या बिया काढून खजूराचा गर आणि दूध यांची मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करुन घ्यायची.

३. एका पॅनमध्ये चमचाभर तूप घालून त्यामध्ये १ वाटी मिल्क पावडर घालून ती चांगली लालसर होईपर्यंत परतून घ्यायची. 

४. काही वेळाने यामध्ये थोडेसे दूध आणि खजूराची केलेली पेस्ट घालायची आणि वरुन तूप सोडून हे मिश्रण चांगले एकजीव करुन घ्यायचे.

५. मग यामध्ये साधारण पाऊण कप सुक्या खोबऱ्याचा बारीक कीस घालायचा आणि पुन्हा सगळे चांगले एकजीव करुन घ्यायचे. 

६. शेवटी यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड आणि स्वादासाठी अर्धा चमचा गुलाब पाणी घालून सगळे नीट हलवून घ्यायचे. 

७. हे मिश्रण थोडे गार झाले की त्याचे लहान आकाराचे गोलाकार पेढे करायचे

८. हे पेढे खोबऱ्याचा बारीक कीस आणि पिस्त्याची पावडर यामध्ये चांगले घोळून घ्यायचे. 

टॅग्स :शारदीय नवरात्रोत्सव 2023नवरात्री उपवास आणि पदार्थ २०२३अन्नपाककृती