घरातील प्रत्येक व्यक्तींची खाण्याच्या बाबतीत आवड वेगवेगळी असते. काहींना नाश्त्यात उपमा आणि पोह्याशिवाय जमत नाही. तर, काहींना नाश्त्यात साऊथ इंडियन पदार्थ आवडतात. परंतु, स्वयंपाक घरात रवा संपला तर, उपमा कशापासून तयार करावा असा प्रश्न महिलावर्गाला पडतो. अशा परिस्थितीत आपण ब्रेडपासून तयार उपमा बनवू शकता.
ही रेसिपी झटपट तर बनतेच, यासह चवीलाही चमचमीत लागते. ही रेसिपी नाश्ता, स्नॅक्स अथवा टिफिनसाठी उत्तम ऑप्शन आहे. कांदा - टॉमेटोची फोडणी, त्यात मसाल्यांचा खमंग स्वाद या रेसिपीची लज्जत वाढवते. चला तर मग या कमी साहित्यात बनणाऱ्या पदार्थाची कृती पाहूयात.
ब्रेड उपमा बनवण्यासाठी लागणारं साहित्य
ब्रेड
कांदा
टॉमेटो
हिरवी मिरची
बटर अथवा तेल
आलं लसूण पेस्ट
मीठ
लाल तिखट
पाव भाजी मसाला
कोथिंबीर
ब्रेड उपमा बनवण्याची कृती
सर्वप्रथम, ब्राऊन अथवा व्हाईट ब्रेडचे बारीक चौकोनी काप करून घ्या. चौकोनी काप केल्यानंतर एका वाटीत काढून घ्या. आता दुसरीकडे कांदा, टॉमेटो आणि हिरवी मिरचीचे बारीक काप करून घ्या.
आता एका कढईत बटर अथवा तेल घाला. त्यात बारीक लांब काप केलेले हिरव्या मिरच्या घाला, त्यानंतर कडीपत्ता, बारीक चिरलेला कांदा, आलं लसूण पेस्ट, बारीक चिरलेला टॉमेटो घालून संपूर्ण मिश्रण चांगले भाजून घ्या.
आता त्यात मीठ, लाल तिखट, पाव भाजी मसाला घालून संपूर्ण मिश्रण मिक्स करा. मसाले मिक्स झाल्यानंतर त्यात बारीक चौकोनी केलेले ब्रेडचे तुकडे मिक्स करा. संपूर्ण साहित्य मिक्स झाल्यानंतर कढईवर झाकण झाकून ठेवा. ५ मिनिटे वाफ द्या. जेणेकरून ब्रेडमध्ये मसाले मिक्स होतील. सजावटीसाठी शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर मिक्स करा. अशा प्रकारे ब्रेड उपमा खाण्यासाठी रेडी.