Join us  

ब्रेड बटर - जॅम ब्रेड ऐवजी सध्या न्युटेला स्प्रेडची चर्चा, हा नवा ट्रेण्ड नक्की काय आहे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2022 11:51 AM

Nutella Recipe : न्युटेला जगभरात इतकं प्रसिद्ध झालं की, सकाळच्या नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणानंतरची स्वीट डिश म्हणून देखील लोक न्यूटेला आवडीने खातात.

रोजच्या नाश्त्यामध्ये उपमा, पोहे, इडली, डोसा खाऊन कधी कधी कंटाळा येतो. मग आपण थोडासा चेंज म्हणून ब्रेड आणतो. या ब्रेडपासून ब्रेड रोल, ब्रेड पकोडा असे नाश्त्याचे वेगवेगळे पदार्थ आपण करू शकतो. पोळी, भाकरीला पर्याय म्हणून ब्रेड हा आपल्या रोजच्या खाण्यातील पदार्थ झाला आहे. इतकेच नव्हे तर ब्रेडला बटर, जॅम, पीनट बटर, चॉकलेट न्यूटेला, चीझ स्प्रेड, मियॉनीज असे लावून देखील आपण खाऊ शकतो. यांपैकी न्यूटेला पोळी किंवा ब्रेडला लावून खाल्लं म्हणजे मन आणि पोट तृप्त होतं. न्यूटेला म्हणजे खवय्यांसाठी एक आवडीचा पदार्थ आहे. काही लोकांना जेवणानंतर गोड खाण्याची इच्छा झाली तर ते चक्क न्यूटेलावर ताव मारतात. हेझलनट, साखर आणि कोको यांचा वापर करून एक गोड पदार्थ केला जातो. न्युटेला जगभरात इतकं प्रसिद्ध झालं की, सकाळच्या नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणानंतरची स्वीट डिश म्हणून देखील लोक न्यूटेला आवडीने खातात. वेगवेगळ्या ब्रॅंड्सचे न्यूटेला आज बाजारात मिळतात परंतु ते महाग असल्याने एक विशिष्ट वर्गच न्युटेला घेणे पसंद करतात. पण आपण अतिशय कमी साहित्यात हे न्यूटेला घरच्या घरी बनवू शकतो. चला तर मग न्युटेला घरी कस बनवायचं ? हे समजून घेऊयात (Nutella Recipe).

मास्टरशेफ इंडिया या शोच्या चौथ्या पर्वाचे विजेते शेफ संज्योत कीर यांनी आपल्या Your Food Lab या इंस्टाग्राम पेजवरून न्यूटेलाची रेसिपी शेअर केली आहे. 

 

न्युटेला कस बनवायचं ?

साहित्य -

१. हेझलनट - २ कप २. कोको पावडर - १/२ कप ३. पिठी साखर - १ कप४. व्हॅनिला इसेंन्स - १ टेबलस्पून ५. न्यूट्रल ऑईल - ४ टेबलस्पून ६. मीठ - चिमूटभर 

कृती - 

१. एका पॅनमध्ये हेझलनट्सला मंद आचेवर गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत भाजून घ्या. २. एका बाऊलमध्ये हेझलनट्स काढून ते पूर्ण गार करून घ्या.३. गार झालेले हेझलनट्स मिक्सरमध्ये घालून त्याची जाडसर लिक्विड पेस्ट होत नाही तोपर्यंत फिरवून घ्या. ४. मग या जाडसर लिक्विड पेस्टमध्ये कोको पावडर, पिठी साखर, व्हॅनिला इसेंन्स, न्यूट्रल ऑईल, चिमूटभर मीठ घालून परत एकदा हे मिश्रण मिक्सरमध्ये फिरवून घ्या.     

तुमचे हेझलनट चॉकलेट न्यूटेला ब्रेडसोबत खाण्यासाठी तयार आहे.

टॅग्स :अन्नपाककृती