आपल्या देशात उत्तरेकडील राज्यात नाश्त्याला पराठे खाल्ले जातात. वेगवेगळ्या सारणांचे, भाज्यांचे पराठे आणि सोबत दही असलं की पोट भरतं आणि पोषणही होतं. आहारतज्ज्ञ सांगतात त्याप्रमाणे सकाळी पोटभरीचा आणि पौष्टिक नाश्ता घ्यावा. त्यासाठी पराठे हे उत्तम पर्याय आहेत. पण सकाळच्या घाईत सारणाचे पराठे करणं हे थोडं दमछाकीचं काम होतं. पण यावरही पराठ्यांमधे दही पराठा हा एक पर्याय आहे. दही पराठा सारणांच्या पराठ्यांपेक्षा झटपट बनतात आणि चवीलाही छान लागतात.
छायाचित्र:- गुगल
दही पराठा कसा कराल?
दही पराठा करण्यासाठी 2 कप गव्हाचं पीठ, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा जिरेपूड, अर्धा चमचा गरम मसाला, अर्ध चमचा ओवा, अर्धा चमचा कसूरी मेथी, एक चमचा आलं पेस्ट, चिरलेली कोथिंबीर, चिरलेला पुदिना, चवीप्रमाणे मीठ, गरजेनुसार तेल आणि 2 कप दही घ्यावं.
छायाचित्र:- गुगल
दही पराठा करताना आधी कणिक घ्यावी. त्यात हळद, तिखट, गरम मसाला, ओवा, कसूरी मेथी हे सर्व जिन्नस घालून ते नीट मिसळून घ्यावं. नंतर त्यात दही घालावं आणि पराठ्यांची कणिक मळावी. ही कणिक मळताना पाणी लागलंच तर खूपच थोडं लागतं. कणिक मळल्यानंतर ती 20 मिनिटं झाकून ठेवावी. त्यानंतर कणकेच्या छोट्या लाट्या करुन पराठ्यांच्या आकारात ते लाटून घ्यावेत. पराठा दोन्ही बाजूनं तेल लावत शेकून घ्यावा. हे पराठे कोणत्याही चटणीसोबत खायला छान लागतात.