आरोग्य जपायचं, वजन कमी करायचं म्हणून आवडीचे पदार्थ नाखुषीने वर्ज्य केले जातात. विशेषत: तेल, साखर, तूप याचा वापर ज्या पदार्थांमधे होतो असे पदार्थ सोडले जातात. भजी,वडे, पराठे असे चटपटीत आणि सगळ्यांचेच फेव्हरीट असणारे पदार्थ वर्ज्य पदार्थांच्या यादीत सर्वात वरच्या स्थानावर असतात. या पदार्थांनी वजन वाढतं, बॅड कोलेस्ट्रेरॉल वाढतं, हदयाच्या आरोग्याला धोका निर्माण होतो . कारण या पदार्थांमधे तेलाचा वापर अधिक असतो. त्यामुळे हे पदार्थ खाताना गरजेपेक्षा जास्त तेल शरीरात जातं, हे खरं आहे, पण म्हणून त्यासाठी हे पदार्थ सोडण्याची काही आवश्यकता नाही. हे पदार्थ खाऊनही सुदृढ राहाता येतं. यासाठी हे पदार्थ ऑइल फ्री करण्याचा उत्तम पर्याय आहे. भजी आणि पराठे तेलाशिवाय कसे बनतील आणि कसे लागतील अशा शंका असतील तर यांची रेसिपी वाचा आणि लगेच करुन पाहा, आणि हो ऑइल फ्री भजी आणि पराठे इतके उत्कृष्ट लागतात की आरोग्यासाठी म्हणून नव्हे तर आवडतात म्हणून खास बनवले जातील हे नक्की!
Image: Google
ऑइल फ्री भजी
ऑइल फ्री भजी तयार करण्यासाठी 1 कप बेसन, अर्धा कप रवा, 3 मोठे चमचे दही, अर्धा कप किसलेला कच्चा बटाटा, 1 मोठा चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धा कप कापलेला कांदा, पाव चमचा किसलेलं आलं, 1 चिरलेली मिरची, पाव चमचा हळद, 1 चमचा जिरे, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा ओवा आणि चवीनुसार मीठ एवढं साहित्य घ्यावं.ही भजी तयार करताना सर्वात आधी एका खोलगट भांड्यात बेसन, रवा, किसलेला कच्चा बटाटा, चिरलेला कांदा, कोथिंबीर, किसलेलं आलं, हिरवी मिरची, हळद, जिरे, लाल तिखट, दही आणि चवीनुसार मीठ घालावं. सर्व जिन्नस चांगलं एकत्र करुन घ्यावं. मग यात पाणी घालून भज्यांसाठीचं पीठ भिजवावं. हे मिश्रण दाटसर असायला हवं. ते पातळ नको नाहीतर भजी करताना अवघड होतं.
Image: Google
मिश्रण पंधरा मिनिटं झाकून ठेवावं. पंधरा मिनिटानंतर हे मिश्रण भजी करण्यासाठी तयार होतं. बिना तेलाची भजी करण्यासाठी आधी नॉन स्टिक पॅन घ्यावा. हा पॅन मध्यम आचेवर गरम करावा. पॅन गरम झाला की पॅनमधे दाटसर मिश्रणाची भजी घालावीत. पॅनवर झाकण ठेवून मंद आचेवर भजी होवू द्यावीत. दोन तीन मिनिटानंतर झाकण काढून भजी दुसर्या बाजूने उलटवावीत. भजी उलटल्यावर पुन्हा पॅनवर झाकण ठेवावं. भजी सोनेरी रंगावर येईपर्यंत ती शेकावीत.
भजी सोनेरी रंगावर आली की झाकण काढून आणखी एखाद दोन मिनिटं ती शेकू द्यावीत. यादरम्यान ती सतत हलवत राहावीत. नंतर एका ताटात ही बिना तेलाची भजी काढून घ्यावीत. ही भजी चवीला उत्कृष्ट लागतात आणि आरोग्यासाठी उत्तम असतात. ही भजी खाऊन वजन वाढत नाही की हदयाला धोका निर्माण होत नाही.
Image: Google
ऑइल फ्री बटाटा पराठा
ऑइल फ्री बटाटा पराठी तयार करण्यासाठी अर्धा किलो भाजलेले बटाटे, पाव किलो कणीक, 1 टमाटा, 3 हिरव्या मिरच्या, 1 मोठा चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 चमचा जिरे पूड, 1 इंच आल्याचा तुकडा , 1 छोटा चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घ्यावं.
पराठे करताना एक खोलगट भांडं घ्यावं. त्यात कणीक घ्यावी. त्यात चवीपुरतं मीठ घालून कणिक मळून घ्यावी. कणिक मळून झाली की ती झाकून बाजुला ठेवावी. नंतर एक टमाटा, आलं, हिरवी मिरची बारीक कापून घ्यावं. भाजलेले बटाटे घ्यावेत. त्याची सालं काढावीत. बटाट्याच्या बारीक बारीक फोडी कराव्यात. त्यात जीरे पूड, लाल तिखट घालावं. हे मिश्रण चांगलं कुस्करुन घ्यावं. अशा प्रकारे पराठयांसाठीचं सारण तयार होतं.
Image: Google
मळून ठेवलेली कणीक घ्यावी. ती परत मळून मऊ करुन घ्यावी. एक समान तीन लाट्या कराव्यात. त्यांना पोळीसारखं लाटून घ्यावं. त्यानंतर या पोळीवर एखाद थेंब तेल घालून ते पोळीवर पसरवून घ्यावं. त्यावर कोरडं पीठ भुरभुरावं. मग दुसर्या लाटीची पोळी करुन घेऊन ती पहिल्या पोळीवर ठेवावी. पहिल्या पोळीसारखं यालाही थेंबभर तेल लावून त्यावर पीठ भुरभुरावं. तिसरी लाटी लाटून घ्यावी. ही पोळी दुसर्या पोळीवर ठेवावी. या पोळीवर केवळ कोरडं पीठ भुरभुरावं. एकावर एक ठेवलेल्या या तीन पोळ्यांचा एक रोल तयार करावा. या तीन रोलच्या पुन्हा समान लाट्या कराव्यात. एक लाटी घेऊन छोटी पोळी लाटावी. या पोळीच्या मधोमध बटाट्याचं सारण ठेवावं आणि पोळीच्या कडा सर्व बाजुंनी बंद कराव्यात.हे पराठे शेकण्यासाठी गॅस ऐवजी कोळश्यावर जाळी ठेवून दोन्ही बाजुंनी पराठे खरपूस भाजावेत. हे पराठे गॅसवर नॉनस्टिक पॅनवरही करता येतात. पराठे शेकताना दोन्ही बाजुंनी व्यवस्थित शेकावेत. हे पराठे दही/चटणी किंवा संध्याकाळी चहासोबतही छान लागतात.