श्रावण महिन्यातले उपवास (fasting in shravan) आणि एरवीचे उपवास यात फरक असतो. त्यामुळेच श्रावण महिन्यातल्या उपवासाच्या दिवशी नेहमीची भगर - आमटी, साबुदाणा खिचडी, वडे नकोसे वाटतात. काही तरी वेगळं पण पोटभरीचं खावंसं वाटतं. असे पदार्थ (food for fasting) जे मन उत्साही आणि प्रसन्न ठेवतील. असा पदार्थांच्या शोधात असेल तर श्रावणातल्या उपवासाला सात्विक पदार्थांची थाळी (nutritious dish for fasting) हा चांगला पर्याय आहे. सगळेच पदार्थ करायचे नसतील तर एखाद दोन पदार्थ करुनही उपवासाला वेगळं काही खाण्याची हौस पूर्ण करता येते. श्रावणातल्या या उपवासाच्या थाळीत मखान्याची रस्सेदार भाजी, शिंगाड्याची पुरी, बटाटा शेंगदाण्याची कोरडी भाजी आणि मखाना खीर करता येईल. हे पदार्थ पोटभरीचे असून करायलाही एकदम सोपे आहेत. आपल्या नेहमीच्या उपवासाच्या पदार्थांना नवीन आणि पौष्टिक पर्याय म्हणून हे पदार्थ नक्कीच करुन पहावे असे आहेत.
Image: Google
मखान्यांची रश्याची भाजी
मखान्यांची रश्याची भाजी करण्यासाठी 1 कप मखाना, अर्धा कप फ्रेश क्रीम, अर्धा कप काजू, चवीनुसार सैंधव मीठ, 1 छोटा चमचा जिरे, 2 बारीक चिरलेल्या मिरच्या, अर्धा चमचा आल्याची पेस्ट आणि 1 मोठा चमचा साजूक तूप आणि तेल घ्यावं.
मखान्यांची भाजी करताना सर्वात आधी मिक्सरमधून काजू आणि क्रीम एकत्र फिरवून घ्यावं. एका कढईत तूप गरम करावं. गरम तुपात मखाने 2-3 मिनिटं परतून घ्यावेत. परतून घेतलेले मखाने वेगळे ठेवावेत. नंतर कढईत तेल घ्यावं. ते गरम झालं की त्यात जिरे घालावेत. मिरच्या आणि आल्याची पेस्टही परतून घ्यावी. नंतर काजूची पेस्ट घालून ती परतून घ्यावी. यात चवीनुसार सैंधव मीठ घालाव. परतलेले मखाने घालून त्यात थोडं पाणी घालावं. भाजी 5 मिनिटं उकळून घ्यावी. मखान्यांची मलईदार रस्सा भाजी छान लागते.
Image: Google
शिंगाडा पिठाच्या पुऱ्या
शिंगाडा पिठाच्या पुऱ्या करताना त्यात 2 कप शिंगड्याचं पीठ, अर्धा कप उकडून कुस्करलेला बटाटा, 1 चमचा कोथिंबीर, चिमूटभर मीठ, पाणी आणि तळण्यासाठी तेल घ्यावं.
एका ताटात तेल सोडून सर्व सामग्री घेऊन पीठ मळून घ्यावं. पीठ मळल्यानंतर ते 10 मिनिटं झाकून ठेवावं. नंतर कढईत तेल गरम करत ठेवावं. तेल गरम होईपर्यंत पिठाच्या छोट्या छोट्या लाट्या करुन पुऱ्या लाटून घ्याव्यात. नंतर गरम तेलात तळून घ्याव्यात.
Image: Google
बटाटा-शेंगदाणा भाजी
बटाटा शेंगदाणा भाजी करण्यासाठी 1 कप कच्चे शेंगदाणे, 2-3 बटाटे मध्यम आकारात चिरुन घेतलेले, 1 छोटा चमचा जिरे, 1 बारीक चिरलेली मिरची , तेल, सैंधव मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घ्यावी.
सर्वात आधी पॅनमध्ये तेल घालून ते गरम करावं. त्यात शेंगदाणे घालून ते परतून बाजुला काढून घ्यावेत. पॅनमध्ये पुन्हा तेल घालून त्यात जिरे आणि मिरच्या परतून घ्याव्यात. नंतर बटाटे घालून ते परतावेत. कढईवर झाकण ठेवून बटाट्यांना वाफ काढावी. मग यात परतलेले शेंगदाणे, सैधव मीठ घालून भाजी पुन्हा 3 ते 4 मिनिटं शिजवावी. भाजी झाल्यावर गॅस बंद करुन भाजीवर कोथिंबीर भुरभुरुन घालावी.
Image: Google
मखान्यांची खीर
मखान्यांची खीर करण्यासाठी 1 कप मखाना, 1 कप मिल्कमेड, 1 लिटर दूध, साय, बारीक कापलेले बदाम, 1 चमचा तूप आणि चिमूटभर वेलची पावडर घ्यावी. मखान्यांची खीर करताना कढईत तूप घालून ते गरम करावं त्यात मखाने घालून ते 2-3 मिनिटं परतून बाजुला ठेवावेत. नंतर कढईत दूध घालून ते गरम करावं. दूध गरम झालं की सारखं हलवत राहावं. दूध थोडं आटलं की त्यात परतलेले मखाने घालावेत. मखाने घातल्यानंतर कढईवर झाकण ठेवून 10 मिनिटं खीर उकळू द्यावी. नंतर खीरीमध्ये मिल्कमेड घालून खीर हलवून घ्यावी. शेवटी वेलची पावडर आणि कापलेले बदाम घालून खीर चांगली हलवून घ्यावी. सर्वात शेवटी वेलची पावडर आणि कापलेले बदाम घालून खीर चांगली हलवून घ्यावी.