गेल्या काही दिवसांपासून राज्यात फार नाही पण थोड्या प्रमाणात पावसाला सुरुवात झाली आहे. पाऊस म्हटलं की आपल्याला सगळ्यात आधी आठवतात ती गरमागरम भजी आणि वाफाळता चहा. गार हवेत हे दोन्ही गरम पदार्थ आपल्या जीभेचे चोचले तर पुरवतात आणि आपण मनापासून या दोन्हीवर ताव मारतो. भजी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर साधारणपणे कांदा आणि बटाट्याची भजी येतात. पण त्याशिवायही थोड्या वेगळ्या भाज्या वापरुन आपण खुसखुशीत आणि तरीही पौष्टीक भजी नक्की करु शकतो. आता भजी म्हटल्यावर तेल आलेच, मात्र गार हवेत थोड्या प्रमाणात खाल्लेले तेल पचते. इतकेच नाही तर हरभरा डाळीतूनही आपल्याला प्रोटीन मिळत असल्याने घरच्या घरी स्वच्छता राखत केलेली भजी केव्हाही चांगली. ही भजी थोडी जास्त खाल्ली तरी आपल्याला त्याचा त्रास होत नाही.
भजींसाठी कांद्याशिवाय पालक, पनीर आणि फ्लॉवर या भाज्या वापरता येऊ शकतात. पालकाची पाने स्वच्छ धुवून ती पीठात भिजवून कांद्यासारखीच त्याची भजी सोडली तर ती मस्त कुरकुरीत तर होतातच पण पालकही पोटात जातो. पालकाची भाजी आरोग्यासाठी अतिशय चांगली असून सतत पालक खायचा आपण कंटाळा करतो. मात्र पालकाची भजी चवीला खूपच छान लागतात. त्याचप्रमाणे पनीरमध्येही प्रोटीन, कॅल्शियम असे बरेच पोषक घटक असतात. सतत पनीरची भाजी खाण्यापेक्षा पनीर पकोडे किंवा पनीरची भजी पावसाळ्यात खमंग लागतात. यामुळे पोटही भरते आणि शरीलाला पोषणही मिळते. फ्लॉवरच्या फुलांची भजीही हॉटेलमधील व्हेज क्रिस्पीसारखी होतात. ही भजी करताना हरभरा डाळीच्या पीठात थोडे तांदळाचे पीठ घातले तर भजींचा कुरकुरीतपणा वाढण्यास मदत होते. पाहूया या भजींची खास रेसिपी...
साहित्य
हरभरा डाळीचे पीठ/ बेसन - १ वाटी
तांदळाचे पीठ - अर्धी वाटी
तिखट - १ चमचा
हळद - अर्धा चमचा
ओवा - पाव चमचा
मीठ - चवीनुसार
पालक - १५ ते २० लहान पाने
पनीर - १० ते १५ लहान तुकडे
फ्लॉवर - लहान आकाराची १० ते १२ फुलं
तेल - २ वाट्या
कृती
१. बेसन आणि तांदूळ पीठ एकत्र करुन त्यामध्ये ओवा, मीठ आणि तिखट घालून घ्या
२. यामध्ये पाणी घालून हे पीठ घट्टसर भिजवा.
३. पालकाची पाने मोठी असतील तर ती बारीक चिरुन घ्या.
४. पनीर आणि फ्लॉवरचे बारीक तुकडे करुन घ्या.
५. हे सगळे पीठात घोळून घेऊन एक एक गोष्ट तेलात चांगले सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या.
६. मिरची किंवा सॉससोबत ही गरम भजी मस्त लागतात. यासोबत चहा असेल तर आणखीनच उत्तम