आरोग्याचा विचार न करता चटपटीत, चमचमीत पदार्थ खाल्ले जातात आणि दुसरीकडे वेटलाॅससाठी काय करता येईल याचे उपाय शोधले जातात. आरोग्य कमवायचं तर खाण्यापिण्याची पथ्यं पाळायलाच हवीत. पण पथ्यं पाळणं म्हणजे आवडीचे चविष्ट, चटपटीत पदार्थ खायचे नाहीत असं नाही. आपण चवीच्या पदार्थांशी तडजोड न करताही चटपटीत पदार्थांना आरोग्यदायी करु शकतो. नीना गुप्ता यांनी स्वत: हे मार्ग सांगितले आहेत. वयाच्या 62व्या वर्षीही फिट आणि फाइन असलेल्या नीना गुप्ता आपल्या स्वयंपाकघरात स्वत:ला आवडणारे विविध पदार्थ स्वत: करतात. या पदार्थांचं विशेष म्हणजे हे पदार्थ चटपटीत असले तरी ते हेल्दी कसे होतील याला नीना गुप्ता विशेष प्राधान्य देतात.
Image: Google
नीना गुप्ता यांनी आपल्या इन्स्टाग्रामवरुन पौष्टिक मिसळ आणि हेल्दी बर्गर करण्याचे दोन व्हिडीओ शेअर केले आहेत. या दोन्ही पदार्थांची ओळख चटपटीत अशी असली तरी ते सहजरित्या पौष्टिक करुन चव आणि आरोग्य या दोन्हींची काळजी घेता येते असं नीना गुप्ता सांगतात. मिसळ आणि बर्गर करताना नीना गुप्ता यांनी कमी मसाले, कमी जिन्नस, कमी तेलाचा वापर करुन चटपटीत पदार्थ पौष्टिक करण्याचं उदाहरण ठेवलं आहे. पौष्टिक मिसळ करण्यासाठी नीना गुप्ता यांनी मोड आलेले मूग आणि छोले या दोन पौष्टिक कडधान्याचा वापर केला आहे. तर घरच्यघरी हेल्दी बर्गर करण्यासाठी त्यांनी उकडलेल्या भाज्या आणि शिजवलेल्या दलियाचा वापर केला आहे.
Image: Google
कशी करायची पौष्टिक मिसळ
पौष्टिक मिसळ करण्यासाठी नीना गुप्ता यांनी मोड आलेले मूग आणि भिजवलेले छोले घेतले. या दोन्ही कडधान्यात त्यांनी छोल्यांपेक्षा मोड आलेल्या मुगाचं प्रमाण जास्त घेतलं आहे. मूग हे बाहेर पातेल्यात उकडून घेतले. कुकरमध्ये शिजवल्यास ते फारच मऊ शिजतात. यासाठी बाहेर पातेल्यात पाणी उकळून त्यात मोड आलेले मूग शिजवताना ते योग्य प्रमाणात शिजवून घेतले आहे. तर छोले हे कुकरमध्ये पाण्यात तमालपत्रं घालून शिजवून घेतले आहे. दोन्ही शिजेपर्यंत कांदा , टमाटा बारीक चिरणे, लसूण आल्याची पेस्ट करुन घेणे, फोडणीसाठी तेल, जिरे, मोहरी, हिंग, हळद,तिखट, गरम मसाला, गोडा मसाला आणि मीठ काढून तयारी करुन ठेवली आहे.
Image: Google
मूग आणि छोले शिजल्यानंतर फोडणीसाठी कढईत तेल तापवून त्यात जिरे, मोहरी फोडणीला घातले. ते तडतडल्यावर आलं लसणाची पेस्ट घातली आहे. त्यातच बारीक चिरलेला कांदा घालून तो गुलाबीसर परतून घेतला. कांदा परतल्यावर त्यात हिंग, हळद , तिखट, थोडा गरम मसाला आणि मीठ घालून सर्व नीट मिसळून घेतलं आहे. फोडणीत मसाले मिसळल्यावर त्यात उकडलेले मूग आणि शिजवलेले छोले घातले आहे. ते नीट मिसळल्यावर त्यात रश्यासाठी गरम पाणी घातलं आहे.
मिसळीला चांगला स्वाद येण्यासाठी मंद आचेवर मिसळ भरपूर वेळ उकळून घेतली आहे. ती चांगली उकळ्यावर वरुन कोथिंबीर घालून गॅस बंद केला. नीना म्हणतात चवीशी तडजोड न करता घरच्याघरी पौष्टिक मिसळ करता येते. मिसळ बनवण्याच्या सामग्रीपासून पध्दतीपर्यंत सर्व गोष्टी आरोग्याचा विचार करुन केलेल्या असल्यानं या मिसळवर आवडीचं कुरकुरीर्त फरसाण जरा बेतानं घेऊन खाण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.
Image: Google
दलिया बर्गर
आरोग्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी दलियाचा समावेश आहारात केला जातो. दलियाचे चटपटीत आणि पौष्टिक पदार्थ तयार करता येतात हे नीना गुप्ता यांनी दलियाचं बर्गर करुन दाखवून दिलं आहे. बर्गरमध्ये पावामधली टिक्की महत्त्वाची असते. ही टिक्की जेवढी चविष्ट तितकं बर्गर रुचकर लागतं. या टिक्कीचा आरोग्याच्या दृष्टीकोनातून विचार करुन नीना गुप्ता यांनी दलिया आणि उकडलेल्या भाज्यांचा वापर करुन टिक्की तयार केली आहे.
दलियाचा बर्गर करण्यासाठी 1 गाजर, 8-10 घेवड्याच्या शेंगा, 1 मोठा बटाटा, 1 मोठी सिमला मिरची, 1 वाटी वाटाणे, 1वाटी दलिया, मीठ, 2, हिरव्या मिरच्या, लाल तिखट, गरम मसाला भरपूर कोथिंबीर आणि ब्रेडचा चुरा ही सामग्री घेतली आहे. तर डिपसाठी दही, लसून पाकळ्या, मीठ आणि पिझ्झा मसाला घेतला आहे.
सर्वात आधी सिमला मिरची सोडून गाजर, घेवडा उकडून घेतला आहे. वाटाणे सोलून ते उकडून शिजवून घेतले आहेत. दलिया कुकरमधून शिजवला आहे. उकडलेल्या भाज्या आणि दलिया गार झाल्यावर त्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची, लाल तिखट, गरम मसाला, मीठ, कोथिंबीर आणि बारीक चिरलेली सिमला मिरची घालून सर्व नीट मळून एकत्र करुन घेतलं आहे. या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे घेऊन त्याला तळहातानं दाबत टिक्कीचा आकार दिला आहे.
नाॅन स्टिक पॅन गरम करुन त्यावर थोडं तेल घालून तयार टिक्की ब्रेडच्या चुऱ्यात घोळून टिक्की दोन्ही बाजुंनी सोनेरी रंगावर भाजून घेतल्या आहेत. दह्यातलं पाणी काढण्यासाठी ते सूती कापडात बांधून आधी टांगून ठेवलं. पाणी काढलेल्या दह्यात पिझ्झा मसाला, मीठ आणि 2-3 लसणाच्या पाकळ्या कुटून दह्यात घालून हे सर्व दह्यात एकजीव करुन घेतलं आहे. पावाला आधी दह्याचं डिप लावून त्यावर टिक्की ठेवावी. टिक्कीला दह्याचं डिप लावून मग हे बर्गर खावं असं नीना गुप्ता सांगतात.