आज कोणती भाजी करायची किंवा भाजीला उद्या काय करायचं, हा प्रश्न दिवसातून एकदा तरी प्रत्येक घरातल्या बाईला पडतो. भलेही स्वयंपाक ती स्वत: करणार असो किंवा स्वयंपाकाला बाई येणार असो, पण स्वयंपाक काय करायचा, हे घरातल्या बाईलाच ठरवावं लागतं. अशावेळी सगळ्यात जास्त गडबड होते जेव्हा घरात कोणतीच भाजी शिल्लक नसते. मग भाजीची तहान वरणावर भागावावी लागते किंवा जोडीला पिठलं किंवा मग आणखी काहीतरी करावं लागतं. अशी जर कधी वेळ आली किंवा बदल म्हणून काही वेगळं करण्याची इच्छा असेल, तर कांदा करी नावाची ही मस्त रेसिपी नक्की ट्राय करून बघा.
कशी करायची कांदा करी?- कांदा करी करायला अतिशय सोपी आणि झटपट होणारी आहे.- कांदा करी करण्यासाठी सगळ्यात आधी कांद्याची साले काढून घ्या.- आता कांद्याच्या वरच्या बाजूवर अधिक चिन्हात थोडंस कापून घ्या. अगदी खालपर्यंत कापू नका. फक्त थोडासा छेद द्या.- आता या कांद्यामध्ये भरण्यासाठी स्टफिंग तयार करून घ्या.- यासाठी सगळ्यात आधी शेंगदाणे भाजून घ्या आणि मिक्सरमधून बारीक फिरवून घ्या.
- दाण्याच्या कुटात लाल तिखट, गरम मसाला, चाट मसाला, आमचूर पावडर आणि चवीनुसार मीठ टाका. आमचूर पावडर नसेल तर थोडं लिंबू पिळा.- आता हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करा आणि कांद्यावर आपण जो छेद केला आहे, त्यामध्ये भरा. - पॅन किंवा कढई गॅसवर ठेवा. त्यात थोडं तेल टाका. तेल तापल्यावर त्यावर हे भरलेले कांदे ठेवा. प्रत्येक कांद्यावर वरतून थोडंसं तेल टाका आणि कांद्यांना चांगलं फ्राय करून घ्या.- कांदा थोडा मऊ पडला की तो काढून घ्या. - यानंतर कढईत थोडे अजून तेल टाका. त्यामध्ये आदता अद्रकाचा तुकडा आणि लसून टाका. तसेच दोन टोमॅटो कापून टाका. हे सगळं व्यवस्थित फ्राय करून घ्या.
- हे मिश्रण थंड झाल्यानंतर त्याची पेस्ट करून घ्या. - कढईत तेल टाका. तेल गरम झाल्यावर त्यात तेजपत्ता, जिरे, विलायची, दालचिनी, हळद, धने पावडर, गरम मसाला टाका. मसाले फ्राय करून घ्या. - मसाले तेल सोडू लागले की त्यात दोन कप गरम पाणी टाका. त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ आणि तिखर टाका. - आता भरलेले कांदे या ग्रेव्हीमध्ये सोडा आणि थोडी वाफ येऊ द्या. - चांगली वाफ आली की वरून कोथिंबीर टाका आणि गॅस बंद करा.- अशी चटपटीत भाजी पोळी, पराठा किंवा भातासोबत खायलाही मस्त लागते.