थंडी म्हटली की घरोघरी पौष्टीक पदार्थ करण्याची आणि खाण्याची जय्यत तयारी सुरु होते. मग पौष्टीक लाडूपासून ते वेगवेगळ्या गरमागरम सूपपर्यंत आणि बाजारात उपलब्ध असलेल्या भाज्यांपासून नवनवीन काही ना काही केले जाते. यातच आणखी एक महत्त्वाचा घटक थंडीच्या दिवसांत आपल्याकडे वापरला जातो तो म्हणजे बाजरी. बाजरी उष्ण धान्य असल्याने थंडीच्या दिवसांत आहारात बाजरीचा समावेश केला जातो. आपल्या कुटुंबियांची तब्येत चांगली ठेवणे आपल्या हातात असल्याने आपण जर त्यांना घरगुती चविष्ट पदार्थ खायला दिले तर त्याचा त्यांच्या आरोग्याला निश्चितच फायदा होईल. पाहूयात थंडीच्या दिवसांत आरोग्याला उपयुक्त असलेल्या बाजरीची खिचडी कशी करायची (How to make khandeshi Bajri khichadi)...
साहित्य -
बाजरी - २ वाट्यामूग - अर्धी वाटी लसूण पाकळ्या - ७ ते ८ दाणे - अर्धी वाटीतिखट व गोडा मसाला - चवीनुसार मीठ - चवीनुसार तेल आणि फोडणीचे सामान - अंदाजे कोथिंबीर - अर्धी वाटी (चिरलेली)कडिपत्ता - ८ ते १० पाने
कृती -
१. बाजरी पाण्यात भिजवून सुती कापडावर वाळत घालावी. २. कोरडी झाल्यानंतर ही बाजरी मिक्सरमधून काढून त्याचा भरडा करा. ३. थोडीशी पाखडून सालं वेगळी झाली असतील तर ती काढून टाका ४. कूकरमध्ये बाजरी, मूग डाळ, दाणे मीठ आणि मसाला, तिखट घालून शिजवून घ्या. ५. लहान कढईत जीरे, मोहरी, हिंग, हळद घालून फोडणी करा आणि त्यात कडिपत्ता आणि चिरलेल्या लसूण पाकळ्या घाला. ६. फोडणी चांगली गरम झाली की गॅस बंद करा. ७. खिचडी ताटात घेतल्यानंतर त्यावर वरुन गरम फोडणी घाला, वरुन कोथिंबीर घ्या. ८. गरमागरम खिचडी फस्त करा
तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये फ्लॉवर, मटार, फरसबी, गाजर, कांदा यांसारख्या भाज्याही घालू शकता. यामुळे याचे पौष्टीक मूल्य आणखी वाढण्यास मदत होईल. तसेच ही खिचडी तुम्ही नाष्ता किंवा जेवण अशा कोणत्याही वेळी करु शकता. बाजरी हे धान्य असल्याने दोन डीश खाल्ल्यानंतर पोट भरते. यासोबत तुम्ही पापड, कढी, लोणचे असाही बेत करु शकता.
बाजरीचे फायदे
१. बाजरी हे धान्य ग्लुटेन फ्री असल्याने गहू आणि तांदळापेक्षा बाजरी खाणे आरोग्यासाठी अतिशय चांगले असते. २. बाजरीत फायबर जास्त प्रमाणात असल्याने पचनक्रिया सुरळीत होण्यासाठी बाजरीचा उपयोग होतो. ३. बाजरीमुळे कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते. त्यामुळे हृदयाशी संबंधित आजारांपासून दूर राहण्यास मदत होते.४. बाजरीमध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम हे शरीराला आवश्यक असणारे घटक पुरेशा प्रमाणात असतात. ५. बाजरी हा उष्ण पदार्थ असल्याने थंडीच्या दिवसांत बाजरीचा आहारात आवर्जून समावेश करायला हवा. ६. बाजरीमुळे पोट लवकर भरल्यासारखे होते, त्यामुळे वाढलेले वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी बाजरी खाणे अतिशय उपयुक्त असते. ७. बाजरीमुळे मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत होते